Uday Samant : सचिन सानप हे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यांना संविधानाने अधिकार दिला म्हणून ते निवडणुकीत उभारले आहेत, त्यामुळे ओळखत नाही, असे त्यांना हिणवू नये. सानप यांना कोण ओळखत नसतील तर येत्या 27 तारखेला ओळखतील. कोणाला कमी लेखू नका, काहीही होऊ शकतं. मी बोलेल तेच योग्य, असं म्हणणं चुकीचं आहे, नाही तर गोकुळ होतं, हे लक्षात ठेवा, असा इशारा शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना लगावला आहे.
पुणे मतदारसंघातील अपक्ष उमेदवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ओएसडी राहिलेले सचिन सानप यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या प्रचारासाठी सामंत आज सोलापुरात आले होते. त्या वेळी त्यांनी जयकुमार गोरे यांना टोला लगावला.
राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक चर्चेत आहे. सुरुवातीला या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार देण्यात आला होता मात्र महायुतीच्या बैठकीनंतर उमेदवार मागे घेण्यात आल्याने शिवसेनेत नाराजी निर्माण झाल्याची होती. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होत आहे. यातच आता दोन्ही पक्षांकडून राजकीय फटकेबाजी होताना दिसत आहे.






