DNA मराठी

ताज्या बातम्या

रखडलेल्या मान्सूनचा प्रवास राज्यात पुन्हा सुरु; जाणून घ्या ताजे अपडेट

Maharashtra Rain Alert: 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते. 1 जून ते 16 जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 1 टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के कमी, आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण पाऊस 65 मिलीमीटर हून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे. 22 जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये 22 तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही. अद्यापि ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

रखडलेल्या मान्सूनचा प्रवास राज्यात पुन्हा सुरु; जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

तहसीलदार साहेब न्याय द्या…, सरपंच शरद पवार यांच्यासह अरुण रोडे पाटील, शेळ्या मेंढ्या घेऊन तहसील कार्यालयामध्ये

Ahilyanagar News : सरोदे परिवार व चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार व अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडे पाटील शेळ्या मेंढ्या घेऊन तहसील कार्यालयामध्ये न्यायासाठी घुसले. चिचोंडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे यांच्या मालकीच्या गट नंबर 1026 मधील सातबारा वरून तत्कालीन तलाठी सर्कल यांना हाताशी धरून खरेदीखत न घेता आणि फेरफार न बनवता समाजकंटकाने सरोदे परिवाराचे घर पाडून भूमिहीन करून 51 गुंठे जमीन बेकायदेशीर स्वतःच्या नावावर लावून घेतले आहे त्यामुळे सदर गट नंबर 1026 सातबारा वर माझ्या नावाची नोंद करून ताबा मिळावा व दोषींवर 420 चा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी 12 वर्षापासून अनेक वेळा करून अनेक वेळा उपोषण करूनही अनेक सुनावण्या होऊन अहिल्यानगर तालुका तहसीलदार साहेबांनी सदर प्रकरण निकालावर बंद करून अहिल्यानगर तहसीलदार तथा तालुका न्याय दंडाधिकारी न्याय (निकाल )देत नसल्यामुळे पीडित कौसाबाई मारुती सरोदे व सरोदे परिवार हे आज सोमवार 16 जूनपासून जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत अहिल्यानगर तालुका तहसील कार्यालयातच शेळ्या मेंढ्यांना घेऊन राहणार असल्याचे प्रतिक्रिया देताना सरोदे परिवाराने व सरपंच यांनी सांगितले. आज या आंदोलनस्थळी पीडित कौसाबाई मारुती सरोदे व सरोदे परिवार, चिचोंडी पाटीलचे शरद पवार,अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडे पाटील, व धनगर बांधव मोठ्या संख्येने तहसील कार्यालय येथे उपस्थित होते या सर्वांनी तहसीलदार साहेब न्याय द्या,न्याय द्या.या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

तहसीलदार साहेब न्याय द्या…, सरपंच शरद पवार यांच्यासह अरुण रोडे पाटील, शेळ्या मेंढ्या घेऊन तहसील कार्यालयामध्ये Read More »

क्रिकेटमध्ये होणार बदल, आयसीसीचा नवीन नियम जाणून घ्या

Cricket New Rules: सीमारेषेवरील ‘बनी हॉप्स’ झेलबाबत एमसीसीने नवीन नियम केले आहेत.  हा नवीन नियम नेमका आहे तरी काय, हे जाणून घ्या. नवीन नियम काय? कायदा 19.5.2 चे बदल करण्यात येणार आहे.नवीन नियमानुसार असा झेल क्षेत्ररक्षकाने घेतला, तर त्या फलंदाजाला नाबाद ठरविले जाईल. नवीन नियमानुसार झेलसाठी सीमारेषेबाहेर गेलेल्या कोणत्याही क्षेत्ररक्षकाला हवेत असताना चेंडूला फक्त एकदाच स्पर्श करण्याची परवानगी असणार आहे. हा नियम रिले (दोन क्षेत्ररक्षकांनी मिळून घेतलेल्या) झेललाही लागू होईल. 17 जूनपासून लागू होणार नवीन नियम हा नियम 17 जून 2025 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लागू होईल आणि ऑक्टोबर 2026 पासून अधिकृतपणे एमसीसीच्या कायद्यांमध्ये समाविष्ट केला जाईल. बनी हॉप्स म्हणजे काय? सीमारेषेवरील क्षेत्ररक्षक झेल टिपतो आणि त्याचा तोल जाऊन तो सीमारेषेबाहेर जात असेल, असे त्याला वाटते, तेव्हा तो चेंडू हवेत उडवितो. पुन्हा उंच उडी मारून (जमिनीला पायाचा स्पर्श होऊ न देता) तो झेल टिपतो आणि पुन्हा चेंडू सीमारेषेबाहेर फेकून पुन्हा झेल टिपतो. या वेगळ्या झेलने ‘बनी हॉप्स’ असे म्हटले जाते.

क्रिकेटमध्ये होणार बदल, आयसीसीचा नवीन नियम जाणून घ्या Read More »

राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Maharashtra Wheather Update :  राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड आणि पालघर येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शविली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, हवामान खात्याने (IMD) आज मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे, तर पुणे आणि आसपासच्या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रात्री उशिरापासून अधूनमधून पाऊस सुरू आहे,  यासोबतच, आज दुपारी 3.30 वाजता समुद्रात 4.31 मीटर उंचीची भरती येईल, ज्यामुळे या काळात 14 फूट उंच लाटा उसळतील. मान्सून लवकर आला मुंबईत पुन्हा पावसाने वेग घेतला आहे. शनिवारी रात्रीपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे हवामान आल्हाददायक तर झालेच, शिवाय तापमानातही घट झाली आहे, ज्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मुंबई उपनगरांचे तापमान 30.9 अंशांपर्यंत आणि शहराचे तापमान 28 अंशांपर्यंत खाली आले आहे. या आठवड्यात शहरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सूनने 26 मे रोजी दार ठोठावून हवामानाच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला, कारण गेल्या 69 वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर आला. तथापि, सुरुवातीच्या दोन दिवसांच्या पावसानंतर त्याचा वेग मंदावला होता, परंतु आता ढग पुन्हा सक्रिय झाले आहेत. 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस हवामान विभागाच्या मते, सोमाली जेट स्ट्रीम सक्रिय झाला आहे, जो भारतीय उपखंडात मान्सूनला चालना देत आहे. सोमालियाहून अरबी समुद्रातून भारतात जलदगतीने वाहणारा हा प्रवाह आणि नैऋत्य मान्सूनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याच्या प्रभावामुळे 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान तज्ञांच्या मते, 15 दिवसांच्या अंतरानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. सध्या मुंबईत चांगला पाऊस पडत आहे आणि हा टप्पा या आठवड्यातही सुरू राहण्याची शक्यता आहे.

राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट Read More »

बोल्हेगावमध्ये बिनशेती जमीन शेती दाखवून विक्री? शासनाचा लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप

Ahilyanagar News : अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील बोल्हेगाव मिळकती एकत्र करून तयार करण्यात आलेल्या एकूण २४३२०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या जमिनीला मा. तहसीलदारांनी रहिवासी वापरासाठी अकृषिक वापराची परवानगी दिली होती. मात्र, यामधील केवळ स.नं. ३४/३ या मिळकतीसाठी स्वतंत्र खरेदीखत करताना ती शेती म्हणून नोंदविण्यात आल्याचे समोर आले आहे. हे खरेदीखत करताना संबंधित तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास असूनही त्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने प्रशासकीय प्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, रहिवासी वापरासाठी आधीच अकृषिक परवानगी मिळालेल्या जमिनींपैकी एक भाग पुन्हा शेती दाखवून खरेदी केल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणात शासकीय नियमबाह्य व्यवहार झाल्याचे स्पष्ट असून, महसूल विभागाने याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सरकारी महसुलात घोटाळा होऊनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

बोल्हेगावमध्ये बिनशेती जमीन शेती दाखवून विक्री? शासनाचा लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप Read More »

भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा ऐरणीवर; अरुण मुंडेंच्या कुस्ती मेळ्याला मंत्र्यांची उपस्थिती, आमदारांच्या गटाचा विरोध?

Arun Munde : पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आले असून, पक्षातील दोन गटांत वाढता संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सध्या पक्षाचे सरचिटणीस असलेले अरुण मुंडे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार उमेदवारी मागितली होती. त्यासाठी त्यांनी तसेच गोकुळ दौंड यांनी मेळावे घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, भाजपने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांनाच संधी दिली. या पार्श्वभूमीवर, नुकत्याच झालेल्या शेवगाव शहरातील ‘देवाभाऊ कुस्ती स्पर्धा’ला अरुण मुंडे यांनी संयोजन दिलं. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी, यामध्ये भाजपातील अंतर्गत मतभेद अधोरेखित झाले. या कार्यक्रमाच्या बक्षीसवाटप समारंभाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी महसूल मंत्री व जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती राम शिंदे यांनी उपस्थिती लावली. मात्र, जिल्ह्यातील इतर भाजप आमदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, हे विशेष. या कार्यक्रमाला भाजपमधील काही नेत्यांनी उपस्थित राहू नये यासाठी खुद्द आमदार मोनिका राजळे यांच्या गटाकडून प्रयत्न झाल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. सोशल मीडियावरही अशाच आशयाची पोस्ट फिरत होती, ज्यामध्ये “पक्षविरोधात काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला भाजपचे नेते हजर का?” असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, व्यासपीठावरून बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “या कार्यक्रमाला येण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न केले, त्यामुळे उपस्थित राहणं शक्य झालं,” असं स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यानेही अनेकांचे भुवया उंचावल्या. यानंतर, पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात भाजपच्या गटबाजीने पुन्हा डोके वर काढले आहे का, हे स्पष्ट होत आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही फूट आणखी गडद होणार की पक्ष नेमकी भूमिका घेऊन तोडगा काढणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा ऐरणीवर; अरुण मुंडेंच्या कुस्ती मेळ्याला मंत्र्यांची उपस्थिती, आमदारांच्या गटाचा विरोध? Read More »

“मतदान हीच खरी क्रांती : तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा” त्यांची टक्केवारी तुमची मृत्यूची वारी

