Shivsena Symbol Hearing : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर नेमका अधिकार कोणाचा, तसेच 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर त्यांच्या गटातील आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न यावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करताना पक्षाची घटना, पक्षप्रमुखांचे अधिकार, विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षातील फरक, आमदारांची भूमिका आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले.
2022 मध्ये नेमकं काय घडलं?
सिब्बल यांनी न्यायालयासमोर 2013 पासून 2022 पर्यंतच्या शिवसेनेतील घडामोडींचा घटनाक्रम मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरे हे पक्षाच्या घटनेनुसार शिवसेनेचे पक्षप्रमुख होते आणि एकनाथ शिंदे यांचीही पक्षातील महत्त्वाच्या पदावर नियुक्ती उद्धव ठाकरे यांनीच केली होती.
20 जून 2022 रोजी विधान परिषद निवडणुकीत काही आमदारांनी क्रॉस-व्होटिंग केल्यानंतर पक्षातील संघर्ष उफाळून आला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 31 आमदार आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. हे अचानक घडलेले किंवा केवळ नाराजीमुळे झालेले बंड नसून त्यामागे आधीपासून नियोजन होते, असा दावा सिब्बल यांनी केला.
शिंदेंना गटनेतेपदावरून हटवण्याचा मुद्दा
शिंदे गटाच्या हालचाली समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 21 जूनला बैठक बोलावली आणि एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.
तसेच सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती पक्षाच्या नेतृत्वाने केली होती, असा मुद्दाही त्यांनी मांडला.
यानंतर शिंदे गटातील आमदारांनी स्वतंत्रपणे शिंदे यांची गटनेतेपदी आणि नवीन प्रतोदाची निवड केली. आमदारांना पक्षप्रमुखाचा निर्णय बदलण्याचा अधिकार आहे का? हा या संपूर्ण वादातील महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न असल्याचे सिब्बल यांच्या युक्तिवादातून स्पष्ट झाले.
‘विधिमंडळ पक्ष’ आणि ‘राजकीय पक्ष’ वेगळे
सिब्बल यांच्या युक्तिवादाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे एकच नसतात, हा मुद्दा. त्यांच्या मते, एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष नव्हे. त्यामुळे विधानसभेतील आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून त्या गटालाच संपूर्ण राजकीय पक्ष मानता येणार नाही.
याच आधारावर त्यांनी निवडणूक आयोगाने केवळ आमदारांच्या संख्येचा आधार घेऊन शिंदे गटाला खरी शिवसेना मानण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला.
31 आमदारांच्या भूमिकेवर सिब्बलांचा आक्षेप
सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला की, शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 31 आमदारांनी पक्षाच्या अधिकृत नेतृत्वाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांना पक्षाच्या बैठकीसाठी नोटिसा देण्यात आल्या होत्या, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
ठाकरे गटाच्या मते, पक्षाच्या अधिकृत आदेशाला न जुमानणे, स्वतंत्र नेतृत्व उभे करणे आणि सरकार बदलण्यासाठी दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घेणे हे केवळ अंतर्गत मतभेद मानता येणार नाहीत.
याच ठिकाणी घटनेतील दहावी अनुसूची म्हणजेच पक्षांतरबंदी कायदा महत्त्वाचा ठरतो. सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर पक्षाच्या अधिकृत नेतृत्वाविरुद्ध अशा प्रकारे निवडून आलेले आमदार गेले आणि तरीही त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली नाही, तर दहाव्या अनुसूचीचा उद्देशच काय उरतो?
भाजपच्या पाठिंब्याचा मुद्दाही न्यायालयात
सिब्बल यांनी गुवाहाटीत असतानाच्या घडामोडींचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, शिंदे गट भाजपच्या संपर्कात होता आणि सरकार बदलण्यासाठी आवश्यक राजकीय पाठिंबा मिळवण्याची प्रक्रिया सुरू होती.
ठाकरे गटाचा युक्तिवाद असा आहे की, ही केवळ शिवसेनेतील अंतर्गत नाराजी नव्हती; तर त्यातून विद्यमान सरकार पाडून नवे सरकार स्थापन करण्याची राजकीय प्रक्रिया सुरू झाली होती.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठा आक्षेप
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णयही या सुनावणीतील प्रमुख मुद्दा आहे.
सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेची 2013 आणि 2018 ची पक्षघटना अस्तित्वात होती आणि त्यानुसारच पक्षातील नेतृत्वाची रचना करण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडेही या पक्षघटनेची माहिती देण्यात आली होती, असा त्यांचा दावा आहे.
विशेष म्हणजे 2019 ते 2022 या कालावधीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे मंत्री असताना या पक्षघटनेच्या वैधतेवर शिंदे गटाने आक्षेप घेतला नव्हता, मग 2022 नंतरच ती अमान्य कशी ठरवली जाऊ शकते, असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला.
‘धनुष्यबाण’ नेमकं कुणाचं?
या सुनावणीतील एक मूलभूत प्रश्न असा आहे की निवडणूक चिन्ह हे विधिमंडळातील बहुमताचे प्रतीक आहे की राजकीय पक्षाचे?
सिब्बल यांचे म्हणणे आहे की चिन्ह हे राजकीय पक्षाचे असते. त्यामुळे विधानसभेतील आमदारांची संख्या जास्त असलेल्या गटाला आपोआप पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळू शकत नाही.
यामुळेच निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाच्या प्रक्रियेची घटनात्मक वैधता तपासण्याची गरज असल्याचा ठाकरे गटाचा आग्रह आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरही प्रश्न
सिब्बल यांनी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला. त्यांच्या मते, आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यात झालेल्या विलंबामुळे पक्षांतरबंदी कायद्याचा प्रभावच कमी झाला. दरम्यान शिंदे गटाचे सरकार सत्तेत राहिले आणि त्यानंतर त्या सरकारने आपला कार्यकाळही पूर्ण केला.
ठाकरे गटाचा युक्तिवाद असा आहे की, जर अपात्रतेच्या याचिकांवर वेळेत निर्णय झाला असता, तर पुढील अनेक राजकीय निर्णयांची दिशा वेगळी असू शकली असती.
2023 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ
या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी 2023 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकालही महत्त्वाचा आहे. त्या निकालात तत्कालीन राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्याची प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या चुकीची असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याआधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने त्यांचे सरकार पुन्हा स्थापित करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे आता सुरू असलेली सुनावणी ही केवळ 2022 मधील सरकार कोसळण्यापुरती मर्यादित नाही. शिवसेना पक्षाची ओळख, पक्षाचे नाव-चिन्ह, आमदारांची अपात्रता आणि पक्षांतरबंदी कायद्याची अंमलबजावणी या सर्व मुद्द्यांशी ती जोडलेली आहे.






