DNA मराठी

Ahilyanagar news

nilesh lanke

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी

Nilesh Lanke: नगर–मनमाड महामार्ग हा केवळ वाहतुकीचा रस्ता नाही तो अहिल्यानगर जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय हालचालींचा मुख्य मेरुदंड आहे. मात्र गेल्या आठ–नऊ वर्षांपासून हा महामार्ग ‘काम सुरू आहे’ या एका वाक्यात अडकलेला आहे. खड्डे, धूळ, अपघात आणि मृत्यू हेच या रस्त्याचं वास्तव बनलं आहे. या महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे दररोज जीव धोक्यात घालण्यासारखं झालं आहे. अनेकांनी प्राण गमावले, कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. तरीही जबाबदार यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या संवेदना जाग्या होत नाहीत, हे दुर्दैव. आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट खंडणीखोरीचे आरोप करत या रखडपट्टीचं मूळ कारण समोर आणलं आहे. ठेकेदारांकडून लोकप्रतिनिधी पैसे मागतात, त्यामुळे पाच–सहा ठेकेदारांनी काम अर्धवट सोडल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर एका लोकप्रतिनिधीला दम दिल्याचंही उघड झालं. मात्र एवढं सगळं सांगूनही ‘तो लोकप्रतिनिधी कोण?’ हा प्रश्न अनुत्तरितच ठेवण्यात आला. याच मुद्द्यावर खासदार निलेश लंके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा पैसे कुणी मागितले?” असं आव्हान दिलं. मागील सात–आठ वर्षांत काम अर्धवट सोडणारे ठेकेदार का गेले, कुणी वैतागून दिलं, कुणी काय मागितलं, हे समाजासमोर यावं, अशी त्यांची मागणी आहे. या आरोप–प्रत्यारोपांत मात्र सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहे सामान्य नागरिक. रोज या रस्त्यावरून जाणारा शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका, कामगार… यांच्यासाठी हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. राजकीय लढाया सुरू असताना रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा एखाद्या अपघाताची नांदी ठरत आहे. नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न आता फक्त बांधकामाचा राहिलेला नाही तो राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासकीय अपयशाचा आरसा बनला आहे. आरोप करणाऱ्यांनी नावे जाहीर करावीत, चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी. अन्यथा हा महामार्ग पूर्ण होण्याआधी आणखी किती जीव जाणार, हा प्रश्न कायम राहील.

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी Read More »

ahilyanagar events

Ahilyanagar Events : अहिल्यानगरमध्ये 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव

Ahilyanagar Events :   कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद अहिल्यानगर व एक्सपो इंडियन ओशियन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नेमाने इस्टेट, केडगाव रोड येथे भव्य जिल्हा कृषी महोत्सव ‘कृषीपर्व’ व कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, कृषी उत्पादनांचे प्रदर्शन व थेट खरेदी-विक्रीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जात आहे. महोत्सवात धान्य महोत्सव, खाद्य महोत्सव, कृषी प्रक्रिया उद्योगांचे प्रदर्शन, महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने, कृषी यांत्रिकीकरण व निविष्ठांचे सुमारे पाचशे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यात जामखेडची ज्वारी, अकोलेचा सुवासिक इंद्रायणी तांदूळ, हातसडीचा तांदूळ, गावरान मटकी, गहू, कडधान्य, फळे व भाजीपाला यांसह विविध कृषी प्रक्रिया पदार्थांची विक्री व प्रदर्शन करण्यात येईल. कृषी क्षेत्रातील आधुनिक बदल लक्षात घेता महोत्सवात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित उपाययोजना व काटेकोर शेती याविषयी माहिती देणारे विशेष स्टॉल असणार आहेत. यासोबतच खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून शिपी आमटी, शिंगोरी आमटी, मांडे, थालपीठ यांसह विविध पारंपरिक गावरान खाद्यपदार्थांचा आस्वाद नागरिकांना घेता येईल. या महोत्सवाच्या कालावधीत आयोजित कृषी परिषदेअंतर्गत कृषी विभागाशी संबंधित अधिकारी व विषयतज्ज्ञांच्या उपस्थितीत मार्गदर्शनपर चर्चासत्रे व व्याख्याने आयोजित केली असून त्यातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती, उत्पादनवाढ, कृषी प्रक्रिया उद्योग व बाजारपेठ व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट, कृषी उद्योजक, विद्यार्थी व नागरिकांनी या जिल्हा कृषी महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Ahilyanagar Events : अहिल्यानगरमध्ये 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव Read More »

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच? जलसंपदा–मृद व जलसंधारण प्रकरणात कारवाईला टाळाटाळ

Devendra Fadnavis: राज्यातील प्रशासकीय यंत्रणा कायद्याच्या चौकटीत कार्यरत आहे की सत्तेच्या आणि पैशाच्या दबावाखाली, असा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांचा मृद व जलसंधारण विभागात नियमबाह्य पद्धतीने समावेश करून पदोन्नती देण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब चिंताजनक मानली जात आहे. या प्रकरणाकडे लक्ष वेधत नागपूरचे आमदार संदीपची दिवाकरराव जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. या पत्रात त्यांनी ३० नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयाचा संदर्भ देत, “उशिराने विकल्प सादर केलेल्या अधिकाऱ्यांचे समावेशन” असा चुकीचा उल्लेख करून, यापूर्वी समावेशनास नकार देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना भ्रष्ट मार्गाने मृद व जलसंधारण विभागात समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप केला आहे. आमदार जोशी यांच्या मते, आठ अधिकाऱ्यांचे समावेशन नियमबाह्य असून ते तात्काळ रद्द करण्यात यावे, तसेच या प्रक्रियेत सहभागी असलेल्या मंत्रालयीन अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. या संदर्भात, उपविभागीय जलसंधारण अधिकारी या संवर्गासाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आवश्यक असताना, श्री. सिद्धेश्वर खंडप्पा कंजारे (BE यांत्रिकी, M.Tech – मटेरियल) यांना या पदावर नियमबाह्य पद्धतीने समाविष्ट करून ३० जून २०२१ रोजी पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सेवाप्रवेश नियमांमध्ये जाणीवपूर्वक “स्थापत्य अभियांत्रिकी” या अर्हतेचा उल्लेख टाळण्यात आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या अधिकृत नोंदीत आठ अधिकाऱ्यांचा मृद व जलसंधारण विभागातील समावेश नियमबाह्य असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. जलसंपदा विभागाची पूर्वपरवानगी न घेता हा समावेश करण्यात आल्याचे मान्य असतानाही, अद्याप कोणतीही चौकशी, निलंबन किंवा जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर, आमदार जोशी यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचे तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व पुढील प्रक्रिया तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात हे आदेश अंमलात आले नसल्याचा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणामागे कक्ष अधिकारी श. हा. खरोडे हे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप प्रशासकीय वर्तुळात चर्चेत आहे. नियमबाह्य समावेश व पदोन्नतीसाठी मोठ्या आर्थिक व्यवहाराची चर्चा सुरू असली, तरी शासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. या प्रकाराचा थेट फटका मृद व जलसंधारण विभागातील मूळ अधिकाऱ्यांना बसत असून, नियमबाह्य समावेशामुळे त्यांच्या हक्काच्या पदोन्नती संधी हिरावल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे विभागात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांचे आदेश पायदळी तुडवणाऱ्यांवर कारवाई होणार का, की हे प्रकरणही नेहमीप्रमाणे फाईल आणि शेर्‍यांपुरतेच मर्यादित राहणार, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच? जलसंपदा–मृद व जलसंधारण प्रकरणात कारवाईला टाळाटाळ Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात प्राजक्त तनपुरेंचा एल्गार

Prajakt Tanpure : प्रस्तावित राहुरी–शनि शिंगणापूर रेल्वे मार्गासाठी होणाऱ्या भूमिसंपादनाला परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे. या रेल्वे मार्गासाठी तांदूळवाडी, देसवंडी, कोंढवड, तमनर आखाडा, उंबरे, ब्राह्मणी, आदी गावांतील अत्यंत सुपीक शेतीजमीन संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. या भागातील बहुतांश शेतजमीन नदीकाठालगत असून कालव्यांद्वारे नियमित सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या जमिनींवर मोठ्या प्रमाणात शेती उत्पादन घेतले जाते. रेल्वे प्रकल्पासाठी होणाऱ्या भूमिसंपादनामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या भावना राज्य व केंद्र शासनापर्यंत पोहोचवून भूमिसंपादन प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला, ज्यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prajakt Tanpure : राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात प्राजक्त तनपुरेंचा एल्गार Read More »

mpsc exam

MPSC Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 4 जानेवारी रोजी पूर्व परीक्षा‌; जिल्ह्यातील 45 उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश

MPSC Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५’ दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत जिल्ह्यातील ४५ परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आयोगाचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण १४ हजार २९५ उमेदवार बसणार आहेत. या कामकाजासाठी ११ उपजिल्हाधिकारी दर्जाचे समन्वय अधिकारी, २ उपजिल्हाधिकारी दर्जाचे भरारी पथकातील अधिकारी, ४५ उपकेंद्रप्रमुख (वर्ग-१ अधिकारी), १३४ पर्यवेक्षक, ५८४ समवेक्षक, समन्वय अधिकारी व भरारी पथकांचे १३ सहायक, १३५ लिपीक, ४५ केअरटेकर, ४५ बेलमन, १७९ शिपाई, १३३ पाणी वाटप कर्मचारी व ५६ वाहनचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी ९.३० वाजल्यापासून प्रवेश देण्यात येईल. त्यांनी आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना बंदी परीक्षा कक्षात मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन आदी दूरसंचार साधने आणणे व परीक्षा केंद्र परिसरात बाळगणे निषिद्ध आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरूनच डाउनलोड करून घ्यावीत; दुय्यम प्रवेश प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून दिली जाणार नाहीत. तसेच, परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व एस.टी.डी. बुथ, फॅक्स व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

MPSC Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 4 जानेवारी रोजी पूर्व परीक्षा‌; जिल्ह्यातील 45 उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश Read More »

police

Ahilyanagar Politics: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश; कारण काय?

Ahilyanagar Politics: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१)(३) अन्वये १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, मिरवणुका आणि प्रेतयात्रांतील जमावावर हा आदेश लागू होणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कर्तव्यावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि सभा किंवा मिरवणूक काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही या आदेशातून सूट राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Ahilyanagar Politics: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश; कारण काय? Read More »

bunty jahagirdar

Bunty Jahagirdar Death: बंटी जहागीरदार हत्या प्रकरण; दोन्ही आरोपींना अटक

Bunty Jahagirdar Death: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील बंटी जहागीरदार याच्यावर 31 डिसेंबर रोजी दोन जणांनी गोळीबार केल्याने उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला आहे. भर दिवसा जिल्ह्यात गोळीबार झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या धक्कादायक घटनेचा गांभीर्य ओळखत जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. बंटी जहागीरदार अंत्यविधीतून घरी जात असताना 31 डिसेंबरच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पीटल जवळ दोन जणांनी गोळीबार केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात जात असताना त्याचा मृत्यू झाला. तसेच त्याच्यासोबत असणारा अमिन गुलाब शेख हे जखमी झाले असून त्यांचेवर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 103,109,3(5) तसेच आर्म्स अॅक्ट कलम 3/25 अंतर्गत दोन अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर पोलीसांचे 3 पथके यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाणा करण्यात आलेले होती. रात्री उशिरा या गुन्हयातील दोन्ही आरोपी ताब्यात घेतले आहेत त्यांनी गुन्हयाची कबुली दिलीली असुन दोघांनाही सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. कृष्णा अरुण शिनगारे, (वय 23 वर्षे), रविंद्र गौतम निकाळजे (वय 23 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. गुन्हयाच्या अनुषंगाने आरोपींकडे सखोल विचारपुस करण्यात येत आहे. गुन्हयात वापरलेले शस्त्र आरोपींनी कोठुन आणली? गुन्हयाचा प्लॅन कसा केला? गुन्हयामध्ये अन्य कोणी अरोपी सामील आहेत किंवा कसे ? व गुन्हा करण्यामागे नेमके कारण काय. याबाचीचा पोलीस सखोल तपास करत आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर देखील पोलीसांचे बारकाईने लक्ष असून, कोणीही घटनेसंबधाने आक्षेपार्य वा आपत्ती जनक पोस्ट शेअर केल्यास वा घटनेबाबत कोणीही चुकीची माहिती प्रसारित केल्यास किंवा अफवा पसरविल्यास त्यांचेवर देखील पोलीसांकडून कारवाई करण्यात येईल अशी माहिती अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Bunty Jahagirdar Death: बंटी जहागीरदार हत्या प्रकरण; दोन्ही आरोपींना अटक Read More »

mns

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ; मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी भाजप 32 तर राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दिले आहे. त्यामुळे तिरंगी झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आता अहिल्यानगर शहरातील राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार प्रभाग क्रमांक 17 मधील मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहे. राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहे.केडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक सतरा मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोन्ही उमेदवारांचा गेल्या चोवीस तासांपासून कुटुंबाशी संपर्क नसल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी माहिती दिली आहे. दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार भाजप आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांसमोर निवडणुकीला उभा होता. तसेच निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांचे अपहरण केले असल्याचा विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी संशय व्यक्त केला आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ; मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब Read More »

bunty jahagirdar

Bunty Jahagirdar : मोठी बातमी; श्रीरामपूर हादरले, बंटी जहागीरदारवर भरदिवसा गोळीबार

Bunty Jahagirdar : श्रीरामपूर शहरात भर दिवसा गोळीबाळ झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बंटी जहागिरदार यांच्यावर 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून बंटी जहागीरदार यांना 3 गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आज (30 डिसेंबर) दुपारी एका अंत्यविधीतून परत येत असताना त्यांच्यावर शहरातील जर्मन हॉस्पीटल समोर 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत दोन्ही आरोपी फरार झाले. गंभीर जखमी झालेल्या जहागीरदार यांना उपचारासाठी शहरातील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर आता पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगरमध्ये आणण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिस आरोपींचा शोध घेत असून सोशल मीडियावर आरोपींचे फोटो व्हायरल झाले आहे.

Bunty Jahagirdar : मोठी बातमी; श्रीरामपूर हादरले, बंटी जहागीरदारवर भरदिवसा गोळीबार Read More »

election

Ahilyanagar Politics : पक्ष बदलले, चेहरे तेच; पण जनता कुठे हरवली?

Ahilyanagar Politics : महानगरपालिकेच्या 2025 च्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस म्हणजे राजकारणाच्या आरशात पाहण्याचा योगच जणू. दिवसभर शहरातील प्रभागांमधून फिरताना परिचित चेहरेच अधिक दिसत होते. ओळखीची माणसे, ओळखीचे चेहरे, काहींची पक्षनिष्ठाही माहीत होती. मात्र, संध्याकाळपर्यंत एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली, कोण कुठल्या पक्षाचा आहे, हेच समजत नव्हते. चहाच्या टपरीवर बसलेला एकजण आत्मविश्वासाने सांगत होता, मी अमुक पक्षाचा आहे. तेवढ्यात त्याला फोन आला, तो उठून गेला. चहा संपवून आम्ही निवडणूक कार्यालयाकडे येताना पुन्हा तोच भेटला आणि सहजपणे म्हणाला, “मी दुसऱ्याच पक्षातून फॉर्म भरला आहे.” ही एखादी अपवादात्मक घटना नव्हती. मागील पाच-सहा दिवसांत अशा अनेक कथा ऐकायला मिळाल्या. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी—महायुती असो वा महाविकास आघाडी—सर्वच ठिकाणी चेहरे तेच, फक्त झेंडे बदललेले. या पक्षांतरांच्या खेळात एक वाक्य मात्र सर्वत्र समानपणे ऐकू येत होते… “जनतेच्या कल्याणासाठी, प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी मी पक्ष बदलत आहे…. विरोधक असो वा सत्ताधारी, मोठा नेता असो वा स्थानिक इच्छुक हे वाक्य इतक्या गोडपणे, इतक्या सहजपणे उच्चारले जात होते की तेच जणू निवडणूक घोषवाक्य बनले होते. मात्र या घोषणांच्या आड एक कटू सत्य दडलेले होते….. जनतेच्या प्रश्नांचा उल्लेख कुठेच नव्हता. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची समस्या, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, शिक्षण—अहिल्यानगरच्या नागरिकांना रोज भेडसावणाऱ्या प्रश्नांवर एकही ठोस चर्चा ऐकू आली नाही. सत्तेत असलेले अचानक विरोधक झाले, विरोधक सत्तेच्या जवळ गेले. निवडून आल्यावर आपण कोणत्या पक्षात असू, हे सांगण्याचीही तयारी अनेकांची नव्हती. आजचा विरोध उद्याचा सत्ताधारी होऊ शकतो, हीच जणू राजकीय हमी बनली आहे. या सगळ्या धावपळीत एक गोष्ट ठळकपणे दिसली निवडणूक म्हणजे सार्वजनिक सेवेचा नव्हे, तर वैयक्तिक आणि कौटुंबिक व्यवस्थापनाचा प्रकल्प बनला आहे. कधी स्वतःसाठी, कधी पत्नीकरिता, कधी मुला-मुलीसाठी, कधी सुनेसाठी, तर कधी नातवासाठी जागा सुरक्षित करण्याची धडपड सुरू आहे. राजकारणाचा वारसा जपताना शहराचा वारसा मात्र दुर्लक्षित राहतो आहे. लोकशाहीत निवडणूक ही जनतेसाठी असते, हे तत्वज्ञान कागदावरच उरले आहे का, असा प्रश्न पडतो. ज्यांच्या नावाने उमेदवारी मागितली जाते, ती जनता या सगळ्या प्रक्रियेत अदृश्य आहे. राजकीय गणिते जुळवताना सामाजिक वास्तव विसरले गेले आहे. अहिल्यानगरच्या या निवडणुकीत पक्षांतरांचा गोंधळ जितका वाढतो आहे, तितकीच जनतेची विश्वासार्हता कमी होत आहे. शेवटी प्रश्न एवढाच उरतो. या निवडणुकीत जिंकणार कोण? पक्ष, उमेदवार की राजकीय घराणी? आणि हरलेली कोण? तर ती जनता, जिने पुन्हा एकदा विकासाच्या नावावर आश्वासनांची पिशवी खांद्यावर घेतली आहे. लोकसत्तेच्या परंपरेतून पाहिले तर ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर लोकशाहीच्या आत्म्याची कसोटी आहे.

Ahilyanagar Politics : पक्ष बदलले, चेहरे तेच; पण जनता कुठे हरवली? Read More »