Sunil Tingre : भाजप-राष्ट्रवादीचा वाद चिघळला; सुनील टिंगरेंचे फडणवीसांना थेट पत्र

sunil tingre

Sunil Tingre : राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील घटक पक्ष असले, तरी पुणे महापालिकेतील राजकारणात दोन्ही पक्षांमधील संघर्ष वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना विकासनिधी देताना अन्याय होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना समान निधी मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा विकासनिधी थेट शून्य करण्यात आल्याचा दावा टिंगरे यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, भविष्यातही पक्षाच्या इतर नगरसेवकांचा निधी रोखला जाण्याची चर्चा असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पुणे महापालिकेतील या वादाची ठिणगी राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरूडमधील विकासकामांच्या चौकशीसाठी स्थायी समितीसमोर प्रस्ताव मांडल्यानंतर पडली. या प्रस्तावाला सुहास टिंगरे यांनी अनुमोदन दिले होते. त्यानंतर महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे बालवडकर यांच्याविरोधात तक्रार केली होती. आता राष्ट्रवादीकडून भाजपच्या महापालिकेतील कारभाराबाबत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकांवर असली, तरी महायुतीचा धर्म आणि पुणे शहराच्या विकासाचा विचार करून पक्षाने अनेक ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतल्याचे टिंगरे यांनी पत्रात नमूद केले आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतही राष्ट्रवादीने सहकार्य केले होते. भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विकासनिधी आणि विषय समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात अंदाजपत्रकात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अपेक्षित निधी मिळाला नसल्याचे टिंगरे यांनी म्हटले आहे. तसेच महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली की, राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळाले नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे.

या प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून परिस्थितीची माहिती दिल्याचेही टिंगरे यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही स्थानिक पातळीवर या प्रश्नावर ठोस तोडगा निघालेला नसल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सकारात्मक भूमिका घेतल्याचेही टिंगरे यांनी स्पष्ट केले आहे. विमाननगर येथील ‘भारत मंडपम’च्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला महापालिकेच्या मुख्यसभेत राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठिंबा देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे स्थानिक राजकीय मतभेदांचा परिणाम सामान्य नागरिकांच्या विकासकामांवर होऊ नये, अशी भूमिका सुनील टिंगरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना समान व न्याय्य विकासनिधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सुनील टिंगरे यांच्या या पत्रामुळे पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस या तक्रारीवर काय भूमिका घेतात आणि दोन्ही मित्रपक्षांमधील हा वाद कसा मिटवतात, याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *