Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणेशखिंड येथील गर्ल्स हॉस्टेलमधील कॅन्टीनची अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली असता गंभीर स्वच्छता त्रुटी आढळून आल्या आहेत. मे. मराठा कॅटरर्स या कॅन्टीनमध्ये स्वयंपाकघर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जिवंत झुरळांचा वावर आढळला. तसेच अन्न तयार करण्याची व साठवणुकीची जागा अत्यंत अस्वच्छ असल्याचे तपासणीत समोर आले.
अन्न व औषध प्रशासनाने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत पुणे विभागातील १५ नामांकित अन्न आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलच्या कॅन्टीनचाही समावेश आहे.
तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये जिवंत झुरळांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अस्वच्छ वातावरणात अन्ननिर्मिती आणि अयोग्य पद्धतीने अन्नाची साठवणूक आढळली. स्वच्छता, स्वच्छताविषयक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेमध्येही गंभीर त्रुटी असल्याचे प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, अन्न सुरक्षेशी संबंधित आवश्यक नोंदी व कागदपत्रे तपासणीच्या वेळी उपलब्ध नसल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील कॅन्टीन असल्याने या कारवाईकडे विशेष गांभीर्याने पाहिले जात आहे.
दरम्यान, पुणे विभागातील इतर आस्थापनांमध्येही अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले. काही ठिकाणी वैध अन्न परवाना नसणे, झुरळांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नसाठा आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.






