DNA मराठी

Maharashtra latest news

shrikant pangarkar

Shrikant Pangarkar : मी निर्दोश, गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही ; श्रीकांत पांगारकर

Shrikant Pangarkar : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महानगर पालिकेत नगरसेवक पदी निवडून आल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. जालना महापालिका निवडणुकीत श्रीकांत पांगारकर यांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याठिकाणी श्रीकांत पांगारकर विजयी झालेत. गौरी लंकेश यांची सप्टेंबर 2017 मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणात श्रीकांत पांगारकर  संशयित म्हणून अटकेत होते. न्यायालयाने सप्टेंबर 2024 मध्ये श्रीकांत पांगारकरना जामीन मंजूर केला होता.. त्यांनतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या जालना महानगरपालिका निवडणुकीत पांगारकर यांनी अपक्ष म्हणून उडी घेतली. या निवडणुकीत श्रीकांत पांगारकर विजयी झालेत. दरम्यान गौरी लंकेश हत्या प्रकरणात मी निर्दोश आहे. म्हणून माझा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया पांगारकर यांनी दिलीये. जालना महापालिकेसाठी पहिल्यांदा झालेल्या निवडणुकीत भाजपने 41 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजप महापौरासाठी कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Shrikant Pangarkar : मी निर्दोश, गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही ; श्रीकांत पांगारकर Read More »

Pune Election: पुण्यात भाजपने दिला अनेकांना धक्का.., 119 जागा जिंकत मारली बाजी

Pune Election: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणेकरांनी मोठा धक्का दिला आहे. भाजपने या निवडणुकीत तब्बल 119 जागा जिंकत स्वबळावर बहुमत मिळवला आहे. आमही या निवडणुकीत 120-125 जागा जिंकणार असा दावा पुण्यात भाजपकडून करण्यात येत होता. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला अवघ्या 27 जागांवर समाधान मानावे लागले आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता मात्र त्याचा काहीच फायदा पक्षाला झाला नसल्याने आता स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे पुण्यात युतीसाठी अनेक प्रयत्न करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुण्यात खात देखील उघडता आलं नाही. तर शिवसेना ठाकरे गटाने एका जागेवर बाजी मारली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत 15 जागा जिंकल्या आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 3 जागा मिळाले आहे. शरद पवार पक्षाची कामगिरी या निवडणुकीत खराब राहिल्याने येणाऱ्या दिवसात पुण्यातील राजकारणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. कधीकाळी बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यात शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. एकूण जागा 165 भाजप- 119 शिवसेना -0 ऊबाठा-1 राष्ट्रवादी शरद पवार -3 राष्ट्रवादी अजित पवार – 27 काँग्रेस -15 एमआयएम-0 अपक्ष-0

Pune Election: पुण्यात भाजपने दिला अनेकांना धक्का.., 119 जागा जिंकत मारली बाजी Read More »

ajit pawar

Pune Election : ‘1 अलार्म, 5 काम’: गतिमान पुण्यासाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Pune Election : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा पुणेकरांसमोर मांडला.  ‘अष्टसूत्री प्रगती’ (विकासाचे आठ स्तंभं) आणि ‘अष्टावधानि नेतृत्व’ (आठ दिशेचं सजग नेतृत्व) या तत्त्वांवर आधारित हा जाहीरनामा पुण्याच्या सुयोग्य आणि जबाबदार विकासाची दिशा दर्शवतो.   सहा महिन्यांचे सखोल सर्वेक्षण, प्रभागनिहाय संवाद आणि जनसंवाद मोहिमेतून तयार झालेल्या या जाहीरनाम्याने पुणेकरांच्या अपेक्षा आणि स्थानिक समस्यांचा सखोल अभ्यास केला आहे. यामधून जनता घोषणेपेक्षा खात्रीशीर अंमलबजावणीची अपेक्षा ठेवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ‘अष्टसूत्री–अष्टावधानि’ हा आराखडा अजितदादांच्या तीन दशकांच्या प्रशासकीय अनुभवावर आधारित आहे. सतत जागरूक राहणे, प्रशासनाचा सखोल अभ्यास आणि कामाचा शेवटपर्यंत पाठपुरावा ही त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख आहे. वेळेत निर्णय घेणे, नियोजन आणि शिस्तबद्ध काम आणि कामात विलंबाला शून्य सहनशीलता हे त्यांच्या कामाचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. अष्टसूत्री प्रगती – पुण्याच्या पुनर्बांधणीसाठी आठ स्तंभ दररोज पाणीपुरवठा: सर्व 41 प्रभागांमध्ये उच्च दाबाने नियोजित वेळापत्रकानुसार पाण्याचा पुरवठा, टँकरची आवश्यकता संपविणे, पाईपलाईन गळती पूर्णपणे बंद करणे आणि भामा–मुळा–मुठा प्रकल्पांतून अतिरिक्त पाणी उपलब्ध करणे.   वाहतूककोंडीमुक्त, खड्डेमुक्त रस्ते: अपूर्ण लिंक रस्त्यांची जोडणी, मुख्य 150 किमी रस्त्यांचा दर्जा सुधारणे, एचसीएमटीआरची अंमलबजावणी, ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करणे आणि नव्याने समाविष्ट गावांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे.   स्वच्छतेचा विज्ञाननिष्ठ आराखडा: 100% कचरा वर्गीकरण आणि कंपोस्टिंग, अपयशी प्रकल्पांचं पुनरुज्जीवन, हरित सोसायट्यांना प्रोत्साहन आणि 2029 पर्यंत पुणे ‘स्वच्छ सर्वेक्षण’मधील अग्रगण्य तीन शहरांत समावेश करणे. हाय-टेक आरोग्य सेवा: 200 ‘राजमाता जिजाऊ क्लिनिक’, या नव्या रुग्णालयांची उभारणी, परवडणारी तपासणी सेवा (PPP पद्धतीने), टेलिमेडिसिनचा उपयोग आणि गरीब रुग्णांसाठी वाढीव आर्थिक सहाय्य.   प्रदूषणमुक्त, उत्तम हवामानयुक्त पुणे: पूर नियंत्रण, ड्रेनेज नियोजन, नाल्यांचे संरक्षण, हरित विस्तार, पर्यावरण सक्षमीकरण आणि हवामान बदलास सज्ज असा शाश्वत विकास आराखडा.   झोपडपट्टी पुनर्वसन व सुरक्षित पुनर्विकास: मूळ जागेवर पुनर्वसन, कायदेशीर धारकांना संरक्षण, पारदर्शी कारभार, उपजीविकेची हमी आणि जुन्या इमारतींच्या रहिवाशांच्या नेतृत्वात पुनर्विकास प्रक्रिया.   पुणेकरांसाठी जबाबदार प्रशासन निर्मिती: मोफत मेट्रो व बस प्रवास, छोट्या घरांसाठी मालमत्ता कर सवलत, विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट, व्याजमुक्त स्वयंरोजगार कर्ज आणि तातडीची प्रतिसादक्षमता असलेलं प्रशासन.   पुणे मॉडेल शाळा: CBSE/ICSE दर्जानुसार 150 आधुनिक शाळा, प्रशिक्षित शिक्षक, विज्ञान- संगणक प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा, मराठी माध्यमावर आधारलेली इंग्रजी शिक्षण पद्धती आणि पालकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार नसणार.  

Pune Election : ‘1 अलार्म, 5 काम’: गतिमान पुण्यासाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध Read More »

dhananjay munde

Dhananjay Munde : आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय; करुणा मुंडेंना धक्का

Dhananjay Munde : माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढ्यात विजय झाला आहे. विधानसभा निवडणूक 2024 मधील त्यांच्या उमेदवारी अर्ज सोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलेल्या माहितीवर आक्षेप घेत लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्या न्यायालयात करुणा शर्मा यांनी फौजदारी कारवाई करण्याबाबत फिर्याद प्रकरण दाखल केले होते. याबाबत आज परळी न्यायालयाने निकाल दिला असून सदर प्रकरणातील सर्व आरोप तथ्यहीन असल्याने ते फेटाळून लावले आहेत. धनंजय मुंडे यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये नमूद माहितीवरून करुणा शर्मा यांनी वेगवेगळे आरोप करत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी परळीच्या प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली, करुणा शर्मा यांनी नोंदवलेला जबाब, वकिलांचा युक्तिवाद यांसह वस्तुस्थिती लक्षात घेत न्यायालयाने करुणा शर्मा यांनी दाखल केलेली फिर्याद फेटाळून लावली आहे. धनंजय मुंडे यांच्या वतीने ॲड. अशोक कवडे यांच्या सह ॲड. हरिभाऊ गुट्टे यांनी काम पाहिले. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाजूने न्यायालयाने आणखी निकाल दिला आहे. याआधी देखील कृषी विभागाच्या खरेदी वरून निरनिराळे आरोप करत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये देखील कोणतेही तथ्य आढळले नाही आणि ते प्रकरण देखील मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत तक्रारदाराला उलट दंड लावला होता. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी परळीत एकहाती सत्ता कायम राखली, तेव्हा देखील न्यायालयाच्या निकालात आणि जनतेच्या निकालात आपला विजय झाल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

Dhananjay Munde : आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय; करुणा मुंडेंना धक्का Read More »

crime

Pune Crime: धक्कादायक, अंधश्रद्धेच्या जाळ्यात आयटी अभियंता अडकला; भोंदूनी 14 कोटींचा गंडा घातला…

Pune Crime: पुण्यात अंधश्रद्धेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका आयटी क्षेत्रातील अभियंत्याची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक एका तथाकथित ‘गुरु’ आणि त्याच्या शिष्येने केल्याचे उघड झाले आहे. ‘दैवी शक्ती अंगात येते’ या नावाखाली या भोंदू जोडीने अभियंता आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक व मानसिकपणे मोठी फसवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फसवणुकीचा बळी ठरलेले अभियंता दीपक डोळस हे काही वर्षे इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यांच्या दोन मुली आजारपणाने त्रस्त असल्याने त्यांनी उपचारासाठी अनेक ठिकाणी धावपळ केली. त्याच काळात त्यांची ओळख राजेंद्र उर्फ दीपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपुरकर यांच्याशी झाली. या दोघांनी ‘शंकर महाराज आमच्यात अवतरतात आणि ते दुर्धर आजार बरे करतात’ असा दावा करत डोळस कुटुंबाचा विश्वास संपादन केला. वेदिका हिने स्वतःच्या अंगात ‘शंकर महाराज’ आले आहेत असा आभास निर्माण केला. त्यानंतर त्यांनी डोळस यांना सांगितले की, पूजा करून आणि धन ‘दैवी शक्ती’साठी वापरल्यास त्यांच्या मुलींचे आजार दूर होतील. या बहाण्याने दोघांनी डोळस दांपत्याकडील सर्व बँक ठेवी आणि बचत निधी आपल्या खात्यात वळवून घेतला. एवढ्यावर न थांबता, डोळस यांचे इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकून त्याचे पैसेही वेदिका पंढरपुरकरच्या खात्यात जमा करण्यात आले. तरीही मुलींच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने डोळस यांनी कारण विचारले असता, खडके-पंढरपुरकर जोडीने त्यांच्या घरात ‘दोष’ असल्याचे सांगून आणखी पैसे मागितले. त्यांनी पुण्यातील मालमत्ता विकण्यास सांगितले, आणि जेव्हा काहीच उरले नाही, तेव्हा घरावर आणि वैयक्तिक कर्ज काढण्यास भाग पाडले. 2018 पासून सुरू असलेल्या या फसवणुकीतून या भोंदू जोडीने एकूण 14 कोटी रुपये डोळस यांच्याकडून घेतले. पोलिस तपासात समोर आले आहे की, या पैशातून दोघांनी कोथरुडमधील महात्मा सोसायटी परिसरात एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. या घटनेनंतर डोळस कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, सध्या पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेल्या अशा आर्थिक फसवणुकीने पुन्हा एकदा समाजात जागरूकतेची गरज अधोरेखित केली आहे.

