DNA मराठी

NCPSP

shashikant shinde

Shashikant Shinde : ‘राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विलीनीकरण नाहीच’; शशिकांत शिंदेंनी फेटाळल्या चर्चा

Shashikant Shinde : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तूणमूल काँग्रेस पराभव झाल्याने आता हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा दोघांनी देशातील राजकारणात सुरू झाली आहे. यासाठी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. राज्यातील राजकारणात देखील अनेक चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा देखील काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पूर्णपणे पूर्णविराम दिला आहे. अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून पक्ष स्वतंत्रपणे आणि अधिक जोमाने पुढे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “नुकताच पक्षाचा वर्धापन दिन पार पडला असून, आम्ही आगामी लढ्याची रणनीती आणि धोरणे निश्चित केली आहेत. असे असताना विलीनीकरणाच्या अफवा पसरवणे आश्चर्यकारक आहे.” ‘इंडिया’ आघाडीला बळकट करण्यासाठी आणि देशपातळीवर विरोधकांची मजबूत फळी उभारण्यासाठी स्वतः शरद पवार पुढाकार घेत आहेत. दिल्लीत झालेल्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे प्रतिनिधित्व केले असून, भविष्यात ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातूनच भाजपविरोधात एकत्र येऊन लढणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी ठामपणे सांगितले.

Shashikant Shinde : ‘राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विलीनीकरण नाहीच’; शशिकांत शिंदेंनी फेटाळल्या चर्चा Read More »

Nilesh Lanke: कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात खा. लंके आक्रमक; 23 जूनला आंदोलन

Nilesh Lanke : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कृषी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच शेतकरी हिताच्या विविध मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा २३ जून रोजी पारनेर तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शेतकरी, सामाजिक व सर्वपक्षीय संघटनांनी दिला आहे. यासंदर्भात खासदार लंके यांनी गुरुवारी तहसीलदार गायत्री सैंदाने यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर केले. या निवेदनात कर्जमाफी योजनेतील विविध अटींमुळे मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात जाहीर झालेल्या योजनेत अनेक निर्बंध घालण्यात आल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनात सन २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील ५० हजार रुपयांच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेतील मर्यादा हटविणे, १२ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांवरील अटी रद्द करणे, प्रोत्साहनपर अनुदानासाठीची दोन वर्षे नियमित कर्जफेडीची अट हटविणे, पीकविमा योजनेतील जाचक ट्रिगर अटी रद्द करणे आणि खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचे पुनर्गठन करण्याच्या मागण्यांचाही समावेश आहे. याशिवाय पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅसच्या वाढत्या दरांमध्ये कपात करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पारनेर तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकरी प्रश्नांवर सर्वपक्षीय संघटना एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास २३ जून रोजी पारनेर तालुक्यातील सर्व प्रमुख रस्ते बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. पारनेर तालुक्यासह राज्यातील विविध भागांत मागण्या मान्य होईपर्यंत लोकशाही मार्गाने टप्प्याटप्प्याने आंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही खासदार नीलेश लंके यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा असून शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Nilesh Lanke: कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात खा. लंके आक्रमक; 23 जूनला आंदोलन Read More »

Rohit Pawar: राष्ट्रवादीत बदलाचे वारे, अजितदादांपेक्षा वेगळे दाखविण्याचा प्रयत्न, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar: गेल्या काही दिवसांत विविध पदे आणि उमेदवारी वाटपांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात कुटुंबातील आणि मर्जीतील व्यक्तींना संधी देण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता वेगळी भूमिका घेतली आहे. पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रम झाला. येत्या पंधरा दिवसांत पक्षात फेरबदल केले जाणार असून ज्यांचे कोणा नेत्याशी नाते, घराणेशाहीशी संबंध नाही, अशा सामान्य पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे आमदार पवार म्हणाले आहेत. रोहित पवार म्हणाले, पुढील दहा पंधरा दिवसात पक्षात संघटनात्मक बदल करण्यात येणार आहे. यामध्ये नव्या कार्यकर्त्यांना पदे देण्यात येणार आहेत. ज्यांचे कोणाही नेत्याशी नाते नाही, ज्यांचा घराणेशाहीशी संबंध नाही, अशा कार्यकर्त्यांना पक्षाची पदे दिली जाणार आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्ते, युवक आणि महिलांना पुढे आणण्यावर भर दिला जाणार आहे. पक्ष मजबुत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षात बदल करण्याच्या घोषणा शक्यतो स्वतः शरद पवार करीत असतात. यावेळी पवार किंवा कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्याऐवजी आमदार रोहित पवार यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे रोहित पवार यांनाही पक्षात मोठी संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Rohit Pawar: राष्ट्रवादीत बदलाचे वारे, अजितदादांपेक्षा वेगळे दाखविण्याचा प्रयत्न, रोहित पवार नेमकं काय म्हणाले? Read More »

kishor masal

Kishor Masal : पक्षातून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ आक्रमक; ‘सुनावणी न करताच शिक्षा दिली’

Kishor Masal : बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल जे बेताल वक्तव्य केलं ते त्यांना चांगलंच भोवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आता नगरसेवक किशोर मासाळ यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मासाळ यांची पक्षातून हाकलपट्टी करत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर किशोर मासाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझी पक्षातून हकलपट्टी केली हे मला आता समजलं. पण हकलपट्टी का केली हे मी काल पत्रकार परिषद घेऊन विचारलं होतं. ही मला फाशी आहे हे अगोदरच ठरलं होतं असं किशोर मासाळ यांनी म्हटल आहे. व्हायरल होणारा रेकॉर्डिंग माझं नाही ते तुमच्याकडे आलं कसं ? मला ब्लॅकमेल होत आहे. कोणी दिलं याची चौकशी करण्याची मागणी मी एका पत्राद्वारे बारामती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र याची कोणतीही चौकशी झाली नाही. उलट माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला. तुझी ऑडिओ क्लिप आम्ही व्हायरल करू हे अगोदरच मला सांगितलं होतं हे सर्व प्री प्लॅन आहे अपेक्षित आहे यात वेगळं काही नाही असं मासाळ यांनी म्हटलं आहे. तर माफीनाम्यावर बोलताना किशोर मासाळ म्हणाले की, एखाद्या वेळी सैरभैर झाल्यावर आपण अडचणीत चाललोय म्हटल्यावर जिकडे दिशा दिसेल तिकडे आपण धावतो. मला ट्रॅप करून फसवलेलं आहे. ती क्लिप कुठून आली ती क्लिप माझीच आहे का आणि ती क्लिप कोणी वाजवायला दिली आणि का माझ्यावरती आरोप लावला याचा शोध होईपर्यंत तोपर्यंत ती क्लिप माझी नाही. एक सेकंदाच्या क्लिप वर तुम्ही कसं ठरवलं की तो मीच आहे म्हणून. कोर्ट सुद्धा दोन-चार सुनावण्या घेता आणि मग निर्णय घेत इथे सुनावणीच झाली नाही अस माध्यमांशी बोलताना किशोर मिसाळ म्हणाले.

Kishor Masal : पक्षातून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ आक्रमक; ‘सुनावणी न करताच शिक्षा दिली’ Read More »

img 20260605 wa0017

Ahilyanagar Politics: बिनविरोध ते मागचे राजकारण; पडद्यामागे नेमकं घडलं काय?

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अपेक्षितच होता. भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे बिनविरोध निवडून आले. निकालात धक्का नव्हता परंतु त्या निकालापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया मात्र अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरली. सामान्यतः बिनविरोध निवडणूक म्हणजे राजकीय सहमती, विकासाच्या मुद्यांवरील एकमत किंवा अनावश्यक संघर्ष टाळण्याचा प्रयत्न असे मानले जाते. मात्र अहिल्यानगरात घडलेला घटनाक्रम वेगळेच वास्तव समोर आणतो. येथे बिनविरोध निवडीपेक्षा ती घडवून आणण्यासाठी वापरले गेलेले राजकीय व्यवस्थापन, स्थानिक नेतृत्वाची धडपड, राज्यस्तरीय हस्तक्षेपाची चर्चा आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत निर्माण झालेली उत्सुकता अधिक चर्चेचा विषय ठरली. या निवडणुकीकडे केवळ एका विधान परिषद जागेच्या चौकटीत पाहून चालणार नाही. त्यामागे गेल्या काही वर्षांत बदललेले जिल्ह्याचे राजकीय चित्र आहे. प्राजक्त तनपुरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विचारसरणीशी जोडले गेलेले नेतृत्व. राहुरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर विधान परिषदेसाठी त्यांची झालेली निवड ही केवळ व्यक्तीची राजकीय प्रगती नाही ती राज्यातील बदलत्या सत्तासमीकरणांची अभिव्यक्ती आहे. महायुतीसाठी तनपुरे यांना विधान परिषदेत पाठवणे ही राजकीय विश्वासार्हतेची बाब बनली होती. दिलेला शब्द पाळण्याचा संदेश त्यातून जाणार होता. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यापेक्षा बिनविरोध जिंकणे अधिक महत्त्वाचे मानले जात होते. कारण बिनविरोध निवड म्हणजे संघटनात्मक ताकद, विरोधकांवरील प्रभाव आणि राजकीय व्यवस्थापनाचे प्रदर्शन. म्हणूनच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत अनेक स्तरांवर हालचाली सुरू होत्या. प्रारंभी सर्व काही नियोजनाप्रमाणे घडत असल्याचे चित्र होते. अपक्ष उमेदवार करण ससाणे यांनी माघार घेतली. इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. दुपारपर्यंत निवडणूक बिनविरोध होणार, याबद्दल कोणालाही शंका उरली नव्हती मात्र दत्तात्रय पानसरे यांनी संपूर्ण समीकरण बदलले. राजकारणात अनेकदा एखाद्या व्यक्तीचे राजकीय वजन तिच्या पदावरून नव्हे, तर योग्य वेळी निर्माण केलेल्या अडचणीवरून मोजले जाते. पानसरे यांच्या भूमिकेने हेच दाखवून दिले. त्यांच्या वतीने माघारीचा अर्ज दाखल झाला पण काही वेळातच त्यांनी त्या अर्जालाच आव्हान दिले. प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या दिला. आत्मदहनाचा इशाराही दिला. यानंतर केवळ निवडणूक प्रक्रियाच नव्हे, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थापनच प्रश्नांकित झाले. या घटनेतून पहिला धडा मिळतो तो स्थानिक नेतृत्वाच्या मर्यादांचा. जिल्ह्यातील प्रभावशाली नेते, मंत्री, आमदार आणि संघटनात्मक ताकद असूनही दुपारनंतरचा पेच तात्काळ सोडवता आला नाही. अनेक चर्चांनंतरही पानसरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. स्थानिक पातळीवरील सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे विषय राज्यस्तरावर पोहोचल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाचाही उल्लेख झाला. या चर्चांची अधिकृत पुष्टी नसली तरी त्यातून एक वास्तव अधोरेखित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णय प्रक्रियेचे केंद्रीकरण वाढत चालले आहे. पूर्वी जिल्ह्यातील प्रश्न जिल्ह्यात सुटत असत. आज मात्र अनेक प्रश्नांची अंतिम उत्तरं मुंबईत किंवा राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे शोधली जातात. हा बदल केवळ राजकीय नाही; तो संघटनात्मक संस्कृतीत झालेल्या परिवर्तनाचाही भाग आहे. या निवडणुकीतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासनाची भूमिका. निवडणूक प्रक्रियेला विशिष्ट नियम, वेळापत्रक आणि कायदेशीर चौकट असते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. त्यानंतरही रात्री साडेआठ वाजेपर्यंत घडामोडी सुरू राहिल्या. यामुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. उमेदवाराच्या हरकतीवर निर्णय घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणती प्रक्रिया अवलंबली? प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरीबाबत नेमकी पडताळणी कशी करण्यात आली? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी इतका कालावधी का लागला? लोकशाही व्यवस्थेत निवडणूक अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास हा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आधारित असतो. त्यामुळे अशा प्रसंगी केवळ निर्णय नव्हे, तर निर्णयापर्यंत पोहोचण्याचा मार्गही तितकाच महत्त्वाचा असतो. या घटनेतील आणखी एक पैलू दुर्लक्षित करता येणार नाही. दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारी अर्जाचे अनुमोदक एमआयएमचे नगरसेवक शहाबाज सय्यद होते. त्यांच्या माध्यमातून माघारीचा अर्ज दाखल झाला. त्यानंतर प्राधिकृत पत्राच्या वैधतेवर वाद निर्माण झाला. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता स्थानिक राजकारणातील विविध स्तरांवरील समन्वय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचे दर्शन घडते. अर्थात, या सर्व नाट्याच्या केंद्रस्थानी असलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी हा राजकीय विजय महत्त्वाचा आहे. विधान परिषदेत त्यांचा प्रवेश हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील नवा टप्पा ठरेल. महायुतीने दिलेला शब्द पाळल्याचा संदेश यातून गेला. जिल्ह्यातील सत्तासमीकरणांमध्ये त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले. परंतु या विजयाचा राजकीय अर्थ केवळ एवढाच नाही. हा विजय राज्यातील बदलत्या राजकीय निष्ठा, नव्या समीकरणांची निर्मिती आणि सत्ताधारी पक्षाच्या विस्तारवादी राजकारणाचाही भाग आहे. मात्र या विजयाच्या उत्सवात काही प्रश्न हरवू नयेत. लोकशाहीमध्ये बिनविरोध निवड हा आदर्श मानला जातो, पण ती बिनविरोधता कशी साध्य झाली, हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा असतो. जर ती सहमतीतून आली असेल तर ती लोकशाहीची ताकद आहे. पण जर त्यामागे दबाव, समजुती, राजकीय गणिते आणि शेवटच्या क्षणापर्यंत चाललेले तणाव असतील, तर त्याचे वेगळे अर्थ निघतात. अहिल्यानगरच्या या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केली. आजच्या राजकारणात विजय हा केवळ मतपेटीतून मिळत नाही; तो व्यवस्थापनातून, संपर्कातून, प्रभावातून आणि सत्तेच्या विविध स्तरांवरील समन्वयातूनही मिळतो. प्राजक्त तनपुरे यांचा विजय हा त्या व्यवस्थापनाचा यशस्वी शेवट ठरला. मात्र दत्तात्रय पानसरे यांनी निर्माण केलेल्या पेचामुळे त्या व्यवस्थापनाच्या मर्यादाही उघड झाल्या. अखेरीस निकाल लागला, निवडणूक संपली आणि विजेत्याची घोषणा झाली. पण लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला, पण तो मार्ग नेमका कसा तयार झाला? त्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय या निवडणुकीचा संपूर्ण अर्थ समजणे कठीण आहे. कारण अनेकदा निवडणुकीचा खरा इतिहास निकालात नसतो; तो निकालाच्या आधी घडलेल्या घटनांमध्ये दडलेला असतो.

Ahilyanagar Politics: बिनविरोध ते मागचे राजकारण; पडद्यामागे नेमकं घडलं काय? Read More »

rani lanke

Rani Lanke: विधान परिषदेचे बिगुल! राणी लंके विधानपरिषद लढवणार; अर्ज दाखल करणार?

Rani Lanke: महाराष्ट्र विधान परिषद अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने खासदार निलेश लंके यांच्या पत्नी तथा तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके ह्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राणी लंके या आता विधान परिषदेत आपलं नशीब आजमावत आहे. विधान परिषद निवडणुकीचे बिगल वाजले असून अनेक इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणी देखील सुरू आहे यातच राष्ट्रवादीच्या असलेल्या या जागेवर भाजपने दावा केला असून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये नुकत्याच प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यातच आता महाविकास आघाडी देखील आपले उमेदवार घेऊन या निवडणुकीत सज्ज झाली आहे. ससाने दीप चव्हाणसह लंके विधान परिषदेच्या मैदानात श्रीरामपूर मधून करण ससाने यांच्यासह नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसचे नगर शहर अध्यक्ष दीप चव्हाण यांना देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या राणी लंके यादेखील उद्या म्हणजे सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती संदीप वर्पे यांनी दिली. आमदार जगताप यांचे बंधू देखील इच्छुक महायुतीकडून विधान परिषदेची उमेदवारी राष्ट्रवादी मधून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले प्राजक्त तनपुरे यांना दिले जाणार असल्याचे खात्रीलायक माहिती आहे मात्र राष्ट्रवादीच्या या जागेवरती आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप हे देखील जागा लढवण्यास इच्छुक आहे तसेच त्यांनी अर्ज देखील घेऊन गेले आहेत यामुळे महायुतीमध्ये देखील उमेदवारीवरून धसपूस पाहायला मिळते. अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे तुल्यबळ हे मतदार स्वरूपात जास्त आहे यातच तनपुरे यांच्या बाजीप्रवेशाने तनपुरे यांचा जनसेवा पॅनलचे मत देखील भाजपला मिळणार असून आता आमदार सत्यजित कदम यांच्या संगमनेर सेवा समिती चे नगरसेवक काय भूमिका घेणार तसेच तांबे काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Rani Lanke: विधान परिषदेचे बिगुल! राणी लंके विधानपरिषद लढवणार; अर्ज दाखल करणार? Read More »

img 20260530 wa0004

Rajesh Tope :  टोपेंची संभाव्य एक्झिट : राष्ट्रवादीसमोरील नवा प्रश्न?

Rajesh Tope : राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. पक्षांतराचे वारे इतके वेगाने वाहत आहेत की कालपर्यंत एखाद्या पक्षाचे निष्ठावंत मानले जाणारे नेते आज दुसऱ्या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगताना दिसतात. अशाच चर्चांचा केंद्रबिंदू सध्या माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे ठरले आहेत. ते भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रत्यक्षात ते पक्षांतर करणार की नाही, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र केवळ या चर्चेनेही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. राजेश टोपे हे केवळ जालना जिल्ह्यापुरते मर्यादित नेते नाहीत. राज्याच्या राजकारणात त्यांनी संयमी, अभ्यासू आणि सर्वपक्षीय संबंध जपणारा नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांची संभाव्य एक्झिट ही केवळ एका नेत्याचे पक्षांतर नसून राष्ट्रवादीच्या नेतृत्वासमोरील संघटनात्मक आव्हान म्हणून पाहावी लागेल. अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीही अनेक मोठे धक्के पचवले आहेत. पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर पक्षाची साथ सोडली. तरीही शरद पवार यांनी नव्याने संघटना उभी केली, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवले आणि लोकसभा निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळवून पक्षाचे अस्तित्व केवळ टिकवलेच नाही, तर त्याला नवी ऊर्जा दिली. त्यामुळे एका नेत्याच्या जाण्याने पक्ष संपुष्टात येईल, असे चित्र निश्चितच नाही. तरीही टोपेंच्या बाबतीत प्रश्न वेगळा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पक्षाच्या कामकाजात पूर्वीइतका सक्रिय सहभाग घेतला नाही, अशी चर्चा अनेकदा झाली. त्यांच्या नाराजीची कारणे नेमकी काय आहेत, याबाबत मात्र अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. राजकारणात अफवा आणि वास्तव यामधील अंतर अनेकदा मोठे असते. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत संयम राखणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील फूट पडण्यापूर्वी आणि नंतरच्या अनेक संवेदनशील घडामोडींमध्ये टोपे यांनी तुलनेने संयमी भूमिका घेतली. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद मिटावेत, दोन्ही बाजू पुन्हा एकत्र याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यामुळे ते पक्षाच्या मुख्य संघर्षांपासून काहीसे दूर राहिले, अशी प्रतिमा निर्माण झाली. जर भविष्यात राजेश टोपे यांनी खरोखरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तर तो शरद पवार गटासाठी नक्कीच मोठा धक्का ठरेल. कारण त्यामागे केवळ एका नेत्याचे जाणे नसून मध्यममार्गी आणि स्वीकारार्ह नेतृत्वाची उणीव निर्माण होण्याचा धोका असेल. दुसरीकडे, अशा प्रसंगी शरद पवार यांचे नेतृत्व पुन्हा एकदा कसोटीवर लागेल. गेल्या काही दशकांतील राजकीय अनुभव पाहता संकटातून मार्ग काढण्याची त्यांची क्षमता अनेकदा सिद्ध झाली आहे. सध्या मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे. राजेश टोपे यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षासमोरील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. टोपे जातील की राहतील, याचे उत्तर काळ देईल; परंतु त्यांच्यासारख्या स्वीकारार्ह आणि अनुभवी नेत्याला गमावणे हे शरद पवारांच्या पक्षाला सहज परवडणारे नाही, हे तितकेच खरे.

Rajesh Tope :  टोपेंची संभाव्य एक्झिट : राष्ट्रवादीसमोरील नवा प्रश्न? Read More »

Sharad Pawar On PM Modi : अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार, मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे बोलताना देशातील नागरिकांना पुढील एका वर्षासाठी सोने खरेदी टाळण्याचे तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या बचतीसाठी जास्तीत जास्त वर्क फ्रॉर्म होम आणि विदेशी प्रवास टाळण्याचे आवाहन केल्याने देशात सध्या खळबळ उडाली आहे. विरोधक मोदी यांच्या या आहवानानंतर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी देखील यावर भाष्य करत प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी एक्सवर म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे असं शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? पुढील एका वर्षासाठी सोन्याची खरेदी टाळा वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा नैसर्गिक शेतीचा अवलंब करा परदेश प्रवास टाळा खाद्यतेलाचा वापर कमी करा

Sharad Pawar On PM Modi : अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार, मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया Read More »

rohit pawar

Rohit Pawar on Dhirendra Shastri :  सत्तेतला मोठा पक्ष भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर करतो…रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar on Dhirendra Shastri : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपाख्य बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सत्तेतला मोठा पक्ष भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर करतो असा दावा देखील रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार नेमकं काय म्हणाले? सत्तेतला एक मोठा पक्ष सोडला तर संपूर्ण महाराष्ट्राने भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा निषेध केला आहे, सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून या भोंदूला पाठीशी घालण्याचं कारण काय ? महाराष्ट्राचा आधार असलेल्या महामानवांपेक्षा भोंदू धीरेंद्र शास्त्री या मोठ्या पक्षाला मोठा वाटतो का ? हा मोठा पक्षच या भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर करतो, अशी देखील चर्चा आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महामानवांची भूमी आहे, इथे बाहेरून असले भोंदू बोलवायची गरजच काय ? नागपुरात या भोंदू बाबाचा कार्यक्रम अद्यापही सुरूच आहे, हे लाजिरवाणे नाही का ? महाराष्ट्राच्या अस्मितेशिवाय कोणीही मोठा नाही हे दाखवून देत सरकारने या भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम बंद करावा आणि यापुढे महाराष्ट्रात त्याला कायमची बंदी घालावी अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे. नेमकं काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री? छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले तेव्हा एक दिवस ते समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपला मुकूट उतरवून रामदास स्वामींना दिला. आता हे राज्य तुम्ही सांभाळा अशी विनंती केली. त्यावर रामदास स्वामींनी हसून मी राज्य चालवतो, तुम्ही अंमलबजावणी करा असं म्हटलं, असा दावा धीरेंद्र शास्त्रींनी केला. पुढे रामदास स्वामींनी ‘तू माझा शिष्य आहेस आणि मी तुझा गुरू’ असं सांगत पुन्हा मुकुट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. यावरून भारतात महामानवांचा जन्म झाला आहे, असं ते म्हणाले.

Rohit Pawar on Dhirendra Shastri :  सत्तेतला मोठा पक्ष भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर करतो…रोहित पवारांचा हल्लाबोल Read More »

narhari zirwal

Narhari Zirwal : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ की चीज ‘ॲनालॉग’ आता उल्लेख बंधनकारक; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

Narhari Zirwal : हॉटेलमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त आणि बनावट ‘चीज ॲनालॉग’ खपवून ग्राहकांची होणारी फसवणूक आता थांबणार आहे. पदार्थात नैसर्गिक पनीरऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्युकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात २७ एप्रिल २०२६ पासून ही मोहीम राबवली जात आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या या मोहिमेची दखल केंद्र सरकारच्या FSSAI (अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण) ने घेतली आहे. २१ एप्रिल २०२६ रोजी तसे परिपत्रक काढून हा नियम देशभर लागू केला आहे. त्यामुळे शुद्ध पनीरसाठी महाराष्ट्राने दाखवलेली दिशा आता संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. विधानसभा सभागृहात लोकप्रतिनिधींनीपनीरच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला होता. वनस्पतीजन्य तेलापासून बनवलेले हे ‘ॲनालॉग’ पनीरसारखेच दिसत असल्याने ग्राहक फसवले जात होते. या तक्रारींची गंभीर दखल घेत मंत्री झिरवाळ यांनी तात्काळ हे पारदर्शकतेचे आदेश लागू केले आहेत. राज्याच्या या निर्णयाला केंद्र सरकारच्या FSSAI कडूनही पाठिंबा मिळाला असून तसे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. काय आहे नवा नियम? ​अन्न व औषध प्रशासन विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटला पारदर्शकता पाळावी लागणार आहे. जर एखाद्या पदार्थात दुधापासून बनवलेल्या नैसर्गिक पनीरऐवजी वनस्पतीजन्य फॅट्सपासून बनवलेले ‘ॲनालॉग’ वापरले असेल, तर त्याची माहिती ग्राहकांना देणे बंधनकारक आहे.​१ मे २०२६ पासून या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाईल. जे हॉटेल चालक माहिती लपवतील, त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांचा परवाना कायमचा रद्द केला जाऊ शकतो. मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे की,​”नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ग्राहकांना आपण नक्की काय खातोय हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पनीरच्या नावाखाली भेसळ करणाऱ्यांचे धाबे आता दणाणणार आहेत.” प्रशासनाचे निर्देश चीज ॲनालॉगच्या पुरवठादारांना विक्री बिलावर त्याचा स्पष्ट उल्लेख करावा लागेल.हॉटेल संघटनांशी चर्चा करून सर्व विभागीय अन्न आयुक्तांना याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.रेस्टॉरंट आणि केटरर्सना बल्क मेसेजद्वारे या नव्या नियमांची माहिती दिली जात आहे.या निर्णयामुळे हॉटेलमधील ‘शाही पनीर’ खरोखरच शुद्ध मिळणार असून, भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पनीर आणि चीज ॲनालॉगमधील फरकअन्न सुरक्षा मानके विनियम २०११ नुसार पनीर हा केवळ दुधापासून तयार केलेला पदार्थ आहे. तर डेअरी ॲनालॉगच्या हा दूधाव्यतिरिक्त खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर घटक वापरून तयार केला जातो. तो दिसायला पनीरसारखा असला, तरी पनीर नसून ‘चीजॲनालॉग’या प्रवर्गात मोडतो. हॉटेल्स, उपाहारगृहे आणि जलद खाद्यपदार्थ विक्रेते मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा पदार्थांची विक्री करताना बिलावर, इलेक्ट्रॉनिक दर्शक फलकावर आणि मेन्यूकार्डवर स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.उत्पादन घेताना लेबल काळजीपूर्वक वाचावे. त्यावर ” असा उल्लेख आहे का, हे तपासावे. तक्रार कुठे कराल ? ग्राहकांची दिशाभूल झाल्यास प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Narhari Zirwal : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ की चीज ‘ॲनालॉग’ आता उल्लेख बंधनकारक; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश Read More »