DNA मराठी

Mangesh Chivate : शिक्षक आमदारकीच्या तिकिटासाठी मंगेश चिवटे यांची कर्नाटकातून फिल्डिंग; घेतली अमित शहा यांची भेट

img 20260923 wa0003

Mangesh Chivate : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीतील रंगात दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि पुणे शिक्षक मतदार संघातील इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांनी कर्नाटकातील भाजपचे वजनदार नेते आणि के. एल. ई. शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा माजी खासदार डॉ.प्रभाकर कोरे आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मार्फत यांच्यामार्फत कर्नाटकातील हुबळी येथे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन शिक्षक आमदारकीच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.

के. एल. ई. संस्थेच्या हुबळी येथील वैद्यकीय महाविद्यालय उदघाटनासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे स्वागत देखील मंगेश चिवटे यांनी केले. याच दरम्यान , के.एल.ई. चे सर्वेसर्वा माजी खासदार प्रभाकर कोरे यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारी साठी आपला शब्द टाकला असल्याचे समजते.

एकूणच पुणे शिक्षक ही जागा शिवसेनेच्या पदरात पाडून घेऊन महायुतीची उमेदवारी मिळवण्यासाठी मंगेश चिवटे यांनी कर्नाटकातून जोरदार फिल्डिंग लावली असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

लिंगायतभूषण माजी राज्यसभा खासदार डॉ प्रभाकर कोरे यांस नुकताच पद्मश्री हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर डॉ प्रभाकर कोरे यांचा पुणे आणि मुंबईत लिंगायत समाजाच्या वतीने जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यामध्ये मंगेश चिवटे यांनी पुढाकार घेतला होता. पुणे येथील याच कार्यक्रमात लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी लिंगायत समाजातील मंगेश चिवटे या तरुण कार्यकर्त्याच्या मागे पुणे शिक्षक निवडणूकीत आपल्या नेतृत्वाखालील रयत शिक्षण संस्थेची अदृश्य ताकद पाठीशी ठेवा असे जाहीर आवाहन व्यासपीठावर उपस्थित जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांस केले होते.

दरम्यान, भाजपनेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक हे बुद्धिजीवी वर्गाचे मतदार संघ असून भाजपचे परंपरागत मतदारसंघ असल्याचा दावा करत यापैकी एकही मतदारसंघ महायुतीतील शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटकपक्षाला सोडणार नसल्याची भीमगर्जना केली आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल येथील आपले कार्यकर्ते भैय्यासाहेब माने यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पुणे पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावा आणि पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपने घ्यावा असे परस्पर जागावाटप जाहीर केले आहे. यावर आक्षेप घेत कोल्हापूरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी जागा वाटप विषयावर राज्यातील महायुतीतील शिर्षस्थ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार घेतील.

जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याने परस्पर जागावाटप जाहीर करू नये अशी ठाम भूमिका घेतली आहे. तसेच, मंगेश चिवटे यांनी गेल्या 2 वर्षांपासून पुणे शिक्षक मतदारसंघात सर्व 5 जिल्ह्यात चांगली बांधणी केली असून महायुतीमध्ये चिवटेच उजवे उमेदवार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *