DNA मराठी

Devendra Fadnavis: अमराठी चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ शिकविण्याचा परिवहन विभागाचा पुढाकार

Devendra Fadnavis: राज्यातील प्रवासी सेवा अधिक सुसंवादी व प्रभावी करण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाने अमराठी चालकांना ‘व्यवहारिक मराठी’ शिकविण्याचा महत्त्वपूर्ण पुढाकार हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या संक्षिप्त मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

ही पुस्तिका विशेषतः रिक्षा, टॅक्सी तसेच Ola आणि Uber सारख्या प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनचालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या सोप्या व आवश्यक मराठी वाक्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला असून, प्रवाशांशी सुसंवाद साधताना भाषेची अडचण येऊ नये आणि सेवा अधिक सुलभ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सेवा देताना स्थानिक भाषेचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. ‘व्यवहारिक मराठी’च्या माध्यमातून चालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल आणि सेवेत गुणात्मक सुधारणा घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परिवहन विभागाच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, पुढील काळात राज्यभर अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही पुढाकार घेऊन मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *