Ram Shinde: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी व पुणे जिल्ह्यातील बारामती या विधानसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय भाजपने 40जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचाही समावेश आहे. त्यांनी राहुरी मतदार संघातील भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या उमेदवारी दाखल करण्याच्या वेळी आवर्जून उपस्थित राहून प्रचाराला सुरुवात केली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती व राहुरी विधानसभा मतदार संघात येत्या 23 एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजित राष्ट्रवादीने व राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय व प्रदेश भाजपने तब्बल 40 स्टार प्रचारकांची फळी मैदानात उतरवली आहे. भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाकडून ही यादी निवडणूक आयोगाकडे अधिकृतरित्या सादर करण्यात आली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे व नगरचे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे केंद्रीय व राज्यातील मंत्रीही या स्टार प्रचारकांमध्ये आहेत.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी यापूर्वी तेलंगणा, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान व कर्नाटक या राज्यांमधील निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. या राज्यांमधील महत्त्वाच्या मतदारसंघात त्यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार व प्रसार केला होता. आता राहुरी व बारामती मतदार संघातील महायुतीच्या प्रचारात ते सक्रिय सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे प्रा. राम शिंदे यांना स्टार प्रचारक म्हणून संधी देत भाजपाने त्यांच्या राजकीय वजनाला अधोरेखित केले आहे. बारामती व राहुरी या दोन्ही मतदारसंघांकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.
भाजपने या निवडणुकीसाठी राज्यातील आणि केंद्रातील प्रभावी नेत्यांची फळी मैदानात उतरवून प्रचार मोहीम आक्रमक करण्याचे संकेत दिले आहेत. विशेषतः बारामतीसारख्या प्रतिष्ठेच्या लढतीत पक्षाने संपूर्ण ताकदीनिशी झोकून देण्याची रणनीती आखली आहे. राहुरी मतदारसंघातही स्थानिक मुद्द्यांबरोबरच राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे.






