DNA मराठी

Maharashtra Politics

Manoj Jarange Patil

Manoj Jarange: शिंदे-फडणवीसांचा कट शिजलाय, मराठा मोर्चात मला गोळ्या घालायचा डाव; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप…

Manoj Jarange: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  बाईच्या पदराच्या आड लपून काम करत आहे. तुमच्याकडून आमचं काहीही वाकडं होत नाही तुम्ही आमच्या सगळ्या संपत्त्या घ्या.आंदोलन काळातच चौकशा का? बावणकुळया तू सावध राहा.छगण्या (छगन भुजबळ)सांगतो ना,बाई नाराज झाली.बाईच्या ( जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल)माध्यमातून दिसतं ना. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असतानाही त्यांच्या दबावाखाली अधिकारी काम करत आहेत. गोरगरीबांचे लोक तहसीलदार कार्यालयात गेले की, अधिकारी काम करत नाहीत, तेच अधिकारी आता शनिवार रविवार काम करत आहेत. मी फक्त प्रसाद लाड यांच्यामुळे बावनकुळेला सुट्टी दिली होती पण आता नाही असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाच्या सोळाव्या दिवशी पञकारांशी बोलताना म्हणाले. बावनकुळे सर्वकाही करत आहे. नाराजी व्यक्त करण्याची काय गरज आहे, सर्व दिसत आहे. मराठ्यांबद्दल किती व्देश आहे. गरीब जातीचे आंदोलन सुरू आहे. बाईच्या आडून कसा त्रास दिला जात आहे हे दिसत आहे. बावनकुळे कितीही बोलले तरीही काही फरक पडत नाही कितीही वळवळ केली तरी काही परिणाम होणार नाही. आमचे फासेही तुटणारे नाहीत. बावनकुळे तुम्ही सावध राहा. तुमच्या पदाला, पैशाला आणि मैत्रीला लाथ मारतो, आंदोलन थांबत नसल्याचेही मराठा आंदोलक जरांगे यांनी सांगितले. बावनकुळे तू मराठ्यांचे वार बघ, घायाळ होशील.आमचं काहीही होत नाही तू रविवारी गोष्टी घडवून आणतो.आमच्या आंदोलनाला शनिवारी रविवारी परवानगी का नाही.आम्ही आता बारकाईनं लक्ष ठेवणार नागाच्या शेपटावर पाय दिल्यावर आम्ही दम धरून फासा टाकून बाजार उठवतो. बाईच्या पदराआड लपून लढतो.वार करतो ये तू मैदानात ,बघ तुझ्यामुळे मि कशी भाजपची वाट लावतो.बघ भाजपला कसा पाडतो अशा इशारा त्यांनी दिला. 15 सप्टेंबरला मुंबईला निघून 19 सप्टेंबरला मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसणार. गरीब मराठ्यांची कदर सरकारला नाही. लोकशाही मार्गाने शांततेत उपोषण सुरू होईल, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. उदय सामंत ते काय म्हणाले मला माहित नाही. गेल्यावर्षी पण गणेशोत्सव होता.तुम्ही वर्षभर काय केलं.?लाड या लढ्यात आल्यापासून पण आम्ही सरकारला वेळ दिला.आजपासून पुन्हा 8 दिवस सरकारकडे वेळ आहे.संधी देऊनही तुम्ही चूक करता.तुम्हाला 3 वर्ष संधी दिली मग मुंबईत घेऊ नका असं तुम्ही कसं म्हणून शकता? सरकारची प्रवृत्ती नीच आहे. श्रीमंत लोक आंदोलनात मदत करतात म्हणून सरकार त्यांना अडकवत आहे. सरकार त्यांना अडचणीत आणणार आहे का? सगळ्या समाजात श्रीमंत लोक असतात ते समाज अडचणीत आल्यानंतर मदत करतात त्यात चुकीचं काय? निवडणूकीत तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कडून मदत घेत नाही का मग पैसे वाटण्यासाठी कुठून आणता? आंदोलन करायला मदतीचा हात घ्यावाच लागतो. मराठे त्यांच्या बाजूने उभे राहायला हवे. आंदोलन चालवण्यासाठी मराठ्यांची मदत घेतली नाही तर आंदोलन चालवायचं कसं? दोषी नसताना माझ्या जवळच्या लोकांना त्रास दिला जात आहे तरीही मी मागे हटणार नाही.कुठेही चाैकश्या कितीही करा आणि कुठेही चौकशी करा त्यामुळे आंदोलन थांबत नाही. तुम्ही माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना त्रास देता, ते कोणाला कळत नाही का? असं देखील मनोज जरांगे म्हणाले. चौकशांना शरण येऊन मी घाबरणार नाही.आंदोलनाच्या ठिकाणी मरेन  पण तुमच्या पूढे गुडघे टेकणार नाही. मराठ्यांपुढे मरेन पण तुमची मैत्री नको.घाबरून मंत्र्यांच्या पंगतीला बसणार नाही. सरकार माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाही,मुंबईला यायचं नाही म्हणून मला त्रास देणं सुरू केलं आहे. मला गोळ्या घालून मारणे हाच पर्याय आता सरकारकडे आहे हिंदुंच्या सणात मुंबईत आला म्हणून गोळ्या घालून मारण्याचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा कट शिजला असल्याचे मराठा आंदोलक जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange: शिंदे-फडणवीसांचा कट शिजलाय, मराठा मोर्चात मला गोळ्या घालायचा डाव; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप… Read More »

sanjay gaikwad

Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत श्वेता महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेका धरला होता. यावर संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना श्वेता महाले यांच्या शरीरयष्टीवरून टीका केली होती. या वक्तव्यावरून सामाजिक कार्यकर्त्या सविता भगवान बेंडवाल यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार श्वेता महाले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या वक्तव्यामुळे महिलेचा अपमान होऊन तिच्या लज्जेला धक्का पोहोचवला जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या सविता भगवान बेंडवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत बुलढाणा शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ अंतर्गत आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कलमांतर्गत महिलेच्या लज्जेला धक्का पोहोचवणारे शब्द, हावभाव, इशारे किंवा कृती केल्याप्रकरणी कारवाईची तरतूद आहे. विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीत आमदार श्वेता महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर नृत्य केले होते. त्यावरून संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या शरीरयष्टीवरून टिप्पणी केली होती. याच वक्तव्यावरून आता पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. दरम्यान, महायुतीतील दोन आमदारांमधील हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. या प्रकरणात पक्षश्रेष्ठी हस्तक्षेप करतात का आणि पुढील कारवाई काय होते, याकडे लक्ष लागले आहे.

Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? Read More »

amruta fadnavis

Amruta Fadnavis: माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील

Amruta Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस असून आंदोलनाची धग कायम आहे. उपोषणादरम्यान जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. आता जरांगे पाटील मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत असल्याने सरकारसमोरील आव्हान पुन्हा वाढले असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अहिल्यानगरमध्ये यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सणाचे दिवस आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील असे म्हणत त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत शांततेची अपेक्षा व्यक्त केली. राज्य सरकार आरक्षणावर तोडगा काढण्याच्या मार्गावर मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण तापलेले असताना अमृता फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मात्र सावध भूमिका घेतली. आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील आहे. राज्य सरकार त्यावर तोडगा काढण्याच्या मार्गावर आहे. सरकारकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. येणाऱ्या दिवसांत यावर मार्ग निघेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून हालचाली सुरू असल्याचा संदेशही त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला. मनोज जरांगे माझे भाऊ आहेत काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत विचारण्यात आले असता अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे माझे भाऊ आहेत, मी त्यांना जेवणाचे निमंत्रण देते असे म्हटले होते. त्यांच्या या आवाहनावर जरांगे पाटील यांनीही आपल्या खास शैलीत उत्तर देत भाऊ लढाईच्या मैदानात असताना कसा जाणार? मात्र भाऊबीजेला बहिणीकडे नक्की जाणार, असे म्हटले होते. त्यावर आज पुन्हा जरांगेंच्या या उत्तरावरही अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मी त्यांची वाट पाहणार आहे आणि ते येतील असे सांगत त्यांनी जरांगे पाटील यांना दिलेले जेवणाचे निमंत्रण कायम असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे एका बाजूला आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील आंदोलनाची पुढील दिशा ठरवत असताना दुसरीकडे अमृता फडणवीस यांनी भाऊ या नात्याचा उल्लेख करत संवाद आणि शांततेचा सूर कायम ठेवला आहे.

Amruta Fadnavis: माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील Read More »

tukaram munde

Tukaram Munde : पुण्यात FDA ची मोठी कारवाई; बुधवार पेठेत पनीर-खव्याचे चार ट्रक जप्त

Tukaram Munde : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मिठाई, पनीर, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असताना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत बुधवार पेठ परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत पनीर आणि खव्याने भरलेले तब्बल चार ट्रक जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खाद्यपदार्थ विक्रेते आणि व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवार पेठ परिसरात अचानक तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पनीर आणि खव्याचा साठा आढळून आला. साठ्याचे प्रमाण लक्षात घेता कारवाईसाठी मोठ्या संख्येने अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जप्त केलेल्या मालाचे नमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पनीर-खव्याच्या गुणवत्तेची प्रयोगशाळेत तपासणी जप्त करण्यात आलेला पनीर आणि खवा नेमका कुठून आणण्यात आला होता, त्याची गुणवत्ता काय आहे आणि तो अन्न सुरक्षा नियमांनुसार तयार करण्यात आला आहे का, याची तपासणी आता करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी जप्त मालाचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. प्रयोगशाळेतील तपासणीचा अहवाल आल्यानंतर या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ किंवा अन्य कोणतीही अनियमितता आढळते का, हे स्पष्ट होणार आहे. तसेच या मालाच्या पुरवठ्याचा स्रोत आणि संबंधित व्यावसायिकांची कागदपत्रे यांचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवात खाद्यपदार्थांच्या मागणीत वाढ गणेशोत्सवाच्या काळात शहरात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आणि विविध खाद्यपदार्थांची मागणी नेहमीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात खवा, पनीर, दूध, दही आणि मिठाईच्या माध्यमातून भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन FDA कडून विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. विशेषतः मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची निर्मिती, वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या ठिकाणांवर प्रशासनाचे लक्ष आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी संशयास्पद खाद्यसाठ्यांची तपासणी केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अन्न भेसळ आणि निकृष्ट खाद्यपदार्थांविरोधात कारवाईला वेग आला आहे. पुण्यातील बुधवार पेठेतील चार ट्रक पनीर-खवा जप्त करण्याची कारवाई याच मोहिमेचा भाग असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पुण्याबरोबरच राज्यातील इतर भागांतही FDA कडून तपासणी आणि जप्तीची कारवाई सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातही एका कोल्ड स्टोरेजवर कारवाई करून हजारो किलो खाद्यसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे विशेष लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामूहिक अन्नवाटपासाठीही FDA चे नियम गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर भंडारा, महाप्रसाद, अन्नछत्र आणि लंगर यांसारख्या सामूहिक अन्नवाटपाच्या कार्यक्रमांसाठीही FDA ने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा कार्यक्रमांची पूर्वसूचना किमान सात दिवस आधी देणे आवश्यक करण्यात आले आहे. अन्न तयार करताना स्वच्छता राखणे, सुरक्षित पाण्याचा वापर करणे, अन्न योग्य तापमानात ठेवणे, कच्चे आणि शिजवलेले पदार्थ स्वतंत्र ठेवणे, अन्न हाताळणाऱ्या व्यक्तींनी वैयक्तिक स्वच्छता पाळणे आणि अन्नाची योग्य साठवणूक करणे यावर प्रशासनाने भर दिला आहे.

Tukaram Munde : पुण्यात FDA ची मोठी कारवाई; बुधवार पेठेत पनीर-खव्याचे चार ट्रक जप्त Read More »

devendra fadnavis

MPSC Exam : विद्यार्थी आंदोलन CM फडणवीसांचा मोठा निर्णय

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रिया, पेपरफुटी, उत्तरपत्रिका, मुलाखती, पोलीस भरती तसेच विविध भरती प्रक्रियांबाबतच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला आणि विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय जाहीर केले. औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, हा तपास अंतिम टप्प्यापर्यंत नेला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. “आम्हाला प्रणाली सुधारण्यात रस आहे, लपवण्यात नाही,” असे त्यांनी सांगितले. पेपरफुटी प्रकरणाचा तपास अद्याप संपलेला नसून दोषींवर कारवाई करण्यासाठी तो शेवटच्या टप्प्यापर्यंत नेला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. परीक्षा प्रक्रियेत सर्वंकष सुधारणा करण्यासाठी नवी समिती एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत सर्वंकष सुधारणा करण्यासाठी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती राज्यभर दौरा करून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या, सूचना आणि तक्रारी या समितीसमोर खुलेपणाने मांडाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. गट-ब आणि गट-क परीक्षांचीही चौकशी गट-ब आणि गट-क मुख्य तसेच पूर्व परीक्षा 2025 संदर्भातील तक्रारींचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या इतर परीक्षांबाबतही तक्रारी असल्यास त्यांची फेरतपासणी केली जाणार आहे. संबंधित परीक्षांबाबतच्या शंका दूर होईपर्यंत काही ठिकाणी मुलाखती थांबवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच, लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले. उत्तरपत्रिका मिळण्याबाबत एमपीएससीला शिफारस माहितीच्या अधिकारांतर्गत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी शिफारस एमपीएससीला करण्यात येणार आहे. परीक्षा प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय, गुन्हे शाखेने केलेल्या तपासाचा प्राथमिक अहवालही सार्वजनिक करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एमपीएससीमध्ये स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एमपीएससीमध्ये समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी स्वतंत्र आणि विश्वासार्ह यंत्रणा उपलब्ध होणार आहे. राजूरकर समितीच्या शिफारसींची पडताळणी एमपीएससीशी संबंधित राजूरकर समितीच्या शिफारसींची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यातील योग्य शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पोलीस भरतीसाठी एकच गुणपद्धती पोलीस भरती प्रक्रियेबाबतही विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे दिसून आले. पोलीस भरतीमध्ये दोन्ही पायांना चिप लावणे किंवा त्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत विचार केला जाणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी गुणांचा एकच पॅटर्न ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या प्रश्नांवरही तोडगा सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुलाखतीच्या प्रक्रियेबाबतही स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात येणार असून, त्याबाबत समितीला सूचना देण्यात येतील. पीएमसी आणि एमएमआरडीए परीक्षांची चौकशी पीएमसी आणि एमएमआरडीएच्या परीक्षांमध्ये झालेल्या तक्रारींचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. एमपीएससीचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा विद्यार्थ्यांनी दिल्यास स्वतंत्र चौकशी करण्याची तयारी सरकारची आहे. दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला वाचवले जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पुढील परीक्षा पारदर्शक आणि ‘फुलप्रूफ’ करण्यावर भर पुढील परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी काही परीक्षा लांबणीवर टाकण्यात येणार आहेत. प्रथमच मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया होत असल्याने संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्यानंतरच परीक्षा घेण्यात येतील. पारदर्शकता हा मुख्य निकष असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या सर्व निर्णयांवर कालबद्ध पद्धतीने कारवाई सुरू केली जाणार असून, पुढील आठ दिवसांत प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

MPSC Exam : विद्यार्थी आंदोलन CM फडणवीसांचा मोठा निर्णय Read More »

raj thackeray

Raj Thackeray: महाराष्ट्राच्या वाट्याला काय? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे आक्रमक

Raj Thackeray: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा राजधानी दिल्लीऐवजी गुजरातमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळासह चित्रपटसृष्टीतही चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत महाराष्ट्राच्या योगदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या इतिहासात प्रथमच हा सोहळा दिल्लीबाहेर होणार आहे. यंदाचा 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 22 सप्टेंबर 2026 रोजी गुजरातमधील एकता नगर येथे, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे ? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पुरस्कार देशाच्या राजधानीच्या दिल्ली शहरातून हलवून गुजरातमध्ये केवाडिया येथे होणार आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचं, मुंबई शहराचं महत्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असताना दुसरीकडे देशाच्या राजधानीचं जे महत्व आहे ते हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मुळात हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय ? स्वतःला काही निर्माण करता आलं नाही की बदल नावं, बदल स्थळं आणि यातून भ्रामक इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे असं दिसतंय. बरं कधी ना कधी आता उरलो गुजरातपुरते अशी आपली गत होणार याची खात्रीच वाटत असल्यामुळे किमान तिकडे तरी माहात्म्य निर्माण करून घेऊ हा अट्टाहास सध्या केंद्रातील 2 सत्ताधीशांचा दिसतोय. बरं समजा पुरस्कार सोहळ्याचं स्थळ हलवायचं होतं तर ते मुंबईत का नाही आणलं? ज्या दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला त्या राज्यात का नाही पुरस्कार वितरण ? किंवा देशात सगळ्यात जास्त सिनेमे महाराष्ट्र आणि दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे घडवले जातात यापैकी कुठल्या राज्यात हा सोहळा का नाही ? दक्षिणेत तर सिनेमांनी तिथल्या राजकारणाला आकार दिला आहे. गुजरातच का ? या आधी देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले, ज्यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेली राज्य त्यांनी ओढूनताणून मोठी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इथे कॉमनवेल्थ स्पर्धा गुजरातमध्ये, 2023 च्या क्रिकेट वल्डकपचा अंतिम सामना गुजरातमध्ये, बाहेरून राष्ट्राध्यक्ष आले त्यांना गुजरातमध्ये घेऊन जायचं, गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातमध्ये न्यायची. या सगळ्यातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना काय दाखवायचं आहे की या देशाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा पाळणा हा गुजरातमध्ये हलला ? आज जो देश उभा आहे तो कित्येक पिढ्यांच्या त्यागातून आणि देशातील प्रत्येक प्रांताच्या योगदानातून उभा आहे. यांना गुजरातपलीकडचा देश फक्त आठवतो त्या त्या राज्यात निवडणुका आल्या की. मग तिकडे जाऊन तिथले कपडे घालून भाषणं करून, माझं कसं या राज्याशी जुनं नातं आहे सांगून मतं मिळवायची एवढंच जमतं का ? सध्याचे सत्ताधीश ‘कलासक्त’ नाहीत हे माहित आहे. कशाही निवडणुका जिंकायच्या ही एकमेव कला आणि त्यासाठी सगळ्यांवर सक्ती इतकाच यांचा ’कलासक्त’पणाशी संबंध. आणि चित्रपटांशी संबंध म्हणाल तर वाट्टेल ते प्रचारकी सिनेमे बनवून घ्यायचे आणि त्यांना पुरस्कार द्यायला लावायचे इतकाच संबंध. बरं या सगळ्याला दक्षिणेतील इतर सिनेमाप्रेमी राज्य कडाडून विरोध करतील, पण महाराष्ट्रात काहीही घडणार नाही. पण कलाकारांनी या विरोधात आवाज उठवायला हवा. मुद्दा केवाडिया किंवा इतर शहर हा नाही, देशाच्या राजधानीत या पुरस्कराची जी उज्वल परंपरा आहे ती का मोडली जात आहे यावर कलाकारांनी बोललं पाहिजे. नाहीतर उद्या गुजरातमधली स्थळं नसतील तर राष्ट्रीय पुरस्कार नाही असा फतवा पण हे लोकं काढतील. ऑस्कर सोहळा लॉसएंजलिसला होतो . ट्रम्प किंवा बुश किंवा ओबामा यांनी आपल्या राज्यात हा सोहळा नेला नाही. माझी गुजराती बांधवाना विनंती आहे की तुम्ही यांच्या नादी लागून उगाच वाहवत जाऊ नका. आपल्या भाषिक नेत्यांची सत्ता आहे याच्या ज्या गुदगुल्या होत आहेत, त्या सत्ता गेली की अस्वलाच्या गुदगुल्या होतील. भारतातील इतर प्रांतांचे नागरिक आणि नेते आपल्या राज्यांवर, तिथल्या व्यावसायिकांवर काय अन्याय झाला याचा हिशेब ठेवतील. या विषयाला आम्ही वाचा फोडूच पण देशातील समस्त कलाकारांनी पण भूमिका घ्यायला हवी. सरकारच्या स्तुतीची गीतं गायला सांगितली की ती लगेच गायला सुरुवात केल्यामुळे आजची ही वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी याविरोधात भूमिका घ्यायलाच हवी. आणि महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांनी जर कणखर भूमिका नाही घेतली तर या दख्खन प्रांताची जी ओळख आणि अस्मिता आहे त्यावरच हे वरवंटा फिरवतील आणि तेंव्हा वेळ निघून गेली असेल.

Raj Thackeray: महाराष्ट्राच्या वाट्याला काय? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे आक्रमक Read More »

manoj jarange on amruta fadnavis

Manoj Jarange on Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांच्या जेवणाच्या निमंत्रणावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया; ‘भाऊबीजेला नक्की येईन’

Manoj Jarange on Amruta Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू असून, उपोषणाचा कालावधी वाढत चालला आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना घरी जेवणासाठी येण्याचं निमंत्रण दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. या निमंत्रणावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत, “भाऊबीजेला जेवायला येईन,” असं म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे हे आपले भाऊ असल्याचं सांगत त्यांना घरी जेवणासाठी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यावर पत्रकारांनी जरांगे यांना प्रतिक्रिया विचारली. यावेळी त्यांनी मिश्कील पण स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. “ताईने सांगितलंय ना, मग जेवायला पण जाऊ,” असं जरांगे म्हणाले. मात्र, त्याचवेळी त्यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं वक्तव्यही केलं. भाऊ आंदोलनाच्या मैदानात असताना आणि संघर्ष करत असताना बहिणीने त्याला जेवायला बोलवू नये, असं त्यांनी सांगितलं. जरांगे यांनी पुढे भाऊबीजेचा संदर्भ देत अमृता फडणवीस यांना उद्देशून म्हटलं की, “बहिणीने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं. मी साडी-चोळी घेऊन येईन.” असेही यावेळी ते म्हणाले. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 13वा दिवस सुरू आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारकडून युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं सांगितलं जात असलं तरी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर अंतिम तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पुढील निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाकडून चर्चा सुरू असली तरी आपण शिष्टमंडळाची वाट पाहत नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं. आगामी काळात आंदोलनाची दिशा अधिक तीव्र होण्याचे संकेतही त्यांनी दिले. ‘मुंबईला जाणार हे निश्चित’ मनोज जरांगे यांनी यावेळी आपल्या मुंबईकडे होणाऱ्या पुढील आंदोलनाबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलं. “मी मुंबईला जाणार हे निश्चित आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. 12 तारखेला आंदोलक एकत्र आल्यानंतर मुंबईकडे जाण्याची तारीख जाहीर केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. कुणबी प्रमाणपत्रांसाठी सुरू असलेल्या शिबिरांवरही त्यांनी भाष्य केलं. आंदोलन सुरू असल्यामुळे ही शिबिरं घेतली जात आहेत का, त्यांची अंमलबजावणी कशी होते आणि सरकार त्याबाबत नेमकं काय करत आहे, याकडे आपण लक्ष ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

Manoj Jarange on Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांच्या जेवणाच्या निमंत्रणावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया; ‘भाऊबीजेला नक्की येईन’ Read More »

nitesh rane

डीजेला विरोध असेल तर ईदच्या मिरवणुकीतही डीजे बंद करा

Nitesh Rane : विश्व हिंदू परिषदेने घेतलेल्या भूमिकेवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. विश्व हिंदू परिषदेची भूमिका हा राजकीय नव्हे, तर धार्मिक विषय असल्याचे सांगत राणे यांनी हिंदू सणांबाबतच नियम आणि आव्हाने का दिली जातात, असा सवाल केला. तसेच डीजे, मराठा आरक्षण, राज ठाकरे यांचे GDP वरील वक्तव्य आणि दिशा सालियन प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. ‘विश्व हिंदू परिषदेची भूमिका धार्मिक, राजकीय नाही’ विश्व हिंदू परिषदेने घेतलेली भूमिका ही राजकीय नसून धार्मिक विषयाशी संबंधित असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. एखाद्या भूमिकेवर कोणी टीका केली म्हणून तो राजकीय विषय ठरत नाही, असेही ते म्हणाले. “ईदचा सण झाला. जे इस्लाम धर्माला मानतात, त्यांच्यात कोणत्याही हिंदूला सहभागी होण्याची परवानगी नाही. मग हिंदू धर्मात अशी परवानगी कशी असेल?” असा सवाल राणे यांनी केला. विश्व हिंदू परिषदेने कोणत्याही धर्माला डिवचण्यासाठी ही मागणी केलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हिंदू सणांच्या वेळीच नियम आणि सूचना का दिल्या जातात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “सगळी आव्हानं फक्त हिंदूंनाच का? गणेश चतुर्थीच्या वेळी चपला मारू नका, अंडी मारू नका, असा सल्ला मुल्ला-मौलवी का देत नाहीत? आम्हालाच का सगळे सल्ले? यांना का नाही? हिंमत असेल तर ईदच्या अगोदर बोलून दाखवा,” असे राणे म्हणाले. सनातन धर्माला टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत, “बाळासाहेब ठाकरे बोलण्याची हिंमत करायचे,” असे म्हटले. ‘डीजेचा त्रास असेल तर ईदच्या मिरवणुकीतही बंद करा’ गणेशोत्सवातील डीजेच्या मुद्द्यावरूनही नितेश राणे यांनी भूमिका मांडली. डीजेमुळे नागरिकांना त्रास होत असेल तर सर्व धर्मांच्या मिरवणुकींसाठी समान नियम असायला हवेत, असे ते म्हणाले. “डीजे ईदला वाजत नाही का? मुख्यमंत्र्यांच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सांस्कृतिक पद्धतीने सण साजरा करा. पण डीजेमुळे त्रास होत असेल तर ईदच्या मिरवणुकीतही डीजे बंद करा,” असे राणे म्हणाले. आमच्या धर्मात कोणालाही त्रास देण्याचे कुठेही लिहिलेले नाही, असे सांगत डीजेबाबत सर्वांसाठी समान नियम असण्याची मागणी त्यांनी केली. रस्त्यावर होणाऱ्या नमाजाबाबत आणि ईदच्या मिरवणुकांबाबतही हाच नियम लागू असायला हवा, असे राणे म्हणाले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात समानतेचा विचार मांडला आहे. हे सर्वच हिंदू धर्म मानतो. मग इतर धर्मांसाठी वेगळे नियम का? कायदा सर्वांसाठी समान असायला पाहिजे,” असे त्यांनी म्हटले. मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणे यांनी राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. “सर्व जातींना समान न्याय देण्याची जबाबदारी आमची आणि महायुतीची आहे. हिंदू समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जातींचा विचार आमचे सरकार नक्कीच करेल,” असे राणे म्हणाले. यावेळी त्यांनी एका नेत्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत, “त्यांच्या मालकाला सांगायला पाहिजे की, संध्याकाळच्या कार्यक्रमाला जाऊ नका. सकाळी तुम्ही गुजराती समाजाबद्दल बोलता आणि तुमच्या मालकाचा मुलगा संध्याकाळी गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला जातो,” असा टोला लगावला. राज ठाकरे यांच्या GDP वक्तव्यावर राणेंचा टोला राज ठाकरे यांनी GDP संदर्भात केलेल्या वक्तव्यावरही राणे यांनी टीका केली. “GDP आणि ठाकरेंचा काय संबंध आहे?” असा सवाल करत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर उपरोधिक टिप्पणी केली. “GDP चा फुल फॉर्म सांगायचा असेल, तर त्यांच्याच भाषेत सांगतो कॅमेरा बंद करा,” असे म्हणत राणे यांनी आपली भूमिका मांडली. दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंना सवाल दिशा सालियन प्रकरणावरूनही नितेश राणे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगत असतील, तर त्यांच्या वकिलांनी या प्रकरणात प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हिट) का केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आदित्य ठाकरे म्हणतात की, माझा या केसशी संबंध नाही. मग त्यांच्या वकिलांनी अॅफिडेव्हिट का केलं? महाविकास आघाडीच्या काळात लपवालपवी का झाली? जर तुमचा या प्रकरणाशी संबंध नाही, तर तुमच्या वकिलांना सांगा ते कोर्टात का उपस्थित राहतात?” असा सवाल राणे यांनी केला. दिशा सालियन प्रकरणात महाविकास आघाडी सरकारच्या काळात लपवालपवी झाल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

डीजेला विरोध असेल तर ईदच्या मिरवणुकीतही डीजे बंद करा Read More »

satyajeet tambe

Satyajeet Tambe : तुम्ही फक्त उद्घाटनं करत बसा; काम मात्र आम्ही करणार…

Satyajeet Tambe : जनतेने आम्हाला काम करण्याचा कौल दिला आहे. तुम्ही फक्त उद्घाटनं करत बसा, काम मात्र आम्ही करणार. श्रेयाची आम्हाला गरज नाही; श्रेय कोणीही घ्या. ज्या विश्वासाने संगमनेरकरांनी आमच्यावर जबाबदारी टाकली आहे, ती पार पाडल्याशिवाय राहणार नाही,” असा स्पष्ट संदेश आमदार सत्यजीत तांबे यांनी दिला. संगमनेर नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा कार्यक्रम  नगरपरिषद प्रांगणात बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नातून उत्साहात पार पडला. यावेळी तांबे बोलत होते. या कार्यक्रमास बाळासाहेब थोरात, कार्यक्रमाध्यक्ष डॉ. सुधीर तांबे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई मालपाणी, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, कैलासराव लोणारी, अरुणराव वाकचौरे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांसह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व नागरिक उपस्थित होते. आमदार तांबे यांनी यावेळी  संगमनेर 2.0’ च्या माध्यमातून शहराच्या विकासाचा नवा टप्पा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरात पाणी उपलब्ध असले तरी काही भागात कमी दाबाने किंवा अशुद्ध पाणी येते. त्यामुळे २० ते २५ वर्षे जुन्या पाणीपुरवठा पाइपलाइन बदलणे, पाण्याचा दाब व गुणवत्ता सुधारणे, भूमिगत वीजवाहिन्या, भुयारी गटार आणि दर्जेदार रस्त्यांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकासासाठी निधी आणण्यावर भर राज्य शासनाकडून पूर्वीच्या तुलनेत योजनांमध्ये नगरपालिकेचा वाटा वाढला असून काही योजनांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत स्थानिक स्वनिधी उभारावा लागतो, असे तांबे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, उत्पन्न वाढविणे आणि खर्च कमी करणे हा महत्त्वाचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या म्युनिसिपल बाँडची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून क्रेडिट रेटिंगही करण्यात आले आहे. संगमनेर नगरपालिकेने यापूर्वीही बाँडच्या माध्यमातून निधी उभारला असल्याची जुनी कागदपत्रे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिकेचे दरमहा सुमारे ४० लाख रुपयांचे वीजबिल येत असल्याने खर्च कमी करण्यासाठी मोठा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. पुढील वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करून वीजबिल चार-पाच लाखांच्या आसपास आणण्याचा प्रयत्न असल्याचे तांबे यांनी सांगितले. 200 सीसीटीव्ही आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष शहराच्या सुरक्षेसाठी २०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ११ ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा उभारण्यात आली आहे. नगरपालिकेत अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला असून त्यातून शहरातील कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवता येणार आहे. पोलीस व रक्षक दलालाही या व्यवस्थेचा थेट उपयोग होणार आहे. महिलांची व मुलींची सुरक्षा हा निधी वापरण्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे तांबे यांनी सांगितले. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे त्यांनी आभार मानले. शहरातील रस्त्यांच्या तक्रारींची दखल घेत पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने सर्व रस्ते दर्जेदार करण्याचे आश्वासन तांबे यांनी दिले. प्रत्येक रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र सेवानिवृत्त अभियंत्यामार्फत थर्ड पार्टी क्वालिटी तपासणी करण्यात येणार आहे. शहरातील छोट्या व्यावसायिकांना सुरक्षित व स्वच्छ जागा मिळावी यासाठी ११ ते १२ ठिकाणी फूड कोर्ट उभारण्याचे नियोजन आहे. दोन अधिकृत भाजी मार्केट सुरू करण्यात आले असून त्यापैकी एका ठिकाणी सुमारे १०० व्यापारी व शेतकऱ्यांना जागा उपलब्ध होणार आहे. ऑक्टोबरपासून नवीन कचरा व्यवस्थापन व्यवस्था सुरू होणार असून धूळमुक्त संगमनेर करण्यासाठी आधुनिक मशीनरी वापरण्यात येणार आहे. तसेच, महिला रुग्णालयाच्या प्रलंबित कामासाठी नगरपालिकेने बांधकामाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. शासनाने डॉक्टर, औषधे, एमआरआय, एक्स-रे आदी आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे तांबे यांनी सांगितले. नियोजनातून शहराचा विकास करा- बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात यांनी शहराच्या विकासासोबत स्वच्छता, अतिक्रमण आणि योग्य नियोजनावर भर दिला. रस्ता तयार केल्यानंतर पुन्हा तो खोदण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्व विभागांचे आधीच नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. छोट्या व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था देऊन शहर अधिक शिस्तबद्ध व सुंदर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी मागील आठ महिन्यांतील कामांचा आढावा घेत २०० सीसीटीव्ही, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, फूड कोर्ट, भाजी मार्केट, स्वच्छता मोहीम, रक्षक दल आणि प्राणी नियंत्रण केंद्र याबाबत माहिती दिली. शहरात अडीच ते तीन हजार झाडांची लागवड केल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी गणेशोत्सवासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Satyajeet Tambe : तुम्ही फक्त उद्घाटनं करत बसा; काम मात्र आम्ही करणार… Read More »

siya goyal

Ketan Agarwal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक; रितेश हांगे नवाचा पोलिसांच्या ताब्यात

Ketan Agarwal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या अटकेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात आणखी एका संशयिताला अटक केली आहे. रितेश हांगे नवाचा (वय २३, रा. लोणावळा ग्रामीण) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रितेश हा चेतन चौधरीचा मित्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रितेशला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या तपासाबाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) संदीपसिंग गिल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलिसांच्या तपासानुसार, चेतन, सिया आणि रितेश यांच्यात मैत्री होती. केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी झालेल्या नियोजनाची माहिती रितेशला होती. व्हॉट्सॲपवरील संदेश आणि इतर पुराव्यांच्या आधारे रितेशचा या प्रकरणात सक्रिय सहभाग असल्याचे समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली. केतन अग्रवालची हत्या करण्यासाठी सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट किलिंगची योजना आखण्यात आली होती. मात्र, नंतर हा प्लॅन बदलण्यात आला आणि चेतन, सिया आणि रितेश यांनी स्वतःच केतनची हत्या करण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. सध्या तरी अन्य कोणतीही व्यक्ती तपासात समोर आलेली नसल्याचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी स्पष्ट केले. रितेशकडून मिळणाऱ्या माहितीतून हत्येच्या कटातील आणखी बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Ketan Agarwal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक; रितेश हांगे नवाचा पोलिसांच्या ताब्यात Read More »