Pune Crime: धक्कादायक, अंधश्रद्धेच्या जाळ्यात आयटी अभियंता अडकला; भोंदूनी 14 कोटींचा गंडा घातला… Read More »

devendra fadnavis

Maharashtra News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग

Maharashtra News : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यात सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची आकडेवारी व मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एकूण ३ हजार २५८ कोटी ५६ लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यास ८४६ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीचा लाभ जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. मदतीचा निधी वितरित करताना शासनाच्या नियम व निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या, नैसर्गिक आपत्ती संदर्भातील अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या तसेच लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Maharashtra News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग Read More »

img 20251006 wa0006

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये आता भीतीची वातावरण निर्माण होत आहे. यातच आता पोलिसांवरच हल्ल्यांच्या घटना घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर झाली आहे. रविवारी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली ज्यामुळे पुण्यातील कायद्याव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री डेक्कन परिसरात गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमोल काटकर (बकल क्र. 7835) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना लॉ कॉलेज रोडसमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार काटकर हे शनिवारी रात्री ड्युटी संपवून आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रात्री सुमारे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी अज्ञात कारणावरून त्यांच्यावर कोयत्याने वार केला. यात त्यांच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राथमिक तपासात ‘कट मारल्याच्या’ वादातून हल्ला झाल्याची चर्चा आहे. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून डेक्कन पोलीस ठाण्याने त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यावरच असा हल्ला होणे हे अत्यंत गंभीर असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला Read More »

ram shinde

Ram Shinde: तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्या; राम शिंदेंनी केली अतिवृष्टीग्रस्त कर्जत व जामखेडमधील भागांची पाहणी

Ram Shinde: अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागपूर, सितपूर, निंबोडी, तरडगाव, मलठण व जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांना विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुसळधार पावसामुळे शेती, चारा, जनावरांचे गोठे, रस्ते, पूल, बंधारे व पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांवर व घरांवरील छप्पर उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. चौंडी येथील शिल्पसृष्टीच्या बुरुजाला पाणी लागले असून चौंडी पुलावर ७ ते ८ फूट पाणी आल्याचेही या पाहणीत निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसांत पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, प्रभावित कुटुंबांना अन्न, पाणी व वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी तसेच पायाभूत सुविधांची दुरुस्ती व पुनर्बांधणी तातडीने सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. ग्रामस्थांना संवाद साधताना शिंदे म्हणाले, “ही आपत्ती ग्रामस्थांना एकट्याने लढायची नाही. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून एकही शेतकरी वा ग्रामस्थ मदतीपासून वंचित राहणार नाही. शासनस्तरावर आवश्यक ती मदत मिळविण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.” “ग्रामस्थांनी संयम राखावा, एकमेकांना सहकार्य करावे व प्रशासनाशी समन्वय ठेवून परिस्थितीचा सामना करावा”, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच कर्जत व जामखेड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Ram Shinde: तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्या; राम शिंदेंनी केली अतिवृष्टीग्रस्त कर्जत व जामखेडमधील भागांची पाहणी Read More »

सरकारची माघार, त्रिभाषा सूत्रासंदर्भात GR रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis: राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्रिभाषा सूत्राबाबत सांगोपांग अभ्यास करुन तसेच भविष्यात महत्त्वाच्या ठरणाऱ्या अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटचे महत्त्व विचारात घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय भाषा संदर्भातील काढण्यात आलेले राज्य सरकारचे 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 रोजीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर शासनाचा भर; एकनाथ शिंदे राज्य शासन जनभावनेचा आदर करणारे असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी 3600 कोटी महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. या लाडक्या बहिणींकरिता पुढील हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

सरकारची माघार, त्रिभाषा सूत्रासंदर्भात GR रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा Read More »

Ahilyanagar News : मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २६ जुन २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »