DNA मराठी

DNA Marathi News

img 20260508 wa0011

Ahilyanagar News: नगर बायपास : रस्त्यावरचा दहशतीचा कारभार कोणाच्या आशीर्वादाने?

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहराच्या बाह्य वळण महामार्गावर सध्या वाहतुकीपेक्षा दहशतीचीच अधिक चर्चा आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या तसेच शहराबाहेर जाणाऱ्या वाहनचालकांना ‘बायपासनेच जा’ असा दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी चालकांना अडवून मारहाण, दमदाटी आणि पैशांची उकळपट्टी होत असल्याचे आरोप समोर येत आहेत. सार्वजनिक रस्ता हा प्रवासासाठी असतो, दहशतीसाठी नव्हे पण नगर बायपासवर सध्या जणू काही लुटारूंचेच राज्य सुरू असल्याचे चित्र दिसते. महानगरपालिकेजवळील काही भागांमध्ये विशेषतः ट्रक चालक, मालवाहतूक करणारे वाहनचालक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांवर दबाव टाकला जात असल्याचे सांगितले जाते. “शहरात जायचे असेल तरही बायपासनेच जा” अशी सक्ती केली जाते, अन्यथा शिवीगाळ, मारहाण किंवा वाहन अडवण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. हा प्रकार केवळ गुंडगिरी नाही, तर कायद्याला थेट आव्हान आहे. प्रश्न असा की, हा हट्ट नेमका कोणाचा? बायपासवरूनच वाहतूक वळवण्यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध दडले आहेत? टोल, वसुली, स्थानिक दबावगट की इतर कोणती अदृश्य साखळी? प्रशासनाकडे या प्रश्नांची उत्तरे असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात पोलिस, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकताना दिसते. वाहनचालकांनी अनेकदा तक्रारी केल्या, पण कारवाई मात्र अपुरीच राहिली. काही वेळा तात्पुरती मोहीम राबवली जाते, काही जणांवर कारवाई होते, आणि काही दिवसांनी पुन्हा तेच प्रकार सुरू होतात. म्हणजेच समस्या केवळ व्यक्तींची नसून व्यवस्थेतील शिथिलतेची आहे. बायपास हा वाहतूक सुरळीत करण्यासाठी असतो, भीती निर्माण करण्यासाठी नाही. जर वाहनचालकांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मार्ग निवडताना भीती वाटत असेल, तर तो केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न राहत नाही, तर तो प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरचा प्रश्न ठरतो. नगर बायपासवरील लूट आणि मारहाणीच्या तक्रारींकडे केवळ “घटना” म्हणून पाहून चालणार नाही. या मागे असलेली साखळी उघड करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि वाहनचालकांना सुरक्षिततेची हमी देणे ही शासनाची जबाबदारी आहे. अन्यथा, रस्ते विकासाचे प्रतीक न राहता भीतीचे प्रतीक बनतील आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका ठरेल.

Ahilyanagar News: नगर बायपास : रस्त्यावरचा दहशतीचा कारभार कोणाच्या आशीर्वादाने? Read More »

img 20260508 wa0009

Madhya Pradesh Jailer : जन्मठेपेच्या कैद्यावर जेलरलाच प्रेम; तुरुंगात जुळलं नातं, समाजाच्या विरोधात जाऊन केलं लग्न

Madhya Pradesh Jailer : तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी आलेला एक कैदी आणि त्याच्यावर प्रेम करणारी त्याच तुरुंगातील उपजेलर ऐकायला चित्रपटातील कथानक वाटावं, पण ही घटना मध्यप्रदेशातील सतना केंद्रीय कारागृहातील असल्याचं सांगितलं जात आहे. कायद्याची अंमलबजावणी करणारी अधिकारी आणि जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी यांच्यात निर्माण झालेलं नातं अखेर विवाहबंधनात अडकलं. फिरोजा खातून या सतना केंद्रीय कारागृहात उपजेलर म्हणून कार्यरत होत्या. शिस्त, कर्तव्य आणि कायद्याचं काटेकोर पालन ही त्यांची ओळख. याच कारागृहात धर्मेंद्र सिंह हा कैदी शिक्षा भोगत होता. 2007 मध्ये नगरपरिषद उपाध्यक्षाच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कारागृहातील वॉरंट शाखेची जबाबदारी फिरोजा खातून यांच्याकडे होती. धर्मेंद्र कागदपत्रांच्या कामात मदत करत असल्याने दोघांचा संपर्क वाढला. कामापुरतं सुरू झालेलं बोलणं हळूहळू मैत्रीत बदललं आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. 2022 मध्ये धर्मेंद्रच्या वर्तणुकीत सुधारणा झाल्याचं लक्षात घेऊन त्याची वेळेपूर्वी सुटका करण्यात आली. 14 वर्षांचा तुरुंगवास संपल्यानंतर तो बाहेर आला, मात्र फिरोजासोबतचं नातं अधिक दृढ झालं. अखेर दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. या लग्नासमोर अनेक अडथळे होते. धर्म वेगळा, सामाजिक पार्श्वभूमी वेगळी आणि सर्वात मोठा अडथळा म्हणजे समाजाचा विरोध. मुस्लिम महिला अधिकारी आणि हिंदू माजी कैदी यांचा विवाह कुटुंबीयांना मान्य नव्हता. फिरोजा यांच्या घरच्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. मात्र, दोघांनीही समाजाच्या दबावापेक्षा आपल्या नात्याला प्राधान्य दिलं. 5 मे रोजी छतरपूर येथे हिंदू रीतीरिवाजांनुसार हा विवाह पार पडला. विशेष म्हणजे, फिरोजा यांच्या कुटुंबीयांनी साथ न दिल्याने बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी पुढे येत कन्यादानाची जबाबदारी स्वीकारल्याची चर्चा आहे. वैदिक मंत्रोच्चारात, अग्नीला साक्षी ठेवून उपजेलर फिरोजा खातून यांनी धर्मेंद्र सिंहसोबत सात फेरे घेतले. कायद्याच्या रक्षकाने जन्मठेपेच्या कैद्याला जीवनसाथी म्हणून स्वीकारल्याने ही प्रेमकहाणी चर्चेचा विषय ठरली आहे. प्रेम खरंच आंधळं असतं का, की माणसातील बदल ओळखण्याची ताकद त्यात असते? एका माजी गुन्हेगाराला समाजाने आणि कायद्याच्या रक्षकाने अशी दुसरी संधी देणं योग्य आहे का, यावर आता विविध स्तरांत चर्चा सुरू झाली आहे.

Madhya Pradesh Jailer : जन्मठेपेच्या कैद्यावर जेलरलाच प्रेम; तुरुंगात जुळलं नातं, समाजाच्या विरोधात जाऊन केलं लग्न Read More »

pravin tarde

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार”

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची संतप्त प्रतिक्रिया दिली असून येणाऱ्या अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, येणाऱ्या काळात अशा नराधमांना चेचण्यासाठी सिनेमा काढणार. मी एक फिल्ममेकर आहे. याबद्दल मी माझी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून मोठा गदारोळ उठला. मी शेवटी माणूसच आहे. महाराष्ट्रातील मुलींच्या वडिलांना विचारा, ती बातमी पाहिल्यानंतर काय झाले असेल. येणाऱ्या काळात मी ‘देऊळ बंद’ या सिनेमाचे 11 भाग करणार आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद’च्या पुढील एखाद्या भागात अशा नराधमांना चेचण्यासाठी स्वतः स्वामींनाच यावे लागेल. माझ्या सिनेमात कायदा-बियदा असं काही नसेल. कारण जेव्हा स्वामी शिक्षा द्यायला उतरतात, तेव्हा त्यांची शिक्षा भयानक असते. स्वामींनी तो प्रकार पाहिला असेल. त्यामुळे त्या नराधमांना असा मृत्यू येईल की पुन्हा कोणी असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. जे सध्या चाललंय, ते अतिशय भयावह आहे. यानिमित्ताने मुलींच्या आई-वडिलांना आशेचा किरण देण्यासाठी असा चित्रपट बनवेन, ज्यात अशा नराधमांना असे मृत्यू दाखवले जातील की ते पाहून कोणीही असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. ज्याप्रकारे ‘मुळशी पॅटर्न’नंतर शेतकऱ्यांच्या जमिनी धाकदपटशाहीने घेणं बंद झालं, त्याचप्रमाणे ‘मुळशी पॅटर्न’ने शेतकऱ्यांना खडबडून जाग केलं. आता अशा नराधमांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. या विषयाला वाचा फोडण्याचा मी प्रयत्न करेन. ‘देऊळ बंद 2’च्या टीझर प्रदर्शन सोहळ्यात, वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट येथे प्रवीण तरडे यांनी ही भावना व्यक्त केली.

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार” Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंकेची तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला रवाना

Nilesh Lanke: अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर येत असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. खासदार निलेश लंके यांची गेल्या दोन-चार दिवसांपासून प्रकृती ही अस्वस्थ होती त्यांच्यावरती नगरमध्येच उपचार सुरू होते मात्र आज त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने पुण्याकडे स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे खासदार निलेश लंके यांची प्रकृती बाबतची माहिती समजतात लंके समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अनेक कार्यकर्ते त्यांची प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पुण्याकडे रवाना होत असल्याचे देखील समजते आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनी खासदार निलेश लंके हे तामिळनाडू येथील जिंजी किल्ला येथे गेले होते. आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून शिवरायांचे गड किल्ले यांचे संवर्धन करण्याची मोहीम खासदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. यावेळी स्वतः लंके हे गडकिल्ल्यांची स्वच्छता करतात तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांच्या प्रकृती खालवली असल्याचा देखील त्यांचे समर्थक सांगतात.

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंकेची तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला रवाना Read More »

raam shinde

Ram Shinde: कर्जत – जामखेड तालुक्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात – सभापती प्रा. राम शिंदे

Ram Shinde : कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण वारे व प्रदीप कटकधोंड यांच्यासह कर्जत – जामखेड येथील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रा. शिंदे म्हणाले की, कर्जत-जामखेड परिसरात वारंवार वीज खंडित होणे, अनियमित लोडशेडिंग तसेच तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा थेट परिणाम शेतकरी, लघुउद्योजक, व्यापारी तसेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून, वीज पुरवठा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे. विशेषतः सायंकाळी ६ ते १० या कालावधीत वीज पुरवठा अखंडित राहावा, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, जुन्या वीजवाहिन्यांचे नूतनीकरण करणे तसेच तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक कार्यक्षम करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करून सेवा अधिक पारदर्शक व परिणामकारक करावी, असेही त्यांनी नमूद केले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढत असल्याने संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून नियोजनबद्ध काम करावे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करावी, असे निर्देशही प्रा. शिंदे यांनी दिले.

Ram Shinde: कर्जत – जामखेड तालुक्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात – सभापती प्रा. राम शिंदे Read More »

aamras

Ahilyanagar News: जावई धोंडा अन् आमरसाची मेजवानी; भैरवनाथ देवस्थानाचा उपक्रम

Ahilyanagar News : नगर तालुक्यातील आगडगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानच्या वतीने अधिकमासानिमित्त जावयांसाठी धोंडा जेवण उपक्रम राबविण्यात येणार आहे. रविवारी (ता. १७) दुपारी १२ वाजता महाआरतीनंतर उपक्रमास सुरुवात होईल, असे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. अधिक मासानिमित्त अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. जावयाला धोंडा जेवण देण्याची परंपरा आहे. देवस्थानाच्या वतीने अनेक वर्षांपासून असा उपक्रम राबविण्यात येतो. आगडगाव व पंचक्रोशीतील रतडगाव, देवगाव, खांडके, कापूरवाडी, बुऱ्हाणनगर, कोल्हार, डमाळवाडी अशा गावांबरोबरच नगर शहर व राज्यभरातून भाविक या अन्नदानासाठी नावनोंदणी करतात. नोंदणी झाल्यानंतर लगेचच संबंधित लेक व जावयाला पाचीपोषाख दिला जातो. त्यामध्ये पैठणी, तांब्याचे ताट, निरंजन, अनारसे, बत्ताशे, जावयाला कुर्ता-पायजमा, टोपी, पंचा आदींचा समावेश आहे. देवस्थानाजवळ येऊन नाव नोंदणी करून लगेचच पाचीपोषाख ताब्यात दिला जातो. या उपक्रमानिमित्त भाविकांना नगरहून येण्यासाठी एसटीच्या जादा बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच देवस्थानची बसही सेवेत असेल. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सावलीची व्यवस्था, स्वच्छ पाणी, प्रशस्त पार्किंग असे नियोजन करण्यात आले असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. साडेतीन हजार किलो आंबे धोंडा, रस या उपक्रमासाठी साडेतीन हजार किलो आंबे खरेदी करण्यात येणार आहेत. पुरण-पोळी, धोंडा यासाठी एक हजार किलो डाळीचे नियोजन आहे. शंभर अन्नदात्यांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. प्रथम नावनोंदणी करणारास प्राधान्य दिले जाणार आहे. मागील तीन वर्षांपूर्वी राबविलेल्या या उपक्रमात सुमारे २० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता. या वर्षीही मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

Ahilyanagar News: जावई धोंडा अन् आमरसाची मेजवानी; भैरवनाथ देवस्थानाचा उपक्रम Read More »

BJP

Maharashtra BJP: भाजपची मोर्चेबांधणी; 2029 विधानसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय

Maharashtra BJP :  आगामी काळातील राजकीय आव्हाने आणि पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण यांनी राज्याच्या सहा महत्त्वाच्या विभागांसाठी नवीन समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाचे ध्येयधोरण तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि विभागवार कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही या नियुक्त्यांमागची मुख्य भूमिका आहे. या नव्या निवडीनुसार, मुंबई विभागाच्या समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते मुंबई भाजप समन्वयक म्हणून काम पाहतीलच, शिवाय त्यांच्याकडे प्रदेश कार्यालयाच्या समन्वयाचीही अतिरिक्त जबाबदारी असेल. ठाणे-कोकण विभागासाठी आमदार योगेश सागर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार प्रमोद जठार संयोजक म्हणून, तर संजय वाघुले सहसंयोजक म्हणून कार्यभार सांभाळतील.पश्चिम महाराष्ट्रात आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे समन्वयाची धुरा देण्यात आली आहे. त्यांना विक्रम पावसकर (संयोजक) आणि विक्रम देशमुख (सहसंयोजक) यांची साथ लाभणार आहे. उत्तर महाराष्ट्राच्या जबाबदारीत प्रदेश सरचिटणीस आमदार माधवी नाईक समन्वयक असतील. त्यांच्या सोबतीला विजय चौधरी संयोजक म्हणून आणि आमदार मंगेश चव्हाण सहसंयोजक म्हणून काम पाहतील. मराठवाडा विभागासाठी प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांची समन्वयक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या पथकात अ‍ॅड. नितीन काळे संयोजक, तर राहुल लोणीकर सहसंयोजक म्हणून कार्यरत राहतील. विदर्भासाठी आमदार संजय कुटे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, प्रा. दिनेश सूर्यवंशी संयोजक आणि आमदार प्रवीण दटके सहसंयोजक म्हणून जबाबदारी पार पाडतील. या सर्व नियुक्त्या 5 मे 2026 पासून तात्काळ लागू करण्यात आल्या आहेत. या फेरबदलांमुळे आगामी काळात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्यास आणि कार्यकर्त्यांचे जाळे अधिक घट्ट होण्यास मदत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Maharashtra BJP: भाजपची मोर्चेबांधणी; 2029 विधानसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय Read More »

img 20260506 wa0003

NCMC Card:  एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार

NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात 3000 हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार, काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. महामंडळाच्या सूचनेनुसार, लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान NCMC कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच सवलतींचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे. तसेच, NCMC कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली आहे. सर्व आगार व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

NCMC Card:  एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार Read More »

aditi tatkare

Aditi Tatkare : बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देऊ नका; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Aditi Tatkare : बलात्कार व लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर सोडण्यात येवू नये, अशी तरतूद प्रचलित कायद्यात करण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मंत्रिमंडळ बैठकीत केली. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना यासंदर्भात आवश्यक कायदेशीर तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेले आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे.ही बाब अत्यंत गंभीर असून या पार्श्वभूमीवर, अशा गुन्ह्यांतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देण्यात येवू नये, अशी कायद्यात तरतूद करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून समाजात सकारात्मक संदेश जाऊन व्यवस्थेबाबत विश्वास निर्माण होईल.महिलांच्या सुरक्षेबाबत कडक धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Aditi Tatkare : बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देऊ नका; मंत्री आदिती तटकरेंची मागणी Read More »

Accident Photo

Ahilyanagar Accident: मुरबाडमध्ये बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात; अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे ठार

Ahilyanagar Accident : काही कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी (ता. ५) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैशाखरे फाट्याजवळ राज्य परिवहन मंडळाची बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील हे कुटुंब मुंबईच्या दिशेने जात असताना वैशाखरे फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एसेटी बसशी त्यांच्या वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात अविनाश रामचंद्र काकडे, अभिषेक भाऊसाहेब मोटे (दोघे रा. वडाळा, ता. नेवासा), निता अशोक धुरे आणि मीना कल्याण मडके (दोघी रा. भेंडा, ता. नेवासा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोनिका अभिषेक मोटे, आराध्या अभिषेक मोटे, वेदांश अभिषेक मोटे आणि मनीषा रामदास बहक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार अभिजित देशमुख यांनी दिली. ‘कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र बेशिस्त आणि बेदरकार वाहन चालकांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. गेल्याच महिन्यात १३ एप्रिल रोजी रायते पुलावर झालेल्या अपघातात ११ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेला महिना उलटत नाही तोच आज पुन्हा चौघांचा बळी गेल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा अपघात कशामुळे झाला, नेमकी चूक कुणाची हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Ahilyanagar Accident: मुरबाडमध्ये बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात; अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे ठार Read More »