DNA मराठी

Ajit Pawar

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवारांची सांत्वनपर भेट

India Pakistan War: नांदेड मधील देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद सचिन यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार जितेश अंतापूरकर, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे आदिंची यावेळी उपस्थिती होती. भारतीय लष्करातील जवान सचिन यांचा मृत्यू ही अतिशय दुःखद घटना आहे. सचिन यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर दिले जाईल. त्यांच्या पत्नी वा भावाला नोकरी दिली जाईल. त्यांच्या मुलीच्या शिक्षण व उज्वल भविष्यासाठी शासनाच्यावतीने तरतूद करण्यात येईल. त्यांच्या पेन्शनची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतः तहसीलदारांनी लक्ष द्यावे, अशी यावेळी सूचना करून अजित पवार यांनी करतानाच शहीद सचिन वनंजे यांना शहिदाचा दर्जा मिळावा यासाठी देखील शासन प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले.

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवारांची सांत्वनपर भेट Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Punyashlok Ahilyadevi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते. सूतगिरणीमुळे परिसरात रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून नवीन रस्त्यामुळे दळणवळण सुलभ होणार आहे. चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी 91 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू दरम्यानचा 2.700 किलोमीटर लांबीचा रस्ता साकारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाने 3 कोटी 94 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. हे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणी याच रस्त्यावर असल्याने 5.50 मीटर रुंद डांबरी रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. पाच वर्षांसाठी देखभाल व दुरुस्ती खर्चासाठी आवश्यक निधीची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन Read More »

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

Ajit Pawar: माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे आज निधन झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरुणकाका जगताप यांच्याबद्दल सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे की, “माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली Read More »

सांगलीत चार माजी आमदारांचा प्रवेश अन् भेदभाव करणार नाही , अजित पवार असं का म्हणाले?

Ajit Pawar: आपला महाराष्ट्र हा महापुरूषांचा आहे. त्यांच्या विचारांवरच आपल्याला चालायचे आहे असे सांगतानाच मला जे पटते ते काम मी करतो. मी ज्याला शब्द दिला त्याचे काम कधी अपूर्ण ठेवले नाही. आज पक्षात तुम्ही प्रवेश केलात मात्र माझ्याकडून कधी भेदभाव होणार नाही अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. आज एमसीए लॉन्ज वानखेडे स्टेडियम मुंबई येथे सांगली, बीड, यवतमाळ येथील विविध पक्षांच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. सभासद नोंदणीसाठी काम करा असे आवाहन करतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही लागतील. तीन वर्षे निवडणूका झालेल्या नाहीत. त्याचे कारण हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. लवकरच निर्णय व्हावा असा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. निवडणूक झाली तर अनेक घटकातील लोकांना प्रतिनिधीत्व मिळणार आहे. लवकरात लवकर निवडणूका झाल्या तर नव्या चेहऱ्यांना व अनुभवी लोकांना संधी मिळू शकते असेही अजित पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करतानाच माणसाशी नातं जोडणारा आणि शेतकर्‍यांशी नाळ जोडलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून प्रत्येकांनी पक्ष वाढीसाठी काम करायचे आहे असे सांगतानाच सर्वसामान्यांच्या पाठीशी पक्ष ठाम उभा राहिल असा शब्दही अजित पवार यांनी यावेळी दिला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील आठवणी सांगताना अजित पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा ही जोडी सर्वसामान्यांच्या मनावर कशी कोरली गेली होती हे सांगितले. जात-पात धर्म याला फाटा देत आणि जातीय सलोखा राखत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार आपल्या देशाचे काम सुरू आहे. या संविधानावरच आपला देश चालत आहे हेही आवर्जून अजित पवार यांनी स्पष्ट केले. सांगलीसह इतर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांचा पक्षात झालेला प्रवेश आम्हाला ताकद आणि शक्ती देणारा – सुनिल तटकरे सांगली हा जिल्हा विचारवंतांचा असून या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांचा पक्षात होत असलेला पक्षप्रवेश आम्हाला ताकद आणि शक्ती देणारा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळ घडली आणि मोठ्या प्रमाणावर वाढलीही अशा जिल्ह्याच्या पाठीमागे सरकारची ताकद उभी राहिली पाहिजे असा आमचा प्रयत्न असल्याचे सांगतानाच सांगलीच्या एका वेगळ्याच पॅटर्नची ओळख आहे. मात्र आता आपल्याला सांगलीचा नवा पॅटर्न उभा करायचा असून तो तुम्ही उभा कराल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. सांगली, बीड जिल्ह्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले राजकीय शिलेदार आज आपल्या पक्षात येत आहेत याचा आनंदही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली सांगली, बीड, ठाणे जिल्ह्यातील कल्याण – डोंबिवली, यवतमाळमधील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. सांगली जिल्हयातील शिराळा विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलासराव जगताप, खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य तम्मनगौंडा रविपाटील, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संग्राम जगताप, युवा मोर्चाचे ग्रामीण माजी अध्यक्ष अनिल सर्जेराव पाटील, निलेश येसगुडे, प्रमोद सावंत, निवृत्ती शिंदे आदींसह शिराळा, खानापूर, पलूस, इस्लामपूर, जत, तासगावमधील असंख्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. याशिवाय बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रमेश आडसकर, अंकुश इंगळे, भारत पिंगळे, सुनिल शिनगारे, निलकंठ भोसले, काकडे गुरुजी, संभाजी इंगळे, लक्ष्मीकांत लाड, केज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड, गटनेते हरुण इनामदार, नगरसेवक अजहर इनामदार, राजू इनामदार, रेश्मा इनामदार, आशाताई कराड आदींसह असंख्य विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. याशिवाय कल्याण – डोंबिवलीतील प्रतिक वालिलकर, जय जेपाल, पवन वालिलकर, शालिक पाटील, सचिन पाटील, आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार सना मलिक, आमदार विजयसिंह पंडित, आमदार इद्रीस नायकवडी, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद जलालुद्दीन, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, माजी आमदार संजय दौंड, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह सांगली, बीड, यवतमाळ, कल्याण डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष, पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगलीत चार माजी आमदारांचा प्रवेश अन् भेदभाव करणार नाही , अजित पवार असं का म्हणाले? Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोठडीत मृत्यू झाला तर कैद्याच्या वारसांना मिळणार पाच लाख

Maharashtra Government: राज्यातील कारागृहांमध्ये कोठडीत असलेल्या कैद्यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्यास त्याच्या वारसांना राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने या निर्णयाला मान्यता दिली आहे. या धोरणानुसार कारागृहामध्ये काम करताना झालेल्या अपघातामुळे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, कारागृह कर्मचाऱ्यांच्या मारहाणीमुळे किंवा कैद्यांच्या आपापसातील भांडणात मृत्यू झाल्यास आणि संबंधित प्रकरणात प्रशासनाचा निष्काळजीपणा चौकशीतून सिद्ध झाल्यास, कैद्याच्या वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. तुरुंगवासातील आत्महत्येच्या प्रकरणात कैद्याच्या वारसांना एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व कारागृहांमध्ये हे धोरण लागू राहणार आहे. कैद्याचा मृत्यू वार्धक्य, दीर्घ आजार, कारागृहातून पलायन करताना अपघातात, जामीनावर असताना, किंवा उपचार नाकारल्याने झाला असल्यास कोणतीही भरपाई देण्यात येणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास मात्र शासनाच्या विद्यमान धोरणानुसार भरपाई मिळेल. भरपाईसाठी संबंधित कारागृह अधीक्षकांनी प्राथमिक चौकशी, शवविच्छेदन, पंचनामा, वैद्यकीय अहवाल, न्यायालयीन व जिल्हाधिकाऱ्यांचा तपास आदी कागदपत्रांसह अहवाल प्रादेशिक विभाग प्रमुखांकडे सादर करावा लागेल. यानंतर प्रकरणाची सखोल चौकशी करून अंतिम प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सादर केला जाईल. त्यांच्या शिफारशींच्यानंतर शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल आणि भरपाई दिली जाईल. मृत्युच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोठडीत मृत्यू झाला तर कैद्याच्या वारसांना मिळणार पाच लाख Read More »

अजितदादा यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये रंगणार ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव

Ajit Pawar: हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त इतिहास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दमदार प्रवास आणि समाजसुधारक महात्मा फुलेंच्या दिमाखदार कार्याचा पट उलगडणारा भव्य ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव जामखेडमध्ये रंगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या जयंतीचा त्रिवेणी मुहूर्त साधून येत्या 17 एप्रिलला संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केला जाणार आहे. ज्येष्ठ गायक आनंदजी शिंदे यांचा ‘शिंदेशाही बाणा’ आणि अभिजीत जाधव, अमु जाधव यांचा ‘शिव शंभो गर्जना’ हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असेल. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या पुढाकारातून हा महोत्सव आयोजित केला आहे. जामखेड महाविद्यालयाच्या आवारात आयोजिलेल्या या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होईल. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जेसाहेब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संध्या सोनवणे यांनी माध्यमांना दिली. 17 एप्रिल गुरुवारी सायंकाळी 6 वाजता अजित पवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार असून, त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत शिंदे आणि जाधव यांच्या बहारदार गायनाची मैफल अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, असेही संध्या सोनवणे यांनी सांगितले. संध्या सोनवणे म्हणाल्या, ‘‘महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून, त्यांच्या आपुलकी वाढविण्यासाठी हा महोत्सव घेतला जातो. यंदाचे दुसरे वर्षे असून, त्यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येणार आहेत. ’’ सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक प्रवाहात समता, बंधुभाव आणि न्यायाची मूल्ये टिकवणे ही काळाची गरज बनली आहे. शिवछत्रपतींचा पराक्रम, महात्मा फुल्यांचे क्रांतिकारक विचार, शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार यांचा वारसा अधिक ठामपणे पुढे नेण्याची गरज आहे. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून ‘शिव-फुले-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवा’चे आयोजन आहे, असे संध्या सोनवणे यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या माध्यमातून जामखेडमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदाच जामखेड येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात अजित पवार नेमके काय बोलणार, याकडे राजकीय वुर्तळाचे लक्ष राहणार आहे. त्यात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे उपस्थितीत राहणार असल्याची शक्यता आहे.

अजितदादा यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये रंगणार ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव Read More »

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत, अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

Actor Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेम जागवले. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजातील वास्तव आणि देशासाठी असलेली निष्ठा मोठ्या ताकदीने मांडली. त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती ही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणारी नाही. ‘दादासाहेब फाळके’, ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त असलेले मनोज कुमार हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते.त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत, अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली Read More »

“कर्जमाफीचे फसवे वचन? शेतकऱ्यांच्या डोक्यावरून महायुतीचा ‘कर्जमुक्तीचा’ फेरा!”

Ajit Pawar: निवडणुकीच्या रंगीत भाषणांत “कर्जमाफी” हा शब्द शेतकऱ्यांच्या कानात गोड वाटतो. महायुती सरकारनेही याच चालीला बळ दिलं. निवडणूक जिंकण्यासाठी “आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू” असं ठोकून सांगितलं. पण, आता सत्तेवर आल्यावर अजित पवार सरकारच्या मंत्रालयातून स्पष्ट सांगताहेत “2025-26 मध्ये कर्जमाफी होणार नाही!” “वोट द्या, मग विसरा” , हाच काय महायुतीचा मंत्र? निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना “कर्जमुक्ती” चे स्वप्न दाखवणं, आणि नंतर “आर्थिक अडचणी”सांगून मागे हटणं ही राजकीय फसवणूक नाही का? शेतकरी आता प्रश्न विचारतो आहे. पवारांचा तर्क – खरा की बहाणा?अर्थमंत्री म्हणतात, “राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे कर्जमाफी शक्य नाही.” पण प्रश्न आहे. निवडणुकीच्या वेळी हीच आर्थिक परिस्थिती नव्हती का? मग तेव्हा आश्वासन का दिलं? असा प्रश्न आता विरोधक विचारत आहे. जर सरकारला आधीच माहिती होतं की कर्जमाफी करणं अशक्य आहे, तर शेतकऱ्यांना फसवण्याचा हा डाव नाही का? याचा उत्तर महायुतीला द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया – “आमच्यावर विश्वासघात!”  महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आता स्वतःला “ठगलेला”* समजत आहेत. त्यांचा आक्रोश आहे. “वोट मिळाला, तेवढंच महत्त्व होतं का?” “कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार?” असं शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.

“कर्जमाफीचे फसवे वचन? शेतकऱ्यांच्या डोक्यावरून महायुतीचा ‘कर्जमुक्तीचा’ फेरा!” Read More »

मोठी बातमी! राम सुतारांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर

Ram Sutar: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला. राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्पे साकारली आहेत. त्यांचं प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भूत नमूना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला. या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहचवले. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, देशाच्या संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा, दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, दादरला चैत्यभूमी येथे उभारण्यात येत असलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे त्यांच्या कलाकौशल्याप्रमाणेच या महामानवांवरील त्यांच्या प्रेमाचे, आदराचे प्रतिक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम सुतार यांचा गौरव केला. महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील या दीपस्तंभाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

मोठी बातमी! राम सुतारांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर Read More »

MPSC च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करा, अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Ajit Pawar: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय देण्यासाठी ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त सदस्यपदांवरील नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. दरम्यान ही नियुक्ती तातडीने झाल्यास परीक्षा, मुलाखती, निकालाची प्रक्रिया गतिमान होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असेही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. ‘एमपीएससी’द्वारे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस निरीक्षक, प्राध्यापक अशा राज्यसेवेतील महत्वाच्या पदांवरील नियुक्त्या करण्यात येतात. त्यासाठी ‘एमपीएससी’मध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्यांची पदे मंजूर आहेत. मंजूर पाच पदांपैकी अध्यक्ष आणि दोन सदस्यांची पदे भरलेली आहेत, तर सदस्यांची तीन पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे आयोगाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असून परीक्षांना विलंब होत आहे. मुलाखती, निकालाची प्रक्रिया रखडत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून निवेदनांद्वारे केली जात आहे. या मागण्यांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून ‘एमपीएससी’तील तीन सदस्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी विनंती केली आहे.

MPSC च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करा, अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »