DNA मराठी

Pune Crime: धक्कादायक! हळदीच्या पाकिटांतून गांजाविक्री; दोघांना अटक

Pune Crime : हळदीच्या पाकिटांच्या आडून गांजाची विक्री करणाऱ्या दोन जणांना बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत एकूण १६ किलो गांजा तसेच परदेशी चलन जप्त करण्यात आले.

अभिषेक बोर्से आणि अक्षय बोर्से (रा. पिंपरी-चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे शहरातील विविध भागांत गांजाची विक्री करत होते. संशय टाळण्यासाठी त्यांनी गांजा हळदीच्या पाकिटांत लपवून ठेवण्याची युक्ती वापरली होती. तसेच दोघे एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याचे भासवत होते.

बाणेर परिसरात दुचाकीवरून येऊन ते गांजाविक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या पिशवीत हळदीची पाकिटे आढळली. तपासणी केल्यावर त्यामध्ये गांजा लपविल्याचे स्पष्ट झाले. या वेळी सुमारे तीन किलो गांजा जप्त करण्यात आला.

पुढील चौकशीत आरोपींनी पिंपरी-चिंचवड येथील त्यांच्या घरात आणखी साठा असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी घरावर छापा टाकून १३ किलो गांजा हस्तगत केला.

दरम्यान, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास सुरू करण्यात आला असून गांजा कोठून आणला आणि कोणाला विक्रीसाठी ठेवला होता, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *