DNA मराठी

Pimpri-Chinchwad Municipal Corporation : ​पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठी कारवाई; लाचप्रकरणी मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे ACB च्या ताब्यात

pimpri chinchwad municipal corporation

​Pimpri-Chinchwad Municipal Corporation : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंबासे (वय ५७) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात संत तुकाराम नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे. पाणीपुरवठा दुरुस्ती व नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाच्या करारावर सह्या करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  

तक्रारदाराने पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाणीपुरवठा विभागाचे देखभाल-दुरुस्ती व नवीन पाईपलाईन टाकण्याचे एकूण ९१ लाख ५७ हजार ६८ रुपयांचे ५ टेंडर घेतले होते. या पाचही कामांचे वर्क ऑर्डर मिळवण्यासाठी महापालिकेसोबत करारनामा करणे आवश्यक होते. सर्व सह्या करून या फाईल्स पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्या सहीसाठी महापालिकेत जमा करण्यात आल्या होत्या.  

​सुरुवातीला अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांनी टेंडर रकमेच्या ०.५ टक्के म्हणजेच ४५,७८५ रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाच देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर तीन फाईल्सवर सह्या करून मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांच्याकडे पाठवण्यात आल्या. फाईल्स अनेक दिवस प्रलंबित राहिल्याने तक्रारदाराने २९ मे २०२६ रोजी ओंबासे यांची भेट घेतली असता ओंबासे यांनी देखील करारनाम्यावर सह्या करण्यासाठी ०.५ टक्के दराने ४५,७८५ रुपयांची मागणी केली. याबाबत ११ जून २०२६ रोजी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली.  

​एसीबीने ११ जून २०२६ रोजी केलेल्या पडताळणी कारवाईत, आरोपी प्रमोद ओंबासे यांनी त्यांच्या टेबलवर असलेल्या ३ फाईल्सच्या (३८ लाख रुपये टेंडर रक्कम) ०.५ टक्के प्रमाणे १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांनी यापूर्वी देखील तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांना गुरुवारी एसीबीने ताब्यात घेतले.

या प्रकरणी आरोपी प्रमोद सुधाकर ओंबासे यांच्याविरोधात संत तुकाराम नगर पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अंतर्गत गुन्हा (रजिस्टर नंबर ५७९/२०२६) दाखल करण्यात आला आहे. ​ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या पथकाने केली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ आणि पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके,  पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव, कैलास महामुळकर आणि चंद्रकांत कदम यांनी केली.

​या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *