Sujay Vikhe : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश संघटनात महत्त्वपूर्ण बदल करत भारतीय जनता पक्षने अहिल्यानगर जिल्ह्याचे युवा नेतृत्व आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्ह्यातील सक्रिय, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. खासदार म्हणून त्यांनी विविध विकासकामांसाठी पाठपुरावा केला असून युवक आणि ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याचे मानले जात आहे.
प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल आणि राज्यभरात भाजपची ताकद वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात राज्याच्या राजकारणात डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






