DNA मराठी

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात

gautami patil

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आणि तरुणाईची तुफान गर्दी त्यात काही तरुणांकडून झालेली हुल्लडबाजी या सगळ्यामुळे शेवगाव शहरातील खंडोबानगर येथील खंडोबा मैदानावर रविवारी काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांना अखेर मैदानात हस्तक्षेप करावा लागला. तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.गणेशभक्त आणि रसिक प्रेक्षकांसाठी आयोजित भव्य सांस्कृतिक महोत्सवात सायंकाळी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेवगावसह परिसरातील तरुणांनी खंडोबा मैदानाकडे मोठी गर्दी केली. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मैदान आणि परिसर गर्दीने फुलून गेला होता. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर गर्दीत आणखी वाढ झाली आणि काही वेळातच तरुणांचा उत्साह हुल्लडबाजीकडे वळला.

तरीही तरुण ऐकेनात…

गर्दी वाढत असताना काही तरुणांकडून गोंधळ सुरू झाला. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी धावपळ निर्माण झाली. संयोजक आणि पोलिसांकडून गर्दीला शिस्त लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र, काही तरुणांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. अखेर पोलिसांनी पुढाकार घेत गर्दीला मागे हटवण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर गर्दी काही प्रमाणात नियंत्रणात आली.

कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गौतमी पाटील यांनी पोलिस प्रशासनाचे कौतुक केले. पोलीस प्रशासनामुळे माझे कार्यक्रम सुखरूप आणि चांगले होतात असे सांगत त्यांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले.कार्यक्रमांमध्ये मोठी गर्दी होते आणि त्यामुळे अनेकदा गोंधळाच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या बंदोबस्तामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडण्यास मदत होते, असेही गौतमी पाटील यांनी सांगितले.

संस्कृती बिघडते, असे कार्यक्रम होऊ नयेत या प्रश्नावर गौतमींचे मौन

प्रसारमाध्यमांनी गौतमी पाटील यांना अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ नयेत, यामुळे कुठेतरी संस्कृती बिघडते, त्यामुळे असे कार्यक्रम बंद व्हायला हवेत का?असा सवाल केला.यावर गौतमी पाटील यांनी सध्या या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. मला आत्ता सध्याला त्या गोष्टीवर बोलायचं नाही. त्यावेळेस मला वाटेल, त्यावेळेस मी बोलेल अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

गौतमीच्या कार्यक्रमाला तरुणाईची क्रेझ

गौतमी पाटीलच्या लावणी आणि नृत्याची तरुणाईमध्ये मोठी लोकप्रियता आहे. तिच्या कार्यक्रमांच्या चित्रफिती सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याने तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होताना दिसते. शेवगावमधील कार्यक्रमालाही त्याचा प्रत्यय आला. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण मैदानात दाखल झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *