Sharad Pawar on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे बोलताना देशातील नागरिकांना पुढील एका वर्षासाठी सोने खरेदी टाळण्याचे तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या बचतीसाठी जास्तीत जास्त वर्क फ्रॉर्म होम आणि विदेशी प्रवास टाळण्याचे आवाहन केल्याने देशात सध्या खळबळ उडाली आहे.
विरोधक मोदी यांच्या या आहवानानंतर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी देखील यावर भाष्य करत प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविण्याचा सल्ला दिला आहे.
शरद पवार यांनी एक्सवर म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे असं शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली?
पुढील एका वर्षासाठी सोन्याची खरेदी टाळा
वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा
नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
परदेश प्रवास टाळा
खाद्यतेलाचा वापर कमी करा






