Devendra Fadnavis : राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, दुपारनंतर अनेक भागांत ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अत्यावश्यक कारण असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच अनावश्यक प्रवास टाळावा. विशेषतः तरुणांनी धबधबे, पर्यटनस्थळे किंवा नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्य सरकारने संभाव्य पूर आणि दरडग्रस्त भागांमध्ये आवश्यक ती पूर्वतयारी केली असून, धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि इतर सर्व यंत्रणा सतर्क असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई–पुणे मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अशा घटनांमुळे काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली असून अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित मार्गाने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यातील नागरिकांनी हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.






