Ahilyanagar Police: स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत केडगाव येथील अनोळखी व्यक्तीच्या हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना 22 जून रोजी एक अनोळखी पुरूष जखमी अवस्थेत केडगाव इंडस्ट्रियल एरियामधील नागछाप हिंग कंपनीच्या मोकळया जागेत आढळला होता. या व्यक्तीला पुढील उचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मयत घोषित केल्याने या प्रकरणात कोतवाली पोलीस स्टेशन येथे वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीवरून बीएनएस कलम 103 (1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात तपास करत असताना पोलिसांनी घटनाठिकाणचे जवळील व केडगाव ते कायनेटीक चौक, अहिल्यानगर मार्गावरील 20 ते 25 सीसीटीव्ही फुटेज तपासून संदेश संजय क्षेत्रे, अमन असीरमिया शेख आणि मंगेश कालीदत्त कांबळे, सर्व रा.केडगाव, अहिल्यानगर या आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून मयताचे आधारकार्ड मिळून आले. आधारकार्डवरून मयत हा बोबडा अनारसिंग, रा.सुखपुरी, जैनाबाद, बुरहानपूर, मध्यप्रदेश असल्याचे निष्पन्न झाले.
मयतास लुटमार करण्याच्या उद्देशाने लाकडी काठी व दगडाने मारहाण करण्यात आली असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे.