Vijay Wadettiwar : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. नुकतंच पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्याने पुन्हा एकदा राज्यात महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या प्रकारावरून आता विरोधकांनी सरकारवर चारही बाजूने टीकेला सुरुवात केली आहे. यातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकार महाविकास आघाडीला श्रेय मिळू नये म्हणून शक्ती कायदा आणत नसल्याची टीका केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणात पीडितेला लवकर न्याय मिळावा म्हणून महाविकास आघाडी सरकारने आणलेले शक्ती विधेयक राष्ट्रपतींनी मंजूर केले नाही त्यामुळे हा कायदा अस्तित्वात येणार नाही.
आम्ही गेले अडीच वर्ष मागणी करतोय या कायद्याची अंमलबजावणी करावी पण या कायद्याबाबत महायुती सरकारने काहीच हालचाल केली नाही.
विशेष म्हणजे महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे. अस असताना महायुती सरकारची ही भूमिका खेदजनक आहे.
महाविकास आघाडीला श्रेय मिळू नये म्हणून विधेयक अजून मंजूर करण्यात आलेला नाही का ? महिलांशी संबंधित प्रश्नांवर राजकारण करण्याची संधी महायुती सरकारने सोडली नाहीं. असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.