DNA मराठी

Ram Shinde

ahilyanagar district bank election

Ahilyanagar District Bank Election : जिल्हा बँकेची निवडणूक : सहकारापेक्षा ‘घोडेबाजार’च चर्चेत?

Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक अजून जाहीर व्हायची आहे. मात्र, जिल्ह्यातील राजकीय वातावरणाने आधीच निवडणुकीचा रंग धारण केला आहे. सहकार क्षेत्राच्या निवडणुका पूर्वी विकास, आर्थिक शिस्त आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यांवर लढल्या जात असत. आता मात्र त्यांचे स्वरूप सत्तेच्या अंकगणितात अडकत चालल्याची भावना निर्माण होत आहे. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती “घोडेबाजार” आणि अंतर्गत राजकीय हालचालींची. पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कोपरगाव, राहुरी या तालुक्यांत विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींशी संपर्क, गाठीभेटी आणि मोर्चेबांधणी सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या चर्चांची सत्यता संबंधितांनाच माहीत; मात्र अशा चर्चांनाही वाव मिळणे, हेच सहकार चळवळीसाठी चिंतेचे लक्षण आहे. भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या निवडणुकीत सक्रिय भूमिका घेतल्याने समीकरणे बदलत आहेत. कर्जत-जामखेडच्या राजकारणापुरती मर्यादित असलेली त्यांची ताकद आता संपूर्ण जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणात कसोटीला लागणार आहे. दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार क्षेत्रातील प्रभाव कायम आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके हेही आपापल्या पातळीवर राजकीय मोर्चेबांधणी करत असल्याचे चित्र दिसते. या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक उत्सुकता आहे ती भाजपमधील अंतर्गत राजकीय हालचालींविषयी. एकाच पक्षातील वेगवेगळे प्रभावकेंद्रे आपापले संख्याबळ मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. ही स्पर्धा जर उघड संघर्षात बदलली, तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत मतभेदच अनेकदा निर्णायक ठरतात, हा सहकार क्षेत्राचा इतिहास आहे. सहकार संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जातात. त्या शेतकरी, सभासद आणि ग्रामीण उद्योगांच्या विश्वासावर उभ्या आहेत. अशा संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर विचारांपेक्षा व्यवहार, तत्त्वांपेक्षा तडजोडी आणि सेवाभावापेक्षा घोडेबाजार चर्चेचा विषय ठरू लागला, तर सहकाराच्या मूलभूत मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. जिल्हा बँकेची निवडणूक कोण जिंकणार, यापेक्षा ती कशा पद्धतीने लढवली जाते, हे अधिक महत्त्वाचे आहे. पारदर्शकता, लोकशाही आणि सभासदांचा विश्वास या तीन मूल्यांवरच सहकाराचे भविष्य टिकून राहणार आहे. अन्यथा प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ता बदलेल पण सहकार मात्र हरत जाईल.

Ahilyanagar District Bank Election : जिल्हा बँकेची निवडणूक : सहकारापेक्षा ‘घोडेबाजार’च चर्चेत? Read More »

img 20260614 wa0003

Ram Shinde: लेखी गहिवरल्या… जावई भारावले…

चौंडीचे धोंडे जेवण सभापती प्रा. शिंदेयांना देऊन गेले भरभरून कौतुक Ram Shinde : आई-वडील, भाऊ व जुन्या मैत्रिणी भेटल्याने लेकी खूष होत्या…यानिमित्ताने सर्वांशी सुख-दुःखाचा संवाद झाल्याने त्या गहिवरल्या तर, आख्या गावाने आपला सन्मान केल्याच्या आनंदाने जावई भारावले…ठिकाण होते- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी व निमित्त होते- अधिक मासानिमित्त विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आयोजित केलेल्या धोंडे जेवण सोहळ्याचे. एखाद्या गावाने गावच्या लेक-जावयांसाठी धोंडे जेवणाचा सोहळा आयोजित करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याने तिचे आयोजन करणारे सभापती प्रा. शिंदे राज्यभरातील 700 वर लेक-जावयांकडून कौतुक मिळवून गेले. आमच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय सोहळा ठरला असे गौरवोद्गारही व्यक्त करून गेले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती व अधिक मास यानिमित्त सभापती प्रा. शिंदे यांच्या पुढाकाराने चोंडी ग्रामस्थांनी लेक-जावयांचा सन्मान सोहळा आज रविवारी (14 जून) आयोजित केला होता. कर्जत-जामखेड व अहिल्यानगर शहर व जिल्ह्यातून तसेच पुणे, बारामती, करमाळा, मुंबई अशा अनेक ठिकाणाहून सर्व जाती धर्माचे लेक- जावई आले होते. 700 वर जावई, तेवढ्याच लेकी, त्यांची मुले-मुली व अन्य कुटुंबिय मिळून साडेतीन ते चार हजार जणांचे अनोखे गेट-टुगेदर या निमित्ताने रंगले. या सर्वांसाठी तब्बल 100 किलो पुरण, त्याच्या पोळ्या, पुरणाचा धोंडा, त्यावर साजूक तूप समवेत दूध गुळवणी, कटाची आमटी, भात, भजी, पापड, कुरडई असा जेवणाचा मेनू होता. गावातील महिलांनी यापैकी बहुतांश पुरणपोळ्या लाटल्या. तृप्तीचा ढेकर देत नंतर सर्वांनी आवर्जून प्रा. शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे मनापासून कौतुक केले. जंगी निघाली मिरवणूक या अनोख्या सोहळ्यासाठी आलेल्या जावयांना फेटा बांधून व त्यांच्या कपाळी गंधाक्षता लावून औक्षण करण्यात आले. सभापती प्रा. शिंदे यांच्या पत्नी व जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. आशाताई शिंदे यांच्यासह गावातील महिलांनी जावई मंडळींचे स्वागत केले. त्यानंतर त्यांची अहिल्यादेवी यांनी स्थापन केलेल्या अहिल्येश्वर महादेव मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. वैजापूर येथील प्रसिद्ध चौऊश ब्रॉस बँड पथकाने सादर केलेल्या जुन्या-नव्या गाण्यांच्या मेजवानीत व फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या मिरवणुकीत लेकीबाळींच्या फुगड्या रंगल्या. ब्रँड पथकाद्वारे लाडाचा जावई आला सासरला, परदेशीया ये सच है पिया, नवरी नटली, राम जी की निकली सवारी, झिंग झिंग झिंगाट अशा गाण्यांसह शिवछत्रपतींचा पोवाडा व महाराष्ट्र गीतांचे सादरीकरण दाद मिळवून गेले. यावेळी काही जावयांनी आपल्या मंडळीला (पत्नी) उचलून घेत नृत्योत्सव रंगवला. महादेव मंदिर परिसरात व पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक परिसरात सर्वांचे एकत्रित छायाचित्र घेतले गेले. यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग, रील, सेल्फी असे फोटोसेशनही रंगले. महिलांचे डोळे पाणावले यानिमित्त झालेल्या सन्मान सोहळ्यात बोलताना अनेक महिलांचे डोळे पाणावले. आम्ही अहिल्यादेवींच्या माहेर गावच्या लेकी असल्याचे सासरी अभिमानाने सांगतो, तो आमचा अभिमान आज लाडका भाऊ रामभाऊ यांच्यामुळे द्विगुणीत झाला. जुन्या मैत्रिणी भेटल्या, त्यांच्याशी गप्पा झाल्या, अधिक मासानिमित्त आईला भेटून तिची ओटी भरता आली आणि गावाने आमच्या ह्यांचा (पती) केलेला सन्मान आमचा आनंद वाढवून गेला, अशा भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या. लताबाई गावडे-देवकर, उषा लोखंडे, शार्दुल निंबाळकर, सुरेखा उबाळे व अन्य महिलांना बोलताना गहिवरून आले. जावई मंडळीही भारावून गेले होते. त्यांच्यावतीने भावना व्यक्त करताना नाना करंजुले म्हणाले, चौंडीचा दाजी म्हणून आमच्या गावात आम्हाला कौतुक मिळतेच. मात्र आज चौंडीने केलेला सन्मान आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. भावाचे कर्तव्य केले : प्रा. शिंदे यावेळी बोलताना सभापती प्रा. शिंदे यांनी गावच्या लेकींचा भाऊ असल्याच्या भावनेतून हा धोंडे सन्मान सोहळा केला असल्याचे सांगितले. गावच्या लेकींनी माहेर व सासरची नाती जपल्याचा आनंद आहे. दोन्ही कुटुंबे सांभाळताना चोंडीचा लौकिक वाढवला आहे. सभापती पदाच्या माध्यमातून सुमारे 5 हजार कोटीची अनेक विकास कामे करून चोंडीचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले त्यांचे जन्मगाव चौंडी हे जगाच्या नकाशावर आगळेवेगळे गाव करण्याचा प्रयत्न आहे. गावच्या लेक-जावयांनी कुटुंबीय व मित्रमंडळींसह नियमितपणे चोंडीला येऊन या गावच्या विकासात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या सोहळ्यास गावातील माजी सरपंच व मान्यवर मंडळी उपस्थित होते. अशोक देवकर, अभिमन्यू सोनवणे, पांडुरंग उबाळे, बाबासाहेब सोनवणे, भाऊसाहेब उदमले, शशिकांत देवकर, गुलाब शेख, रवींद्र जगदाळे, सतीश लहामटे, दत्ता शिंदे, शिवाजी देवकर आदींसह गावातील युवकांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. जावयांना पसंतीनुसार पॅन्ट शर्ट, पायजमा, धोतर व लेकींनाही पाच वार, सहा वार, नऊवार व काठ पदरी साड्या त्यांच्या पसंतीनुसार भेट म्हणून दिल्या गेल्या. बत्तासे व अनारसे समवेत तांब्याचे दीपदानही अधिक मासानिमित्त दिले गेले. जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित हा वेगळा सोहळा संस्मरणीय ठरला. रेव्ह पार्टी करणाऱ्यांना धोंड्याचे महत्त्व काय? सभापती प्रा. शिंदे यांनी आयोजित केलेल्या धोंडे जेवण सोहळ्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी टीका केली होती. लेक-जावयांना रोजगाराची गरज आहे, धोंडे जेवणाची नाही असे भाष्य त्यांनी केले होते. त्यावर प्रतिउत्तर देताना सभापती प्रा. शिंदे म्हणाले, रेव्ह पार्टी करणाऱ्यांना धोंडे जेवणाचे महत्त्व काय समजणार अशा सूचक शब्दात त्यांनी खडसे यांच्यासह अन्य विरोधकांना टोला लगावला.

Ram Shinde: लेखी गहिवरल्या… जावई भारावले… Read More »

Ram Shinde on Sujay Vikhe: सुजय विखे विधान परिषदेसाठी इच्छुक पण…, उमेदवारीबाबत राम शिंदे स्पष्टच म्हणाले

Ram Shinde on Sujay Vikhe: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अहिल्यानगर विधानपरिषद जागा कुणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना भाजप नेते राम शिंदे यांनी जिल्ह्यातून एका जागेसाठी माजी खासदार सुजय विखे यांच्यासह अनेक जण इच्छुक असल्याची माहिती दिली आहे. राम शिंदे म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत महायुतीचे वरिष्ठ नेतेच याबाबत निर्णय घेणार निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहे. यामध्ये सत्यजित कदम, भानुदास बेरड यांच्यासह माजी खासदार सुजय विखे हे देखील इच्छुक आहे ते राज्यसभेला देखील इच्छुक होते व विधान परिषदेसाठी देखील इच्छुक आहे. आपण मागच्या दाराने जाणार नाही असं ते म्हणाले त्यामुळे आमच्याकडे उमेदवारांची देखील कमी नाही. याबाबत या निवडणुकीसाठी पक्ष पातळीवरती निर्णय होईल तसेच काही वेगळा देखील निर्णय होऊ शकतो असे सूचक वक्तव्य राम शिंदे यांनी केले. तर विधान परिषदेसाठी प्राजक्त तनपुरे यांचे नाव चर्चेत आहे यावर शिंदे म्हणाले, त्यांचा कुठलाही अर्ज आमच्यापर्यंत आलेला नाही. त्यांचा व भारतीय जनता पार्टीचा सद्या तरी कोणताही संबंध नाही. याबाबत त्यांनी देखील खुद्द स्पष्टीकरण दिलेला आहे, मात्र राहुरी पोटनिवडणुकीत त्यांनी माघार घेतली हे देखील विसरता येणार नाही असं देखील यावेळी शिंदे म्हणाले तसेच अद्याप तनपुरे यांनी भाजपकडे याबाबत कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही. तनपुरे व देवेंद्र फडणवीस मध्ये काय चर्चा झाली याबाबत योग्य वेळी समजेल असे शिंदे म्हणाले.

Ram Shinde on Sujay Vikhe: सुजय विखे विधान परिषदेसाठी इच्छुक पण…, उमेदवारीबाबत राम शिंदे स्पष्टच म्हणाले Read More »

raam shinde

Ram Shinde: कर्जत – जामखेड तालुक्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात – सभापती प्रा. राम शिंदे

Ram Shinde : कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण वारे व प्रदीप कटकधोंड यांच्यासह कर्जत – जामखेड येथील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रा. शिंदे म्हणाले की, कर्जत-जामखेड परिसरात वारंवार वीज खंडित होणे, अनियमित लोडशेडिंग तसेच तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा थेट परिणाम शेतकरी, लघुउद्योजक, व्यापारी तसेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून, वीज पुरवठा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे. विशेषतः सायंकाळी ६ ते १० या कालावधीत वीज पुरवठा अखंडित राहावा, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, जुन्या वीजवाहिन्यांचे नूतनीकरण करणे तसेच तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक कार्यक्षम करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करून सेवा अधिक पारदर्शक व परिणामकारक करावी, असेही त्यांनी नमूद केले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढत असल्याने संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून नियोजनबद्ध काम करावे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करावी, असे निर्देशही प्रा. शिंदे यांनी दिले.

Ram Shinde: कर्जत – जामखेड तालुक्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात – सभापती प्रा. राम शिंदे Read More »

Ram Shinde: राहुरी व बारामतीसाठी प्रा. शिंदे स्टार प्रचारक; केंद्रीय भाजपने केली नियुक्ती

Ram Shinde: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी व पुणे जिल्ह्यातील बारामती या विधानसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय भाजपने 40जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचाही समावेश आहे. त्यांनी राहुरी मतदार संघातील भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या उमेदवारी दाखल करण्याच्या वेळी आवर्जून उपस्थित राहून प्रचाराला सुरुवात केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती व राहुरी विधानसभा मतदार संघात येत्या 23 एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजित राष्ट्रवादीने व राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय व प्रदेश भाजपने तब्बल 40 स्टार प्रचारकांची फळी मैदानात उतरवली आहे. भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाकडून ही यादी निवडणूक आयोगाकडे अधिकृतरित्या सादर करण्यात आली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे व नगरचे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे केंद्रीय व राज्यातील मंत्रीही या स्टार प्रचारकांमध्ये आहेत. सभापती प्रा. राम शिंदे यांनी यापूर्वी तेलंगणा, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान व कर्नाटक या राज्यांमधील निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. या राज्यांमधील महत्त्वाच्या मतदारसंघात त्यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार व प्रसार केला होता. आता राहुरी व बारामती मतदार संघातील महायुतीच्या प्रचारात ते सक्रिय सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे प्रा. राम शिंदे यांना स्टार प्रचारक म्हणून संधी देत भाजपाने त्यांच्या राजकीय वजनाला अधोरेखित केले आहे. बारामती व राहुरी या दोन्ही मतदारसंघांकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. भाजपने या निवडणुकीसाठी राज्यातील आणि केंद्रातील प्रभावी नेत्यांची फळी मैदानात उतरवून प्रचार मोहीम आक्रमक करण्याचे संकेत दिले आहेत. विशेषतः बारामतीसारख्या प्रतिष्ठेच्या लढतीत पक्षाने संपूर्ण ताकदीनिशी झोकून देण्याची रणनीती आखली आहे. राहुरी मतदारसंघातही स्थानिक मुद्द्यांबरोबरच राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे.

Ram Shinde: राहुरी व बारामतीसाठी प्रा. शिंदे स्टार प्रचारक; केंद्रीय भाजपने केली नियुक्ती Read More »

Ram Shinde on Rohit Pawar: जनतेचा कौल राम शिंदेनां ; विजयानंतर राम शिंदेनी रोहित पवारांवर केली टीका

Ram Shinde on Rohit Pawar : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर परिषदेमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत 15 जागा आणि नगराध्यक्ष पदी विजय मिळवला आहे. या विजयानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरती टीकास्त्र डागले आहे, नगरपरिषद निवडणुकीत आमच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले मात्र जामखेडच्या मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे. अशाच पद्धतीने येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील भाजपला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच महाविकास आघाडीला आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याच देखील त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपने नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत शानदार कामगिरी करत तब्बल 123 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राहिला आहे. तर काँग्रेसने देखील विदर्भात चांगली कामगिरी करत भाजपला रोखण्याचे प्रयत्न केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत काही खास करता आलेला नाही. जामखेड नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने देखील 2 जागा मिळवल्या आहे.

