Amol Khatal: संगमनेर तालुका म्हणजे काही जणांची जहागीरदारीच झाली होती. जमिनीचा सातबारा उतारा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नावावर असला, तरी प्रत्यक्ष मालकी दुसऱ्यांची असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, तालुक्यातील जनतेने परिवर्तन घडवून आणत मला काम करण्याची संधी दिली आहे, असे सांगत आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
तालुक्यातील पिंपळे येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नामदेव चकोर जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे वैद्यकीय सेल जिल्हाप्रमुख डॉ संतोष डांगे भाजपचे हरिश्चंद्र चकोर गणेश सानप सौरभ देशमुख सुशील शेवाळे अमोल आंधळे अमोल चकोर आकाश चकोर सुधीर घुगे कासिम मुजावर सार्थक शेवाळे शिवसेना शाखाप्रमुख संकेत राठी उपशाखा प्रमुख हरिभाऊ ढोणे कार्याध्यक्ष बाळासाहेब चकोर रविराज चकोर अंकुश चकोर सचिव लहानु कळस्कर रघुनाथ कोटकर मच्छिंद्र कोटकर संघटक विठ्ठल कोटकर अर्जुन कोटकर विराज चकोर खजिनदार खंडू वाघ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ पाटील म्हणाले की सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळेच आपण आमदार झालो आहोत. निवडणुका असोत अथवा नसोत, जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांचे प्रश्न सोडविणे हेच आपले कर्तव्य आहे. सामान्य कुटुंबातून पुढे आलेला कार्यकर्ता म्हणून मी जनतेच्या प्रश्नांची जाण ठेवून काम करीत आहे. माझ्याकडे कोणती पदवी आहे, यापेक्षा मी जनतेसाठी काय करतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. माझी नियत स्वच्छ आहे. मला माझ्या कुटुंबातील कोणालाही ठेकेदार बनवायचे नाही किंवा मुलाला राजकारणात आणायचे नाही. या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने दिलेले प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी संपत्ती आहे.
घरकुल योजनांसाठी जागेअभावी अडचणी येत असतील, तर अशा प्रकरणांमध्ये पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा करणार आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो, तरी जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. संगमनेरच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक तेथे सरकारकडे पाठपुरावा करू, प्रसंगी आंदोलनही करू. माझ्यासाठी आमदारकी ही पदाची प्रतिष्ठा मिरविण्याचे साधन नसून जनतेची सेवा करण्याची जबाबदारी आहे, असेही आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश चकोर यांनी केले. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ताराबाई माळी यांना साडी, तर युवराज माळी आणि पूनम माळी यांना पोशाख प्रदान करण्यात आले. प्रशांत कर्पे यांनी केले, तर खंडू वाघ यांनी आभार मानले.