DNA मराठी विशेष लेख Election 2025: – “ज्या दिवशी तुम्ही मुलांचा, नातवांचा आणि त्यांच्या भविष्याचा विचार करून मतदान कराल, तेव्हाच खऱ्या अर्थाने भविष्यातील तुमच्या पिढीला काहीतरी द्याल,” ही साधी पण खोल अर्थ सांगणारी भावना आजच्या समाजव्यवस्थेसमोर आरसा धरते. देशात किंवा राज्यात निवडणुका जरी वारंवार येत असल्या, तरी ‘मतदान’ या घटकाचा खरी सामाजिक जबाबदारी म्हणून विचार फार कमी वेळा केला जातो. आज जनतेने विचार करायची गरज आहे की, आपण केवळ जात, पंथ, पक्ष, किंवा तात्कालिक फायद्याच्या आधारावर मतदान करत आहोत का? की आपल्या पिढ्यांच्या आरोग्याचा, शिक्षणाचा, आणि नैतिक अधिष्ठानाचा विचार करत आहोत? आज समाजात वाढत चाललेला भ्रष्टाचार, टक्केवारीची रीत, आणि कंत्राटी साखळीतील माफियांची झोपमोड करणारी उपस्थिती, या सर्व गोष्टींचा थेट परिणाम आपण खात असलेल्या अन्नधान्यावर, पिण्याच्या पाण्यावर, आणि शेतीमालावर होत आहे. शेतीमध्ये मारल्या जाणाऱ्या अतिरिक्त कीटकनाशकांपासून ते रासायनिक खतांपर्यंत, दूध आणि शीतपेयांतील रसायनांची मात्रा, आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांतील अपायकारक घटक या सर्व गोष्टी आरोग्यास घातक ठरत आहेत आणि यामागील मूळ कारण म्हणजे नफेखोरीचा हव्यास आणि प्रशासकीय दुर्लक्ष. आज हे निर्णय घेणारे अधिकारी, हे कायद्याचे रक्षक, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडून दिले गेलेले लोकप्रतिनिधी हेच सर्व स्वतःच्या अपत्यांच्या भविष्यातील आरोग्याचा विसर पावले आहेत. आज ते भ्रष्ट मार्गाने पैसा कमवतात, सत्ता गाजवतात, ठेके वाटतात, नियम मोडतात… पण त्यांचेही मूल हीच विषारी फळे आणि विषारी अन्न आणि दुधाचे पदार्थ खाणार आहे, हे वास्तव ते विसरत आहेत. म्हणूनच, एक नागरिक म्हणून, प्रत्येकाने विचार करावा “माझ्या मुलांच्या आणि त्यांच्या भावी आयुष्याच्या आरोग्यासाठी मी कोणाला निवडतोय?” हा प्रश्न फक्त आजच्या राजकारणाला नाही, तर समाजाला प्रश्न विचारण्याची आणि सजग करण्याची एक नवी दिशा ठरतोय. मतदान म्हणजे केवळ बोटावर शाई लावणे नव्हे, तर भविष्यात आपल्या घरात कुठल्या प्रकारचं अन्न शिजणार आहे, हे ठरवण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे. “काय खावे राजकारण्यांनी ठरवायचं? का नागरिकांनी?” देशात सध्या एक विचित्र आणि धोकादायक प्रवृत्ती वाढत चालली आहे “कोणत्या धर्माने काय खावे, कुणाच्या घरात काय शिजावे हे राजकारणी ठरवत आहेत!” एखाद्या देशाची ओळख ही त्याच्या विविधतेमुळे असते, त्याच्या खाद्यसंस्कृती, परंपरा, आणि व्यक्तिगत निवडींमुळे असते पण आज काही राजकारणी व्यक्तिशः पातळीवर जाऊन, धर्माच्या आधारावर ताटात काय असावे याचेही राजकारण करत आहेत. धर्म, जात, परंपरा या प्रत्येकाचा सन्मान व्हायलाच हवा. मात्र एखाद्या धर्माला धक्का लागतो म्हणून दुसऱ्या धर्मातील अन्नपदार्थावर बंदी घालणे, किंवा त्यास राजकीय मुद्दा बनवणे, हे लोकशाहीच्या तत्त्वांना धरून नाही. दुर्दैव हे की, हेच लोक जेंव्हा प्रश्न येतो विषारी, भेसळयुक्त अन्न, रसायनांनी भरलेल्या पिकांचे, तेव्हा गप्प बसतात. ना ते कृषी कायदे काटेकोरपणे अंमलात आणतात, ना अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करतात, ना फूड सॅम्पलिंग किंवा गुणवत्तेच्या तपासण्या नियमित करतात. साधा प्रश्न आहे “कोण काय खातो, याच्यावर राजकारण करणाऱ्या नेत्यांनी हे का सांगितलं नाही की, तुम्ही जे खात आहात ते शुद्ध आहे की नाही?” काहींना कोणती भाजी खावी हे सांगणाऱ्या नेत्यांनी कधीही हे सांगितले नाही की, त्या भाजीत किती किटकनाशक आहे. दूध पिण्याचा सल्ला देणाऱ्यांनी कधी तपासलं नाही की, ते दूध कोणत्या केमिकल्सने पातळ केलं गेलं आहे. हे दुटप्पीपणं आता सर्वसामान्य जनतेनं ओळखलं पाहिजे. आज गरज आहे ती सजग मतदाराची, जो प्रतिनिधी निवडताना त्याच्या भूतकाळाचा, कार्यशैलीचा, आणि विचारसरणीचा अभ्यास करतो. धर्माच्या आणि ताटातल्या नावावर भांडण लावणारे नव्हे, तर भविष्यात आपल्या घरात शुद्ध अन्न, स्वच्छ पाणी, आणि सुरक्षित जीवन मिळेल यासाठी आवाज उठवणारे प्रतिनिधी आपल्याला निवडायला हवेत. कारण मतपेढ्या जिंकण्यासाठी पेटवले जाणारे हे विषय उद्याच्या आपल्या पिढीच्या आरोग्यावर पडणाऱ्या परिणामांपासून लक्ष विचलित करणारे आहेत. तर मग ठरवूया आपला प्रतिनिधी असा असावा जो “कोण खाल यावर नाही”, तर “कोण चांगलं खाईल यासाठी” लढा देईल. जागरूक नागरिकत्वाची जाणीव करणारा विचार! आपण ठरवूया – मतदान करताना ‘धर्म’, ‘जाती’, ‘भावना’ यांच्याऐवजी ‘स्वच्छता’, ‘सत्शासन’, ‘नैतिकता’ यांना महत्त्व द्यायचं. कारण भविष्यातील पिढीसाठी आपली हीच निवड आधारभूत ठरणार आहे.

“मतदान हीच खरी क्रांती : तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा” त्यांची टक्केवारी तुमची मृत्यूची वारी Read More »

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्रीय स्तरावर देशात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत. या दोन्ही आयोगांशी निगडीत विषय वेगेवगळे आहेत. त्यामुळे दोन स्वतंत्र आयोग असणे आवश्यक आहे. तसेच 51 व्या जनजाती सल्लागार परिषदेत महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार हा आयोग स्थापन करण्यात येत आहे. या आयोगाची रचना राज्य अनुसूचित जाती आयोगप्रमाणेच एक अध्यक्ष व चार अशासकीय सदस्य अशी राहील. आयोगाकरिता नव्याने 26 पदे निर्माण करण्यात येणार आहेत. या पदांसाठीचे तसेच आयोगाचे सदस्य यांचे वेतन, भत्ते आणि कार्यालयासाठी भाडे तत्वावर जागा, फर्निचर, वीज, दूरध्वनी, इंधन यांसह अनुषंगिक खर्चासाठी 4 कोटी 20 लाख रुपयांच्या तरतूदीस बैठकीत मान्यता देण्यात आली. दरम्यान, अनुसूचित जाती आयोग देखील स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे. या दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा मिळावा यासाठी मंत्रिमंडळाने तत्वतः मान्यता दिली. त्यासाठीही आगामी काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना; राज्य सरकारचा मोठा निर्णय Read More »

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलासा; शरद पवार प्रकरणात निर्दोष मुक्तता

Gopichand Padalkar : नेहमी काहींना काही कारणाने राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय असणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज बारामती न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त आरोपातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी 2020 मध्ये कोरोनाच्या काळात शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे. असं वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या विरोधात त्यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पडळकर यांना वारंवार समन्स बजावून देखील न्यायालयात हजर राहिले नव्हते. आज न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलासा; शरद पवार प्रकरणात निर्दोष मुक्तता Read More »

जामखेड येथे तरुणावर गोळीबार, सहा जणांना 24 तासांच्या आत अटक

Ahilyanagar Crime : नगर जिल्ह्यातील जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी (दि. 1 जून) रात्री 10 च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना, फिर्यादीने येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारावर गोळीबार केला. यामधील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. जामखेड येथील पोकळे वस्तीतील रहिवासी आदित्य बबन पोकळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री 10 वाजता विंचरणा नदीजवळ त्याच्या घरासमोर काही महिला आणि नागरिक बसले होते. यावेळी एका वाहनातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी संबंधित ठिकाणी लघुशंका करण्यास सुरुवात केली. आदित्यने त्यांना येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितले. याचा राग आल्याने त्या तिघांनी आदित्यला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तिथे आलेल्या कुणाल बंडू पवार (वय 20, रा. जामखेड) याच्यासह आदित्यवर आरोपींनी पिस्तूलातून गोळीबार केला. गोळीबारात कुणाल जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तत्काळ पाऊले उचलत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपली तपास यंत्रणा कार्यरत केली. हा गुन्हा प्रभू रायभान भालेकर (राहणार संभाजीनगर व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. हे आरोपी नेवासा मार्गाने जात असल्याचे समजतच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये पथकाने पंचासमक्ष प्रवरासंगम, ता.नेवासा येथे सापळा रचुन प्रभू रायभान भालेकर, नकुल विष्णु मुळे, शरद अंकुशराव शिंदे, गणेश गोविंद आरगडे, रावबहादुर श्रीधर हारकळ, सुशील ताराचंद गांगवे अशांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत या घटनेतील सहा आरोपींना तत्काळ अटक केली आहे. या आरोपीने मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास जामखेड पोलीस करत आहे.

जामखेड येथे तरुणावर गोळीबार, सहा जणांना 24 तासांच्या आत अटक Read More »