Ram Shinde on Rohit Pawar: जनतेचा कौल राम शिंदेनां ; विजयानंतर राम शिंदेनी रोहित पवारांवर केली टीका Read More »

rohit pawar

Rohit Pawar on Congress: काँग्रेस भाजपची बी टीम; पराभवानंतर आमदार रोहित पवार भडकले

Rohit Pawar on Congress: जामखेड नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार प्रचंड संतप्त झाले असून, त्यांनी थेट महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसवरच तोफ डागली आहे. भाजपविरोधात लढाई असल्याचे सांगत असतानाच काँग्रेसने प्रत्यक्षात भाजपची बी-टीम म्हणून काम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, जनतेने दोनदा भरभरून मतांचं दान दिलं, मी कायम त्यांच्या ऋणात राहीन. कार्यकर्त्यांनी जीव तोडून मेहनत घेतली, उमेदवारांनी ताकदीने लढा दिला, तरीही निकाल अत्यंत निराशाजनक आहे. काम करणाऱ्यांचं मनोबल खच्ची करणारा हा पराभव आहे. जनतेवर आक्षेप नाही. पण जिथे सर्वत्र पैसाच चालतो, तिथे बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार, सामान्य कुटुंबातील उमेदवारांना न्याय कधी मिळणार? आम्ही त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या विरोधात निवडून आलेल्यांचे कारनामे पाहिले, तर… आमदार पवारांनी आजच्या राजकारणावरही तिखट भाष्य केलं. तत्त्व, विचार आणि विकासावर चालणारं स्वच्छ राजकारण कमी होत चाललंय. पैशांनी गढूळ झालेलंच राजकारण आज जास्त दिसतं. आमच्या विरोधात निवडून आलेल्यांचे कारनामे पाहिले, तर चारचौघात त्यांची नावं घेण्याचीही लाज वाटते, असा घणाघात त्यांनी केला. भाजपाची बी-टीम बनून जातीयवादी शक्तींना विजय मिळवून दिला सर्वात स्फोटक आरोप करताना पवार म्हणाले, काही अपक्षांसह धर्मनिरपेक्षतेचा गजर करणाऱ्या काँग्रेसने भाजपाच्या उमेदवारालाच स्वतःच्या तिकिटावर उभं केलं. भाजपाची बी-टीम बनून जातीयवादी शक्तींना विजय मिळवून दिला. लोकंही या तिरक्या खेळीला बळी पडली. यापुढे काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवर विश्वास कसा ठेवायचा, हा मोठा प्रश्न आहे. जामखेडच्या पराभवानंतर महाविकास आघाडीतच आता आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली असून, रोहित पवारांच्या या भडक वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Rohit Pawar on Congress: काँग्रेस भाजपची बी टीम; पराभवानंतर आमदार रोहित पवार भडकले Read More »

ram shinde

Ram Shinde: तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्या; राम शिंदेंनी केली अतिवृष्टीग्रस्त कर्जत व जामखेडमधील भागांची पाहणी

Ram Shinde: अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागपूर, सितपूर, निंबोडी, तरडगाव, मलठण व जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांना विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुसळधार पावसामुळे शेती, चारा, जनावरांचे गोठे, रस्ते, पूल, बंधारे व पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांवर व घरांवरील छप्पर उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. चौंडी येथील शिल्पसृष्टीच्या बुरुजाला पाणी लागले असून चौंडी पुलावर ७ ते ८ फूट पाणी आल्याचेही या पाहणीत निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसांत पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, प्रभावित कुटुंबांना अन्न, पाणी व वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी तसेच पायाभूत सुविधांची दुरुस्ती व पुनर्बांधणी तातडीने सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. ग्रामस्थांना संवाद साधताना शिंदे म्हणाले, “ही आपत्ती ग्रामस्थांना एकट्याने लढायची नाही. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून एकही शेतकरी वा ग्रामस्थ मदतीपासून वंचित राहणार नाही. शासनस्तरावर आवश्यक ती मदत मिळविण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.” “ग्रामस्थांनी संयम राखावा, एकमेकांना सहकार्य करावे व प्रशासनाशी समन्वय ठेवून परिस्थितीचा सामना करावा”, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच कर्जत व जामखेड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Ram Shinde: तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्या; राम शिंदेंनी केली अतिवृष्टीग्रस्त कर्जत व जामखेडमधील भागांची पाहणी Read More »

Ram Shinde : सिना नदीवरील बुडीत बंधारे सर्वेक्षणास प्रशासकीय मान्यता

Ram Shinde : जलसंपदा विभागाने सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी ५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सर्वेक्षणासाठी रु. २१.१३ लाख खर्च मंजूर असून, तो महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत केला जाणार आहे. यामुळे नदीपात्राचे सौंदर्यवर्धन होईल व पाणी साठा वाढून परिसराला दीर्घकालीन सिंचन व पाणीपुरवठ्याचा लाभ मिळेल. महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त श्री क्षेत्र चौंडी (ता. जामखेड, जिल्हा अहिल्यानगर) येथे सुमारे रु. १२०९ कोटींचा बृहद विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यात चौंडी परिसरातील ऐतिहासिक व पौराणिक स्मृतीस्थळांचे जतन, पायाभूत सुविधा उभारणी, सिना नदी सुशोभीकरण व शुद्धीकरण, तसेच दोन बुडीत बंधारे बांधणीचा समावेश आहे. ६ मे २०२५ रोजी श्री क्षेत्र चौंडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत “श्री क्षेत्र चौंडी बृहद विकास आराखड्यास” मंजुरी देण्यात आली. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकूण सुमारे बाराशे कोटी रुपयांचा आराखडा शासन दरबारी मंजूर झाला. यामध्ये सिना नदी सुशोभीकरण, नदीपात्र स्वच्छता, शुद्धीकरण व दोन बुडीत बंधारे प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. विकास आराखड्याचा निधी तपशील :- चौंडी येथील स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन – रु. ६८१ कोटी ३२ लाख चौंडीला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे – रु. ३६० कोटी सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे – रु. ५० कोटी एकूण – रु. १०९१ कोटी ३२ लाख या निर्णयाचे स्थानिक नागरिक, विविध समाजघटक व सर्वपक्षीय नेत्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला साजेशी अशी चौंडी विकास आराखड्याची अंमलबजावणी होईल व सिना नदीवरील बुडीत बंधारे प्रकल्पामुळे या भागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.”

Ram Shinde : सिना नदीवरील बुडीत बंधारे सर्वेक्षणास प्रशासकीय मान्यता Read More »

राम शिंदेंच्या पराभवामागे षडयंत्र! – महसूल मंत्री बावनकुळेंचा घणाघात”पण कुणी पाडलं?” – राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

अहिल्यानगर – “राम शिंदे हे कर्तबगार आणि जनतेशी जोडलेले नेते आहेत. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक षडयंत्र रचून पाडण्यात आलं,” असा घणाघात करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नवा राजकीय भडका उडवला आहे. मात्र, त्यांनी कोणावरही थेट नाव घेऊन आरोप न करता, ‘पण कुणी पाडलं?’ या सवालाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. शेवगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत बोलताना बावनकुळे म्हणाले, “राम शिंदेंनी मैदानात आणि राजकारणात नेहमी झुंज दिली आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. हा पराभव नैसर्गिक नव्हता, तर हे एक संगनमताचे षडयंत्र होतं.“ राजकीय सूत्रांच्या मते, बावनकुळे यांचा हा इशारा पक्षांतर्गत गटबाजीकडे असल्याची शक्यता आहे. मात्र, बावनकुळे यांनी नामोल्लेख टाळल्याने चर्चा आणि तर्कांना अधिक उधाण आलं आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि राम शिंदे समर्थकांनी देखील या वक्तव्याला दुजोरा देत, “खरं कुणी पाडलं, हे आता लोकांनी समजून घ्यायला हवं,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, या विधानामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात पुन्हा एकदा खदखद वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पुढील काही दिवसांत या आरोपाचा प्रतिध्वनी दिल्लीपासून जिल्हापर्यंत ऐकू येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय भूकंप होतोय का? की केवळ इशारा? या आरोपाच्या पडद्यामागे नेमकं काय? – येणाऱ्या काळात स्पष्ट होईल!

राम शिंदेंच्या पराभवामागे षडयंत्र! – महसूल मंत्री बावनकुळेंचा घणाघात”पण कुणी पाडलं?” – राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण Read More »