Maharashtra News: राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला व गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने 12,40,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.
अहमदनगर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शाहरुख शहा, नदीम शेख व रिजवान शेख (सर्व रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर) हे त्यांचा हस्तक दानिश सय्यद रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर व त्याचा साक्षीदार यांचे मार्फतीने सुगंधीत तंबाखु, पानमसाला व गुटखा राजु शेख व वसीम (रा. बीड) यांचेकडुन खरेदी करुन बीड जामखेड मार्गे अहमदनगर शहरात येणार आहे.
या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिचोंडी पाटील येथे सापळा लावून आरोपींना अटक केली आहे.
पोलीसांनी या कारवाईत विविध प्रकारची सुगंधी तंबाखु, गुटखा, पानमसाला, एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व एक टाटा इंडीगो कार असा एकुण 12,40,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जप्त केला आहे.
शिवाजी अशोक ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादविक 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.