Vivek Kolhe : माझा स्वभाव सकारात्मक राजकारण करण्याचा आहे. दुसऱ्याची रेघ पुसण्यापेक्षा आपली रेघ कशी मोठी करता येईल, यावर माझा विश्वास आहे. मात्र, जाणीवपूर्वक कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर किती संयम ठेवायचा यालाही एक मर्यादा असते. लक्षात ठेवा, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’,” अशा अत्यंत कडक शब्दांत नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांनी विरोधकांना आणि पर्यायाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना जाहीर इशारा दिला आहे.
राहाता शहरात आयोजित एका सत्कार समारंभादरम्यान सभेत नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे हे बोलत होते. सर्वपक्षीय उपस्थिती आणि वाढती ताकद या सभेला मिळाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती यावेळी होती
या सर्वपक्षीय प्रेमाचा उल्लेख करत विवेक कोल्हे म्हणाले की, “अनेक टीका-टिप्पण्या आणि क्रॉस फायरिंग झाली, पण आज मला केवळ टीका करायची नाही. हा जो वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांचा पाठिंबा मिळतो आहे, हीच माझी खरी ताकद आहे
‘गणेश’ कारखान्यावरून विरोधकांना टोला
शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या ‘गणेश’ कारखान्याच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “दोन-तीन वर्षांनी पुन्हा निवडणुका येतील, तेव्हा लोकशाही मार्गाने सभासदांसमोर जा आणि मते मागा. पण, आता अशा पद्धतीने कायदेशीर अडथळे आणून शेतकऱ्यांची कामधेनू अडचणीत आणू नका,” अशी नम्र विनंती त्यांनी केली. तसेच जर विरोधक ऐकणार नसतील, तर संस्थेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री यांनी लावला छातीवर बिल्ला:
आपल्या आमदारकीचा उल्लेख करताना कोल्हे म्हणाले, “मला आमदारकी रूपी जो सातबारा मिळाला आहे, तो बिल्ला खुद्द मुख्यमंत्री यांनीच माझ्या छातीवर लावला आहे त्यामुळे कुणीही काळजी करण्याची गरज नाही. या सातबाऱ्याच्या पोटहिश्श्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्तेच आहात असे कोल्हे म्हणाले.
आधी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यापुरते मर्यादित असलो, तरी आता आपले कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ हे आहे. यामध्ये राहता आणि लोणी परिसर आवर्जून येतो, याची मला पूर्ण जाणीव आहे. कामासाठी पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे जाण्याची आपली तयारी आहे, मात्र जाणीवपूर्वक जर कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, तर मी भाऊ आणि सहकारी म्हणून खंबीरपणे पाठीशी उभा राहीन,” असा ठाम विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.






