DNA मराठी

latest update

nikki tamboli

Nikki Tamboli : निक्की तांबोळी-अरबाज पटेलचं ‘फेक ब्रेकअप’! ट्रोलिंगनंतर निक्कीचा संताप, म्हणाली- ‘बहती गंगा में सबने हाथ धोया, पण…’

Nikki Tamboli : ‘बिग बॉस मराठी 5’मधून चर्चेत आलेली अभिनेत्री निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांपासून दुरावल्याचे संकेत दिले होते. एकमेकांना अनफॉलो करणे, भावनिक पोस्ट आणि फसवणुकीशी संबंधित संकेत यामुळे दोघांचं नातं संपल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता या संपूर्ण ‘ब्रेकअप’मागचं कारण समोर आलं असून, हे सगळं त्यांच्या नव्या म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनसाठी केलेलं पीआर होता. या खुलाशानंतर निक्की आणि अरबाजला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. चाहत्यांची दिशाभूल केल्याचा आरोप होत असतानाच निक्की तांबोळीने आता ट्रोलर्सना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. सोशल मीडिया स्टोरीच्या माध्यमातून तिने आपली नाराजी व्यक्त करत, या संपूर्ण प्रकाराकडे ‘मार्केटिंग’ म्हणून पाहण्याचं आवाहन केलं आहे. नेमकं काय झालं होतं? निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची जवळीक ‘बिग बॉस मराठी 5’च्या घरात वाढली होती. शोदरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि शो संपल्यानंतरही त्यांचं नातं कायम असल्याचं दिसून आलं. दोघेही अनेकदा एकत्र दिसत होते आणि सोशल मीडियावरही एकमेकांसोबतचे फोटो व व्हिडिओ शेअर करत होते. अलीकडे मात्र अचानक दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं. त्यानंतर अरबाजने विश्वासघात आणि ‘चीटिंग’शी संबंधित एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टचा रोख निक्कीकडे असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला. निक्कीनेही त्यानंतर एक गूढ पोस्ट केल्याने ब्रेकअपच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. मात्र, त्या वेळी दोघांनी अधिकृतपणे ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं नव्हतं. सोशल मीडियावरील पोस्ट आणि दोघांच्या वागण्यात झालेला बदल पाहून अनेक चाहत्यांनी हे नातं तुटल्याचं गृहीत धरलं. काही चाहत्यांनी निक्कीला ट्रोल करण्यास सुरुवात केली, तर काहींनी अरबाजच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्याला पाठिंबा दिला. निक्कीने स्वतःला ‘सिंगल’ संबोधल्याची चर्चा आणि तिच्या भावनिक पोस्टमुळेही या प्रकरणाला अधिक रंग चढला होता. त्यामुळे हे प्रकरण केवळ सोशल मीडिया चर्चेपुरतं राहिलं नाही, तर मनोरंजन विश्वातही त्याची मोठी चर्चा झाली. अखेर समोर आलं ‘फेक ब्रेकअप’चं सत्य मात्र, म्युझिक व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामागील कारण स्पष्ट झालं. निक्की आणि अरबाज यांचा नवीन म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला असून, त्याच्या प्रमोशनसाठी दोघांनी ब्रेकअपचा सीन तयार केल्याचं समोर आलं. निक्कीने सांगितलं की, हे सगळं निर्मात्यांच्या प्लॅनचा भाग होतं. कलाकार म्हणून त्यांना जे सांगितलं जातं, त्यानुसार काम करावं लागतं. मात्र, सोशल मीडियावरील लोकांनी आणि चाहत्यांनी हे ब्रेकअप खरं मानलं. इतकंच नाही तर त्यांच्याकडे या विषयावर फोनही येऊ लागले होते, असं निक्कीने सांगितलं. ट्रोलिंगनंतर निक्कीचा पारा चढला फेक ब्रेकअपचा खुलासा झाल्यानंतर मात्र दोघांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. चाहत्यांना भावनिक केल्याचा आणि प्रसिद्धीसाठी नात्याचा वापर केल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला. या ट्रोलिंगनंतर निक्कीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ आणि त्यासोबत एक नोट शेअर केली. ट्रोलर्सना उद्देशून तिने अतिशय आक्रमक शब्दांत आपली भूमिका मांडली. निक्कीच्या म्हणण्यानुसार, लोकांनी या संपूर्ण प्रकरणावर रील्स बनवल्या, कथा तयार केल्या आणि त्यातून कंटेंट तयार केला. पण तिने मात्र याच चर्चेचा उपयोग स्वतःच्या गाण्याच्या प्रमोशनसाठी केला. ‘बहती गंगा में सबने हाथ धोया, पण ती गंगा मी तयार केली,’ अशा आशयाची प्रतिक्रिया देत तिने हा सगळा प्रकार मार्केटिंगचा भाग असल्याचं स्पष्ट केलं. ‘हीच तर मार्केटिंग आहे’, निक्कीचा दावा निक्कीने आपल्या पोस्टमधून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की, सोशल मीडियावर निर्माण झालेल्या चर्चेचा फायदा तिच्या गाण्याला झाला. लोकांनी या कथित ब्रेकअपवर चर्चा केली, रील्स बनवल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट तयार केला. त्यामुळे म्युझिक व्हिडिओकडे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधलं गेलं. निक्कीने हा प्रकार ‘मार्केटिंग’ असल्याचं सांगत, ट्रोलिंगलाही अप्रत्यक्षपणे आपल्या प्रमोशनचा भाग ठरवलं. दोन वर्षांपासून चर्चेत आहे निक्की-अरबाजचं नातं निक्की आणि अरबाज यांचं नातं ‘बिग बॉस मराठी 5’पासून चर्चेत आहे. रिअॅलिटी शोमध्ये दोघांची जवळीक वाढली आणि त्यानंतरही त्यांचं नातं कायम राहिलं. दोघे ‘द 50’ या शोमध्येही एकत्र दिसले. या शोदरम्यान अरबाजने निक्कीला लग्नासाठी प्रपोज केल्याचंही समोर आलं होतं. निक्कीनेही अरबाजसाठी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाण्याची तयारी केल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता होती. मग खरंच ब्रेकअप झालंय का? या सगळ्या प्रकारानंतर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की निक्की आणि अरबाज खरंच वेगळे झाले आहेत की हा पूर्णपणे प्रमोशनल स्टंट होता? सध्या उपलब्ध माहितीनुसार, दोघांनी ज्या पद्धतीने ब्रेकअपचं वातावरण तयार केलं होतं, त्याचा संबंध त्यांच्या नवीन म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनशी असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, त्यांच्या वैयक्तिक नात्याची सद्यस्थिती याबाबत दोघांकडून स्वतंत्र आणि सविस्तर अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.

Nikki Tamboli : निक्की तांबोळी-अरबाज पटेलचं ‘फेक ब्रेकअप’! ट्रोलिंगनंतर निक्कीचा संताप, म्हणाली- ‘बहती गंगा में सबने हाथ धोया, पण…’ Read More »

sim card

New SIM Rules: नवीन SIM कार्ड घ्यायचे आहे? आधी ‘हे’ नियम जाणून घ्या

New SIM Rules:   नवीन SIM कार्ड घेण्यापूर्वी आता तुमच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन सुरू आहेत, याची माहितीअसणे गरजेचे आहे. बनावट कागदपत्रांद्वारे SIM कार्ड घेणे, मोबाईल कनेक्शनचा गैरवापर आणि सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) मोबाईल कनेक्शनबाबत नियम कडक केले आहेत. त्यामुळे ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त SIM कार्ड तुमच्या नावावर असतील, तर नवीन कनेक्शन मिळण्यात अडचण येऊ शकते. एका व्यक्तीच्या नावावर किती SIM कार्ड असू शकतात? दूरसंचार विभागाच्या नियमानुसार, भारतातील सामान्य नागरिकाच्या नावावर जास्तीत जास्त 9 मोबाईल कनेक्शन असू शकतात. ही मर्यादा एखाद्या एका कंपनीपुरती मर्यादित नाही. म्हणजेच तुमच्याकडे Jio, Airtel, Vi, BSNL किंवा इतर कंपन्यांचे SIM कार्ड असले तरी सर्व सक्रिय कनेक्शन एकत्र मोजले जातात.  उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या नावावर Airtel चे 3, Jioचे 3 आणि Viचे 3 नंबर असतील, तर एकूण 9 कनेक्शन पूर्ण झाले असे समजले जाईल. अशा परिस्थितीत दहावे SIM कार्ड घेण्यासाठी अर्ज केल्यास नवीन कनेक्शन मिळणार नाही. या राज्यांमध्ये मर्यादा 6 SIMची असम, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ही मर्यादा आणखी कमी आहे. या भागातील ग्राहकाच्या नावावर जास्तीत जास्त 6 मोबाईल कनेक्शन ठेवता येतात. त्यामुळे या भागातील एखाद्या ग्राहकाकडे आधीच 6 सक्रिय नंबर असतील, तर नवीन SIM कार्ड घेता येणार नाही.  नवीन SIM घेण्यापूर्वी कंपन्या काय तपासणार? नवीन SIM कार्डसाठी अर्ज केल्यानंतर संबंधित टेलिकॉम कंपनी ग्राहकाच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन आहेत, याची पडताळणी करेल. जर ग्राहकाने निर्धारित मर्यादा आधीच पूर्ण केली असेल, तर अतिरिक्त मोबाईल कनेक्शन देण्यास नकार दिला जाऊ शकतो.  या प्रक्रियेचा उद्देश केवळ SIMची संख्या नियंत्रित करणे नाही, तर एका व्यक्तीच्या ओळखपत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणावर SIM कार्ड घेऊन त्यांचा गैरवापर होऊ नये, हा देखील आहे. तुमच्या नावावर किती SIM आहेत हे कसे तपासाल? तुमच्या नावावर सध्या किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत, हे घरबसल्या तपासता येते. यासाठी केंद्र सरकारच्या संचार साथी (Sanchar Saathi) पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ‘Know Mobile Connections in Your Name’ या सुविधेचा वापर करता येतो. ही सुविधा TAFCOP म्हणूनही ओळखली जाते. दूरसंचार विभागाच्या अधिकृत पोर्टलवर या सुविधेद्वारे तुमच्या नावावर जारी झालेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती पाहता येते.  संचार साथीच्या अधिकृत पोर्टलवर तपासा यासाठी सामान्यतः तुमचा चालू मोबाईल नंबर, कॅप्चा आणि OTPच्या माध्यमातून पडताळणी करावी लागते. त्यानंतर तुमच्या नावावर नोंद असलेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती स्क्रीनवर दिसते.  अनोळखी नंबर तुमच्या नावावर असेल तर? समजा, तुम्ही संचार साथी पोर्टलवर तुमच्या नावावर असलेल्या मोबाईल नंबरची यादी तपासली आणि त्यात असा नंबर आढळला जो तुम्ही कधी घेतलाच नाही. अशा वेळी ही बाब दुर्लक्षित करू नका. संबंधित नंबरबाबत पोर्टलवरून रिपोर्ट करता येतो. तसेच तुम्ही वापरत नसलेले किंवा आता आवश्यक नसलेले कनेक्शनही तपासून त्याबाबत योग्य पर्याय निवडता येतो. दूरसंचार विभागाच्या प्रक्रियेनुसार संशयास्पद कनेक्शनची पुन्हा पडताळणी केली जाऊ शकते आणि पडताळणी अयशस्वी झाल्यास ते कनेक्शन बंद केले जाऊ शकते.  जुना नंबर बंद केला असेल तर काय? अनेक लोक जुना मोबाईल नंबर वापरणे बंद करतात आणि नवीन नंबर घेतात. मात्र जुना नंबर अधिकृतपणे बंद किंवा निष्क्रिय झाला आहे की नाही, याची खात्री न केल्यास तुमच्या नावावर सक्रिय कनेक्शनची संख्या वाढू शकते. त्यामुळे नवीन SIM घेण्यापूर्वी जुन्या नंबरची स्थिती तपासणे फायदेशीर ठरते. विशेषतः अनेक वर्षांपासून वापरत नसलेले नंबर तुमच्या नावावर आहेत का, हे संचार साथीच्या माध्यमातून तपासता येते. सरकारने हे नियम कडक का केले? मोबाईल SIM कार्डचा वापर आता फक्त फोन कॉलसाठी होत नाही. बँकिंग, UPI, सोशल मीडिया, ई-कॉमर्स, OTP आणि अनेक डिजिटल सेवांसाठी मोबाईल नंबरचा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावावर अनधिकृत SIM कार्ड सक्रिय असणे गंभीर ठरू शकते. दूरसंचार विभागाने बनावट कागदपत्रांवर घेतलेल्या मोबाईल कनेक्शनविरोधातही मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. विभागाच्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या संशयित मोबाईल कनेक्शनचे विश्लेषण करून लाखो कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत.

New SIM Rules: नवीन SIM कार्ड घ्यायचे आहे? आधी ‘हे’ नियम जाणून घ्या Read More »

rahul gandhi on election comission

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा; ABVP-NSUI आमनेसामने

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरटीओ कार्यालय परिसरातील एसएसपीएमएसच्या मैदानावर दुपारी ४.३० ते रात्री ९.३० या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी पोलिसांकडून काही अटी आणि नियमांच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. शुक्रवारी रात्री सीओईपी महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि काँग्रेसशी संबंधित एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये शुल्काच्या मुद्द्यावरून वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर घोषणाबाजी आणि गोंधळात झाले. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी विशेष नियोजन केले आहे. कार्यक्रमस्थळी आक्षेपार्ह फलक अथवा चित्रे लावू नयेत, तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना आयोजकांना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाला दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मैदानाच्या परिसरात सुमारे ५०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी सुमारे ७०० वाहतूक पोलिसांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी संघटनांमधील ताजा वाद आणि राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला अपेक्षित असलेली मोठी गर्दी पाहता, पोलिसांकडून संपूर्ण परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा; ABVP-NSUI आमनेसामने Read More »

maruti baleno facelift

Maruti Baleno Facelift सप्टेंबरमध्ये येणार; लूकपासून फीचर्सपर्यंत काय बदलणार?

Maruti Baleno Facelift : प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये लोकप्रिय असलेल्या मारुती सुझुकी बलेनोच्या नव्या फेसलिफ्ट मॉडेलची उत्सुकता आता वाढली आहे. कंपनी 5 सप्टेंबर 2026 रोजी बलेनो फेसलिफ्ट भारतीय बाजारात सादर करण्याची शक्यता आहे. टेस्टिंगदरम्यान या कारचे प्रोटोटाइप अनेकदा रस्त्यावर दिसून आले असून, त्यावरून कारच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. समोरच्या डिझाइनमध्ये मोठा बदल नव्या बलेनो फेसलिफ्टमध्ये सर्वाधिक बदल कारच्या फ्रंट प्रोफाइलमध्ये पाहायला मिळू शकतात. टेस्टिंग मॉडेलवरून नवीन ग्रिल, अपडेटेड फ्रंट बंपर आणि नव्या डिझाइनची अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे. स्पाय शॉट्सनुसार ग्रिलचा आकार सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक स्लीक असू शकतो. हेडलॅम्प आणि बूमरँग-शेप LED DRLs मात्र मोठ्या प्रमाणात कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. मागील बाजूस फार मोठा बदल अपेक्षित नसला तरी बंपर किंवा लाइटिंगमध्ये किरकोळ अपडेट मिळू शकतात. इंटिरिअरमध्ये मिळू शकतात नवीन सुविधा बलेनो फेसलिफ्टच्या केबिनचा बेसिक डॅशबोर्ड लेआउट सध्याच्या मॉडेलसारखाच राहण्याची शक्यता आहे. मात्र, ग्राहकांना अधिक प्रीमियम अनुभव देण्यासाठी नवीन सीट अपहोल्स्ट्री, अॅम्बियंट लायटिंग आणि सिंगल-पेन सनरूफ यांसारख्या सुविधा जोडल्या जाऊ शकतात. सध्याच्या 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसोबत ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा आणि 6-स्पीकर ऑडिओ सिस्टम यांसारखी उपकरणे पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. इंजिनमध्ये मोठा बदल होणार का? सध्या उपलब्ध माहितीनुसार फेसलिफ्टमध्ये पॉवरट्रेनमध्ये मोठा बदल करण्याऐवजी विद्यमान इंजिन पर्याय कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे. नव्या बलेनोमध्ये 1.2-लिटर नैसर्गिकरित्या अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे इंजिन सुमारे 89.7 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क देते. त्यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचे पर्याय मिळू शकतात. ग्राहकांसाठी CNG व्हेरिएंटही पुढे सुरू राहण्याची शक्यता आहे. काही आधीच्या अहवालांमध्ये टर्बो-पेट्रोल किंवा हायब्रिड पॉवरट्रेनची शक्यता व्यक्त करण्यात आली होती; मात्र सध्याच्या ताज्या रिपोर्ट्समध्ये विद्यमान 1.2-लिटर पेट्रोल आणि CNG सेटअप कायम राहण्याकडे अधिक संकेत आहेत. त्यामुळे अंतिम इंजिन स्पेसिफिकेशनची अधिकृत घोषणा होईपर्यंत या बाबतीत निश्चित निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. किंमत किती असू शकते? सध्याच्या मारुती बलेनोची एक्स-शोरूम किंमत साधारण ₹5.99 लाखांपासून ₹9.17 लाखांपर्यंत आहे. फेसलिफ्टमध्ये डिझाइन आणि फीचर्स वाढल्यामुळे नवीन मॉडेलची किंमत सध्याच्या कारपेक्षा थोडी जास्त ठेवली जाऊ शकते. मात्र, कंपनीने अद्याप अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. त्यामुळे अंतिम किंमत आणि व्हेरिएंटनुसार फीचर्स लॉन्चच्या वेळीच स्पष्ट होतील. कोणाशी होणार थेट सामना? नवी बलेनो फेसलिफ्ट भारतीय प्रीमियम हॅचबॅक बाजारात ह्युंदाई i20, टाटा अल्ट्रोज आणि टोयोटा ग्लान्झा यांना टक्कर देईल. विशेषतः सनरूफ, अॅम्बियंट लायटिंग आणि इतर आधुनिक फीचर्सचा समावेश झाल्यास बलेनोला या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आणखी मजबूत करण्याचा कंपनीचा प्रयत्न असू शकतो. ग्राहकांसाठी काय महत्त्वाचे? बलेनोच्या नव्या फेसलिफ्टमध्ये पूर्णपणे नवीन जनरेशनपेक्षा डिझाइन आणि फीचर्सवर भर देण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे सध्याची बलेनो आवडणाऱ्या ग्राहकांना परिचित आकार आणि इंजिनसोबत अधिक आधुनिक लूक व काही अतिरिक्त सुविधा मिळू शकतात.

Maruti Baleno Facelift सप्टेंबरमध्ये येणार; लूकपासून फीचर्सपर्यंत काय बदलणार? Read More »

ai virus

AI Virus: AI ने तयार केले निसर्गात नसलेले व्हायरस; सुपरबगविरोधात मोठी आशा, पण जैवसुरक्षेचा गंभीर प्रश्न

AI Virus: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर आतापर्यंत माहिती-तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, संशोधन आणि कोडिंगसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत होता. मात्र आता AI ने थेट जीवशास्त्राच्या क्षेत्रातही एक महत्त्वाची झेप घेतली आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि Arc Institute मधील संशोधकांनी AI च्या मदतीने निसर्गात आढळत नसलेले नवीन विषाणू तयार करण्यात यश मिळवले आहे. ही कामगिरी वैद्यकीय संशोधनासाठी मोठी संधी मानली जात असली, तरी त्याच वेळी जैवसुरक्षेबाबत गंभीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत. नेमके काय तयार करण्यात आले? संशोधकांनी तयार केलेले हे विषाणू बॅक्टेरियोफेजेस (Bacteriophages) आहेत. साध्या भाषेत सांगायचे झाल्यास, हे असे विषाणू आहेत जे मानवी पेशींवर हल्ला करण्याऐवजी विशिष्ट बॅक्टेरियांना संक्रमित करून त्यांचा नाश करतात. या संशोधनातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे विषाणू निसर्गातून जसेच्या तसे घेतलेले नाहीत. AI मॉडेलच्या मदतीने त्यांच्या आनुवंशिक रचनेची म्हणजेच जीनोमची रचना करण्यात आली आणि त्यानंतर प्रयोगशाळेत त्यांची कार्यक्षमता तपासण्यात आली. उपलब्ध अहवालानुसार, तयार करण्यात आलेल्या काही AI-डिझाइन केलेल्या बॅक्टेरियोफेजेसनी प्रयोगशाळेत कार्यक्षम असल्याचे दाखवून दिले. AI ने हे कसे शक्य केले? या संशोधनामागे जीनोमिक AI मॉडेल्स वापरण्याची कल्पना आहे. ज्याप्रमाणे भाषेचे AI मॉडेल मोठ्या प्रमाणात मजकूराचा अभ्यास करून भाषेतील पॅटर्न ओळखते, त्याचप्रमाणे जीनोमवर प्रशिक्षण घेतलेली मॉडेल्स DNA मधील नमुने आणि रचना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. संशोधकांनी अशा मॉडेलच्या मदतीने उपलब्ध जैविक माहितीवरून नवीन जीनोमिक रचना तयार केल्या. त्यातील काही रचना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत तपासण्यात आल्या आणि काही विषाणू बॅक्टेरियांवर परिणामकारक ठरले. अहवालांनुसार या संशोधनात E. coli या बॅक्टेरियाला लक्ष्य करणाऱ्या बॅक्टेरियोफेजेसवर विशेष लक्ष देण्यात आले. अँटिबायोटिक रेझिस्टन्सविरुद्ध मोठी आशा या संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे संभाव्य फायदे अँटिबायोटिक रेझिस्टन्सशी संबंधित आहेत. जगभरात अनेक बॅक्टेरिया उपलब्ध अँटिबायोटिक्सना प्रतिसाद देत नाहीत. अशा बॅक्टेरियांना अनेकदा ‘सुपरबग’ असे म्हटले जाते. एखाद्या गंभीर संसर्गावर नेहमीची औषधे काम करत नसतील तर उपचार करणे मोठे आव्हान ठरते. याठिकाणी बॅक्टेरियोफेजेस महत्त्वाचे ठरू शकतात. ते विशिष्ट बॅक्टेरियांना लक्ष्य करू शकतात. त्यामुळे भविष्यात एखाद्या रुग्णाच्या संसर्गाला कारणीभूत असलेल्या विशिष्ट बॅक्टेरियासाठी त्याला लक्ष्य करणारा फेज तयार करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. AI मुळे अशा नवीन फेजेसची रचना अधिक वेगाने करण्याची क्षमता वाढू शकते. त्यामुळे भविष्यात औषधांना दाद न देणाऱ्या संसर्गांसाठी पर्यायी उपचार विकसित करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. पण हे व्हायरस माणसांसाठी धोकादायक आहेत का? सध्या समोर आलेल्या संशोधनानुसार हे AI-डिझाइन केलेले बॅक्टेरियोफेजेस मानवी शरीराला संक्रमित करण्यासाठी तयार केलेले नाहीत. त्यांचा उद्देश बॅक्टेरियांना लक्ष्य करणे हा आहे. म्हणून ‘AI ने माणसांना संक्रमित करणारा व्हायरस तयार केला’ असा अर्थ या संशोधनातून काढणे चुकीचे ठरेल. प्रत्यक्षात हा प्रयोग बॅक्टेरियांना संक्रमित करणाऱ्या विषाणूंवर केंद्रित आहे. मग जगाची चिंता नेमकी कशामुळे? चिंतेचा मुद्दा सध्याच्या तयार झालेल्या विषाणूंपेक्षा AI ची वाढती जैविक क्षमता हा आहे. आज AI च्या मदतीने संपूर्ण विषाणूच्या जीनोमची रचना करण्याची क्षमता प्रयोगशाळेत प्रत्यक्ष दाखवून देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात याच प्रकारच्या तंत्रज्ञानाचा चुकीच्या उद्देशासाठी वापर होऊ शकतो का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. जैवसुरक्षा तज्ज्ञांची मुख्य चिंता अशी आहे की AI आणि आधुनिक जैवतंत्रज्ञान यांचा संगम भविष्यात अत्यंत शक्तिशाली ठरू शकतो. जर अशा तंत्रज्ञानाचा गैरवापर झाला, तर मानवी आरोग्यासाठी धोकादायक जैविक घटक तयार करण्याची क्षमता काही प्रमाणात वाढू शकते. मात्र सध्याच्या प्रयोगातील विषाणू मानवांसाठी धोकादायक असल्याचे यावरून सिद्ध होत नाही. वैद्यकीय क्रांती की जैवसुरक्षेचा इशारा? या संशोधनाकडे दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. एका बाजूला, अँटिबायोटिक्स निष्प्रभ ठरत असलेल्या काळात AI च्या मदतीने नवीन बॅक्टेरियोफेजेस तयार करता येणे ही वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी संधी आहे. भविष्यात विशिष्ट बॅक्टेरियल संसर्गांसाठी अधिक लक्ष्यित उपचार विकसित होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला, एकदा AI ला जैविक रचनांमधील गुंतागुंत समजून नवीन रचना तयार करण्याची क्षमता मिळाली की त्याच्या वापरावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरते. त्यामुळे संशोधनासोबतच बायोसेफ्टी, बायोसिक्युरिटी, प्रयोगशाळेतील नियंत्रण आणि AI मॉडेल्सच्या वापराबाबत योग्य नियम तयार करण्याची गरज वाढली आहे. पुढे काय? या तंत्रज्ञानाचा रुग्णांवरील प्रत्यक्ष उपचारांसाठी वापर होण्यासाठी अजून बराच संशोधनाचा टप्पा बाकी आहे. प्रयोगशाळेत एखादा फेज बॅक्टेरिया नष्ट करतो, याचा अर्थ तो लगेच माणसांमध्ये औषध म्हणून वापरता येईल असा होत नाही. त्यासाठी त्याची सुरक्षितता, परिणामकारकता, शरीरातील वर्तन, संभाव्य दुष्परिणाम आणि इतर अनेक बाबींची कठोर तपासणी आवश्यक असेल. त्यामुळे सध्याच्या टप्प्यावर या संशोधनाकडे ‘AI ने व्हायरस तयार करून उपचार सुरू केले’ अशा स्वरूपात न पाहता, AI च्या मदतीने कार्यक्षम बॅक्टेरियोफेज तयार करण्याची वैज्ञानिक क्षमता सिद्ध झाली आहे असे पाहणे अधिक अचूक ठरेल. AI + जीवशास्त्र = मोठी वैज्ञानिक संधी, पण मोठी जबाबदारीही अँटिबायोटिक रेझिस्टन्समुळे निर्माण झालेल्या सुपरबगच्या समस्येवर AI-डिझाइन केलेले बॅक्टेरियोफेज भविष्यात उपयोगी ठरू शकतात. मात्र त्याच तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ नये यासाठी जैवसुरक्षा आणि नियमनाला तितकेच महत्त्व द्यावे लागणार आहे. हीच या संशोधनाची सर्वात मोठी शिकवण आहे.

AI Virus: AI ने तयार केले निसर्गात नसलेले व्हायरस; सुपरबगविरोधात मोठी आशा, पण जैवसुरक्षेचा गंभीर प्रश्न Read More »

manoj jarange on eknath shinde

Manoj Jarange on Eknath Shinde : गद्दारीचा डाग पुसणार आम्ही, आता सीट पडणार; जरांगे पाटलांचा एकनाथ शिंदेंना इशारा

Manoj Jarange on Eknath Shinde : मराठवाड्यातील काही मराठा महिला लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने त्यांना साथ दिली होती, परंतु आता समाजाचा विश्वासघात झाल्याची भावना आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही आरक्षणाच्या प्रश्नावर राजकारण केल्याचा आरोप केला. यावेळी जरांगे म्हणाले की, एकनाथ शिंदे तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो. सत्तेत गेलात म्हणून आमच्यावर माज उतरवणार का? शिंदे साहेब, तुम्ही डबल गेम खेळत आहात का? एकीकडून ओबीसी सांभाळत आहात का? परळीच्या टोळीवाल्याच्या नादी लागून तुमच्या ऑफिसला कसे येतात? मराठ्यांचा विरोध करणारे ओबीसी नेते तुमच्या बाळासाहेब भवनमध्ये येतात कसे? मराठ्यांचे काही समन्वयक तुम्ही माझ्या अंगावर घालत आहात. एकीकडे मी पण लागतो. तुमचाच एक नेता ज्याचे संभाजीनगरला कॉलेज आहे. तिथे माझ्या विरोधात बैठका होतात. मैत्री करावी तर ठासून करावी. तुमचा गद्दारीचा डाग पुसायला आम्ही मराठे आहोत. आमच्यावर उद्धव ठाकरे बरे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. आम्ही तुमचे सीट पडणार असा इशारा मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

Manoj Jarange on Eknath Shinde : गद्दारीचा डाग पुसणार आम्ही, आता सीट पडणार; जरांगे पाटलांचा एकनाथ शिंदेंना इशारा Read More »

Money

Income Sources : फक्त पगारावर अवलंबून राहू नका! ‘या’ चार मार्गांनी तयार करा अतिरिक्त उत्पन्न

Income Sources : देशात वाढती महागाई, बदलती आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील आर्थिक गरजा लक्षात घेता केवळ मासिक पगारावर अवलंबून राहणे आता अनेकांना पुरेसे ठरत नाही. नोकरी असली तरी अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण केल्यास आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते. यामुळे आकस्मिक खर्च भागवणे, बचत वाढवणे आणि भविष्यासाठी भक्कम आर्थिक नियोजन करणे सोपे होते. आर्थिक तज्ज्ञही उत्पन्नाचे एकापेक्षा अधिक स्रोत असावेत, असा सल्ला देतात. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय मानला जातो. नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास कालांतराने चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, गुंतवणुकीपूर्वी जोखीम समजून घेणे आणि आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार निर्णय घेणे आवश्यक आहे. भाडे उत्पन्नाचा पर्याय घर, फ्लॅट, दुकान किंवा इतर मालमत्ता असल्यास ती भाड्याने देऊन दरमहा नियमित उत्पन्न मिळवता येते. मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन केल्यास हा उत्पन्नाचा स्थिर आणि विश्वासार्ह स्रोत ठरू शकतो. फ्रीलान्सिंग आणि ऑनलाइन काम डिजिटल युगात नोकरीसोबतच अतिरिक्त कमाई करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. लेखन, ग्राफिक डिझाइन, व्हिडिओ एडिटिंग, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, ऑनलाइन क्लास, कंटेंट क्रिएशन किंवा सोशल मीडिया व्यवस्थापन यांसारख्या कौशल्यांच्या माध्यमातून घरी बसूनही उत्पन्न मिळवता येते. आपल्या वेळेनुसार हे काम करता येत असल्याने अनेक जण हा पर्याय स्वीकारत आहेत. लहान व्यवसाय सुरू करा घरगुती उद्योग, ऑनलाइन व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्री, हस्तकला, कपड्यांचा व्यवसाय किंवा इतर छोट्या उद्योगातूनही अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते. सुरुवातीला कमी भांडवलात व्यवसाय सुरू करून अनुभव आणि ग्राहकसंख्या वाढल्यानंतर त्याचा विस्तार करता येतो. आर्थिक सुरक्षिततेसाठी ठरू शकते फायदेशीर एका उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहिल्यास नोकरी गमावणे किंवा उत्पन्न कमी होणे यासारख्या परिस्थितीत आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र, उत्पन्नाचे अनेक स्रोत असल्यास अशा संकटांचा परिणाम कमी होतो. अतिरिक्त कमाईमुळे बचत वाढवणे, गुंतवणूक करणे आणि निवृत्तीनंतरची आर्थिक तयारी करणेही सोपे होते. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकाने आपल्या कौशल्यांचा, वेळेचा आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून उत्पन्नाचे पर्यायी स्रोत तयार करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे आर्थिक स्वावलंबन वाढते आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे अधिक सहजपणे पूर्ण करता येतात.

Income Sources : फक्त पगारावर अवलंबून राहू नका! ‘या’ चार मार्गांनी तयार करा अतिरिक्त उत्पन्न Read More »

income tax

Income Tax : टॅक्स लागत नसला तरी ITR भरा; फायदे जाणून व्हाल थक्क

Income Tax : अनेक करदात्यांना असे वाटते की, उत्पन्नावर कोणताही आयकर लागत नसेल तर आयकर विवरणपत्र (Income Tax Return-ITR) दाखल करण्याची गरज नाही. मात्र, आर्थिक नियोजन आणि भविष्यातील विविध व्यवहारांच्या दृष्टीने ITR दाखल करणे फायदेशीर ठरू शकते. कर देय नसतानाही नियमितपणे ITR भरल्यास अनेक महत्त्वाचे लाभ मिळू शकतात. ITR हा व्यक्तीच्या उत्पन्नाचा अधिकृत दस्तऐवज मानला जातो. गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना बहुतांश बँका मागील दोन ते तीन वर्षांचे ITR मागतात. नियमित ITR दाखल केल्यास कर्ज मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते. परदेशात शिक्षण, नोकरी किंवा पर्यटनासाठी व्हिसा अर्ज करताना अनेक देश अर्जदाराकडून आर्थिक स्थैर्याचा पुरावा म्हणून ITR ची प्रत मागतात. त्यामुळे वेळेवर ITR दाखल करणाऱ्या व्यक्तींना व्हिसा प्रक्रियेतही फायदा होतो. अनेक कर्मचाऱ्यांच्या किंवा गुंतवणूकदारांच्या उत्पन्नातून स्रोतावर कर (TDS) कापला जातो. प्रत्यक्षात कर देय नसल्यास किंवा कमी कर लागू होत असल्यास ITR भरल्यानंतरच अतिरिक्त कापलेला कर परतावा (Refund) म्हणून मिळू शकतो. त्यामुळे रिफंड मिळवण्यासाठी ITR दाखल करणे आवश्यक असते. याशिवाय, आर्थिक व्यवहारांमध्ये विश्वासार्हता वाढवण्यासाठीही ITR उपयुक्त ठरतो. व्यवसाय सुरू करणे, मोठी आर्थिक गुंतवणूक करणे किंवा काही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही ITR महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून वापरला जातो. तज्ज्ञांच्या मते, जरी कर भरण्याची जबाबदारी नसली तरी पात्रता असल्यास दरवर्षी ITR दाखल करणे ही चांगली आर्थिक सवय आहे. त्यामुळे भविष्यातील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होतात आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास अडचण येत नाही. म्हणूनच, कर देय नसला तरी ITR दाखल करण्याचा विचार करणे प्रत्येक करदात्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Income Tax : टॅक्स लागत नसला तरी ITR भरा; फायदे जाणून व्हाल थक्क Read More »

narendracharya maharaj

Ram Mandir Theft : राम मंदिर चोरीप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांची मोठी मागणी; मंदिरे आचार्यांच्या ताब्यात द्यावीत

Ram Mandir Theft : राम मंदिरातील चोरीच्या घटनेवर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी हिंदूंची मंदिरे शासनाऐवजी अधिकृत शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य आदी आचार्यांच्या समितीच्या ताब्यात देण्याची मागणी केली. नरेंद्राचार्य महाराज म्हणाले की, मंदिरांचे व्यवस्थापन आणि धार्मिक परंपरा जपण्याचे आवश्यक प्रशिक्षण शासनाकडे नाही. त्यामुळे मंदिरांचे संचालन आचार्यांच्या समितीकडे दिल्यास धार्मिक परंपरा आणि मंदिरांची पवित्रता अधिक प्रभावीपणे जपली जाईल. राम मंदिर चोरीप्रकरणी सरकारने तत्पर कारवाई करत आरोपींना अटक केली असली, तरी या घटनेमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्याची भरपाई होऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना नरेंद्राचार्य महाराज यांनी सरकारने उचललेले पाऊल योग्य असल्याचे सांगितले. मात्र, केवळ राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. भविष्यात पेपरफुटीसारख्या घटना रोखण्यासाठी कठोर आणि प्रभावी कायदा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ram Mandir Theft : राम मंदिर चोरीप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांची मोठी मागणी; मंदिरे आचार्यांच्या ताब्यात द्यावीत Read More »

shrirampur crime

Shrirampur Crime: धर्माच्या नावावर गुन्हेगारीचे संरक्षण?

Shrirampur Crime : समाजात एखादी व्यक्ती धार्मिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून लोकप्रिय होत असते. परंतु त्याच व्यक्तीचे नाव वारंवार गंभीर गुन्ह्यांच्या तपासात, आरोपपत्रात किंवा पोलीस कारवाईत समोर येऊ लागले, की समाजाने आणि यंत्रणांनी स्वतःला काही कठोर प्रश्न विचारण्याची वेळ येते. प्रश्न एका व्यक्तीचा नसतो; प्रश्न असतो न्यायव्यवस्थेवरचा विश्वास, कायद्याची अंमलबजावणी आणि समाजाच्या नैतिक भूमिकेचा. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये धर्म, जात किंवा संघटनांच्या नावाने काही व्यक्तींना ‘रक्षक’ म्हणून उभे केले जाते. सोशल मीडियावरील प्रचार, मिरवणुका, वाढदिवसाचे बॅनर आणि समर्थकांच्या घोषणांमधून त्यांची प्रतिमा तयार केली जाते. परंतु जर अशाच व्यक्तींचे नाव वारंवार खून, खंडणी, मारहाण, दरोडे, मोक्का किंवा इतर गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणांत समोर येत असेल, तर समाजाने त्या प्रतिमेकडे चिकित्सक नजरेने पाहिले पाहिजे. कायद्याच्या दृष्टीने प्रत्येक आरोपी निर्दोष मानला जातो, जोपर्यंत न्यायालय दोष सिद्ध करत नाही. ही लोकशाहीची मूलभूत अट आहे. पण याचा अर्थ असा नाही की गंभीर आरोपांकडे समाजाने डोळेझाक करावी. एखाद्या व्यक्तीवर सातत्याने गुन्हे दाखल होत असतील, ती वारंवार अटक होत असेल किंवा संघटित गुन्हेगारीशी तिचे नाव जोडले जात असेल, तर त्या पार्श्वभूमीवर पोलीस, तपास यंत्रणा आणि सरकारी पक्षाची कार्यक्षमता तपासणे आवश्यक ठरते. अशा घटनांमध्ये आणखी एक धोकादायक प्रवृत्ती दिसते. गुन्हेगारीला धार्मिक किंवा सामाजिक ओळखीचे कवच मिळू लागते. समर्थकांचा एक वर्ग व्यक्तीच्या कथित सामाजिक कामांचा उल्लेख करून गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष करतो. परिणामी, चर्चा व्यक्तीच्या कृत्यांवर न होता धर्म किंवा विचारसरणीच्या समर्थन-विरोधात वळते. हीच समाजासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. गुन्हेगाराला धर्म नसतो त्याचा धर्म फक्त गुन्हा असतो. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी व्यक्तीच्या धर्म, जात, राजकीय संबंध किंवा लोकप्रियतेकडे न पाहता समान निकषांवर झाली पाहिजे. अन्यथा कायद्यावरील विश्वास कमी होतो आणि सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते. आज गरज आहे ती व्यक्तिपूजेपेक्षा संस्थांवर विश्वास ठेवण्याची. पोलीस तपास निष्पक्ष असावा, सरकारी पक्षाने खटले प्रभावीपणे चालवावेत, साक्षीदारांचे संरक्षण व्हावे आणि न्यायालयीन प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी. तितकेच महत्त्वाचे म्हणजे समाजानेही कोणत्याही व्यक्तीचे समर्थन करताना तिच्या सार्वजनिक प्रतिमेबरोबर तिच्या सार्वजनिक उत्तरदायित्वाचाही विचार केला पाहिजे. प्रत्येक मोठ्या गुन्ह्यानंतर आरोपींची नावे चर्चेत येतात; परंतु त्याहून मोठा प्रश्न कायम राहतो गुन्हेगारी इतकी वाढूच कशी दिली जाते? प्रतिबंधात्मक पोलिसिंग, प्रभावी तपास, जलद न्याय आणि सामाजिक जबाबदारी या चारही गोष्टी एकत्र आल्या तरच अशा घटनांवर दीर्घकालीन नियंत्रण मिळवता येईल. लोकशाहीत कोणत्याही व्यक्तीला कायद्यापेक्षा मोठे स्थान नसते. धर्म, समाजकार्य किंवा लोकप्रियता ही न्यायप्रक्रियेची पर्यायी व्यवस्था होऊ शकत नाही. शेवटी टिकतो तो केवळ कायद्याचा अधिकार आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास.

Shrirampur Crime: धर्माच्या नावावर गुन्हेगारीचे संरक्षण? Read More »