Dnamarathi.com

Ajit Pawar: हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त इतिहास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दमदार प्रवास आणि समाजसुधारक महात्मा फुलेंच्या दिमाखदार कार्याचा पट उलगडणारा भव्य ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव जामखेडमध्ये रंगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या जयंतीचा त्रिवेणी मुहूर्त साधून येत्या 17 एप्रिलला संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केला जाणार आहे.

ज्येष्ठ गायक आनंदजी शिंदे यांचा ‘शिंदेशाही बाणा’ आणि अभिजीत जाधव, अमु जाधव यांचा ‘शिव शंभो गर्जना’ हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असेल.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या पुढाकारातून हा महोत्सव आयोजित केला आहे. जामखेड महाविद्यालयाच्या आवारात आयोजिलेल्या या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होईल. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जेसाहेब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संध्या सोनवणे यांनी माध्यमांना दिली.

17 एप्रिल गुरुवारी सायंकाळी 6 वाजता अजित पवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार असून, त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत शिंदे आणि जाधव यांच्या बहारदार गायनाची मैफल अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, असेही संध्या सोनवणे यांनी सांगितले.

संध्या सोनवणे म्हणाल्या, ‘‘महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून, त्यांच्या आपुलकी वाढविण्यासाठी हा महोत्सव घेतला जातो. यंदाचे दुसरे वर्षे असून, त्यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येणार आहेत. ’’

सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक प्रवाहात समता, बंधुभाव आणि न्यायाची मूल्ये टिकवणे ही काळाची गरज बनली आहे. शिवछत्रपतींचा पराक्रम, महात्मा फुल्यांचे क्रांतिकारक विचार, शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार यांचा वारसा अधिक ठामपणे पुढे नेण्याची गरज आहे. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून ‘शिव-फुले-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवा’चे आयोजन आहे, असे संध्या सोनवणे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या माध्यमातून जामखेडमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदाच जामखेड येणार आहेत.

त्यामुळे या कार्यक्रमात अजित पवार नेमके काय बोलणार, याकडे राजकीय वुर्तळाचे लक्ष राहणार आहे. त्यात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे उपस्थितीत राहणार असल्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *