DNA मराठी

Tukaram Munde: राज्यात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई

paneer

Tukaram Munde : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने अॅनालॉग पनीरवर एक वर्षासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जारी केलेल्या आदेशानुसार ॲनालॉग पनीरचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि वापर यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग सेवा आणि इतर खाद्य व्यावसायिकांनाही ॲनालॉग पनीर वापरता येणार नाही.

ॲनालॉग पनीर हे पारंपरिक दुधाच्या पनीरऐवजी वनस्पतीजन्य तेल, स्टार्च आणि इतर घटकांपासून तयार केले जाते. दिसायला ते पनीरसारखे असले तरी त्याची गुणवत्ता आणि पोषणमूल्ये वेगळी असतात. अनेक ठिकाणी ग्राहकांना याची स्पष्ट माहिती न देता ते पनीर म्हणून विकले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक थांबवणे आणि सुरक्षित अन्न उपलब्ध करून देणे हा उद्देश ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. बंदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, विक्रेते किंवा खाद्य व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, ग्राहकांनी पनीर खरेदी करताना उत्पादनावरील माहिती, लेबल आणि दर्जा तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *