DNA मराठी

DNA Test म्हणजे काय? कशी केली जाते तपासणी?

What is a DNA test? How is the test done?

DNA Test – मुंबई – गुन्हेगारी तपास, पितृत्व निश्चिती, वारसा विवाद तसेच वैद्यकीय निदान यांसाठी ‘डीएनए टेस्ट’ म्हणजेच DNA चाचणी आज सर्वात विश्वसनीय वैज्ञानिक साधन मानली जाते. डीएनए म्हणजे ‘डिऑक्सीरायबोन्युक्लिक अ‍ॅसिड’, जे प्रत्येक माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये आढळतं आणि त्याची आनुवंशिक ओळख सांगतं. कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये ९९.९९ टक्के डीएनए सारखं असतं, मात्र उरलेला सूक्ष्म फरकच त्यांना वेगळं ठरवतो.

डीएनए टेस्ट म्हणजे काय?

डीएनए टेस्ट म्हणजे व्यक्तीच्या शरीरातील उदा. लाळ, रक्त, केस, त्वचा किंवा हाडांमधून मिळवलेल्या जैविक नमुन्यांमधून त्याचा जनुकीय संकेत (genetic code) तपासून त्या व्यक्तीची ओळख पटवण्याची प्रक्रिया.

हे विश्लेषण ‘डीएनए प्रोफाइलिंग’ किंवा ‘फिंगरप्रिंटिंग’ म्हणूनही ओळखलं जातं. या चाचणीद्वारे दोन व्यक्तींमध्ये रक्तसंबंध आहे का, गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेले नमुने कोणाचे आहेत, हे निश्चित करता येतं.

कशी केली जाते डीएनए तपासणी

1. नमुना संकलन (Sample Collection)

   – रक्त, केस, लाळ, त्वचा किंवा हाडं यांपासून नमुना घेतला जातो.

   – बहुधा गालामध्ये (buccal swab) कापसाने घासून लाळीचा नमुना घेतला जातो.

2. डीएनए वेगळं करणं (Extraction)

   – नमुन्यातून डीएनए वेगळं केलं जातं. ही प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असते.

3. डीएनएचे गुणवैशिष्ट्य पाहणे (Amplification & Profiling)

   – विशेष प्रयोगशाळांमध्ये ‘PCR’ तंत्रज्ञानाने डीएनए वाढवून त्याचा सखोल अभ्यास केला जातो.

   – STR (Short Tandem Repeat) पद्धतीने विशिष्ट जनुकांची तुलना केली जाते.

4. तुलना (Comparison):

    नमुन्याची तुलना इतर व्यक्तींच्या डीएनए प्रोफाइलशी केली जाते (उदाहरणार्थ, संशयित गुन्हेगार किंवा आई-वडील इ.)

कुठे वापर होते डीएनए तपासणीचं?

  1. गुन्हेगारी तपासात:-  गुन्ह्याच्या ठिकाणहून मिळालेल्या नमुन्यांवरून आरोपी ओळखण्यासाठी
  2. पितृत्व चाचणी – वडील ठरवण्यासाठी किंवा बालहक्क प्रकरणांमध्ये
  3. वारसा हक्क:- मालमत्तेतील दावे स्पष्ट करण्यासाठी
  4. वैद्यकीय कारणं:जनुकीय आजारांचे निदान किंवा संभाव्य जोखमीचे विश्लेषण
  5. ओळख पटवणे: अपघात, मृतदेहांची ओळख न पटल्यास
  6. कायद्याचा दृष्टिकोन

भारतामध्ये डीएनए चाचणीला न्यायालयीन मान्यता आहे. मात्र न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय कोणतीही वैयक्तिक डीएनए तपासणी करता येत नाही. डीएनए तज्ञ, वैज्ञानिक, फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि न्यायाधीश यांचं संयोजन यात आवश्यक असतं.

विश्वसनीयता व मर्यादा

डीएनए टेस्ट ९९.९९% अचूक असते, त्यामुळे न्यायालयांमध्ये ती खात्रीलायक पुरावा मानली जाते. मात्र नमुन्याचं दूषित होणं, प्रक्रिया अर्धवट असणं किंवा चुकीच्या सॉफ्टवेअर विश्लेषणामुळे परिणाम बिघडू शकतो.

नोंद घ्या

* भारत सरकारने “डीएनए टेक्नॉलॉजी (वापर व रेग्युलेशन) विधेयक” २०१९ मध्ये सादर केलं होतं.

* यामध्ये डीएनए डेटा बँक, नमुना घेण्याच्या अटी व व्यक्तीच्या गोपनीयतेचं संरक्षण यावर नियमावली आखण्यात आली आहे

निष्कर्ष

डीएनए टेस्ट ही आधुनिक विज्ञानातील अत्यंत सशक्त व अचूक ओळख पटवणारी प्रक्रिया आहे. ती केवळ गुन्हे उघडकीस आणण्यासाठीच नव्हे, तर कुटुंबीयांचे संबंध, वारसाहक्काचे प्रश्न, आणि वैद्यकीय समस्यांमध्येही अमूल्य ठरते. मात्र ती नैतिक व कायदेशीर चौकटीतच केली गेल्यास तिचा खरा उपयोग साध्य होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *