Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली. हे आपले निर्णायक आणि शेवटचे आमरण उपोषण असल्याचे जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
उद्यापासून बोलणे शक्य होणार नाही, त्यामुळे आजच समाजाशी संवाद साधत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाने मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल व्हावे आणि आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्रांची मागणी
शिंदे समितीला सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे तत्काळ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी जरांगे पाटील यांनी केली. गावागावातील पात्र बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचे स्पष्ट होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, मात्र अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांनी अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ज्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे, पण तो स्वीकारण्यात आलेला नाही, अशांनीही अंतरवालीत यावे, असे त्यांनी सांगितले. कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, मात्र जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशांनीही आपापल्या नोंदी घेऊन अंतरवाली सराटीत यावे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. संबंधितांकडून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
‘कुणबी प्रमाणपत्र पुरेसे नाही, जात वैधता कशी देणार?’
केवळ कुणबी प्रमाणपत्र देऊन प्रश्न सुटणार नाही, तर जात वैधता प्रमाणपत्र कसे दिले जाणार? याची स्पष्ट माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांच्या जात वैधतेचा प्रश्न तातडीने सोडवावा आणि पात्र असलेल्या सर्व प्रकरणांची वैधता करावी, अशी त्यांची भूमिका आहे. हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करावी आणि त्यानंतर जात वैधता कशी केली जाणार, याची स्पष्ट कार्यपद्धती सरकारने जाहीर करावी, असे ते म्हणाले. ‘फक्त प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन मान्य नाही त्याच्या वैधतेबाबतही स्पष्ट अंमलबजावणी हवी,’ असा इशारा त्यांनी दिला.
सातारा, कोल्हापूर आणि औंध संस्थांच्या जीआरची मागणी
सातारा संस्था, कोल्हापूर संस्था आणि औंध संस्थांबाबतचे जीआर तातडीने काढून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या संस्थांच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभांसाठी जात वैधता कशी केली जाणार, हेही सरकारने स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. केवळ जीआर काढून पुन्हा समाजाची फसवणूक करू नये. यापूर्वी मागण्या मान्य करण्यात आल्या, मात्र त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. ‘करू, करू’ म्हणता म्हणता 75 वर्षे गेली, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.
‘सरकारवर पूर्णपणे भरोसा ठेवू नका’
मराठा समाजाने यापुढे सरकारवर पूर्णपणे भरोसा ठेवणे बंद करावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. ‘आपला पक्ष, आपला नेता कोणीही नाही; या जगात फक्त जात आपली आहे,’ असे ते म्हणाले. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला लढा आता विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा त्यांनी केला. ही शेवटची फाईट असून गाफील राहू नका, दगाफटका होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी समाजाला दिला.
‘मी तुमच्या लेकराबाळांसाठी जीव द्यायला तयार’
मराठा समाजाने अंतरवाली सराटीकडे मोठ्या संख्येने धावून यावे, असे भावनिक आवाहन जरांगे पाटील यांनी केले. ‘सगळ्यांनी बाहेर पडा, मी तुमच्या लेकराबाळांसाठी जीव द्यायला तयार आहे,’ असे ते म्हणाले. सलग तीन वर्षे मुलांच्या भविष्यासाठी लढत असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला त्रास झाल्यानंतर आपण जसे धावून जातो, तसेच अंतरवाली सराटीकडे धावून या, असेही त्यांनी म्हटले.
SEBC-EWS मधील नियुक्त्यांवरही ठाम भूमिका
SEBC आणि EWSमधून निवड झालेल्यांना नियुक्त्या मिळेपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. तसेच महामंडळाचे सर्व परतावे देण्याची मागणीही त्यांनी केली. एकूणच, कुणबी प्रमाणपत्रांसोबत जात वैधता, सातारा-कोल्हापूर-औंध संस्थांचे जीआर, SEBC-EWS मधील नियुक्त्या आणि महामंडळाच्या परताव्यांसह विविध मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेत जरांगे पाटील यांनी आपले उपोषण निर्णायक असल्याचे स्पष्ट केले आहे.






