DNA मराठी

Devendra Fadnavis: ऑपरेशन तुतारी अन् वर्षा बंगल्यावर जयंत पाटील CM फडणवीसांना भेटीला; तासभर चर्चा

devendra fadnavis

Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेही उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या भेटीमुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

अलीकडेच जयंत पाटील यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीमुळे शरद पवार गटाच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीतील काही महत्त्वाच्या घडामोडींवर या बैठकीत चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीवरून अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा सुरू असतानाच ही बैठक पार पडल्याने तिचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे. मात्र या भेटीचा पक्षांतर्गत वादाशी संबंध नसल्याचे संकेत काही नेत्यांनी दिले असून, कोणताही राजकीय निर्णय किंवा पक्षांतराचा विषय चर्चेत नसल्याचेही सांगितले जात आहे. तरीही या बैठकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातील संभाव्य समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *