Satyajeet Tambe – राज्यातील सरकारी रुग्णालयांची अवस्था बिकट असताना श्रीगोंदा आणि संगमनेर येथे सरकारी रुग्णालयांची वानवा आहे
या दोन्ही रुग्णालयांना मान्यता मिळूनही ही रुग्णालये अद्याप कागदावरच आहेत. या रुग्णालयांचे बांधकाम तातडीने पूर्ण करून श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यांमधील लाखो रुग्णांना दिलासा द्या, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली.
फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व संगमनेर येथील 50 ते 100 खाटांच्या शासकीय रुग्णालयांचे बांधकाम अजूनही प्रलंबित आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे दोन्ही ठिकाणी रुग्णांसाठी रुग्णालयांची आवश्यकता असून ग्रामस्थांना 60 ते 50 किलोमीटर जावे लागत आहे.
इतकी वणवण करून देखील रुग्णालय जवळपास उपलब्ध नसल्याने रुग्णांचा रस्त्यातच जीव जातो. या दोन्ही रुग्णालयांच्या बांधकामांना सरकारने गेल्या वर्षीच मान्यता दिली असून त्याचे काम अजूनपर्यंत पूर्ण का झाले नाही? असा प्रश्न आ. तांबे यांनी आरोग्य मंत्र्यांना केले.
यावर बोलताना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, श्रीगोंदा व संगमनेर येथे सद्यस्थितीत 30 खाटांचे रुग्णालय कार्यान्वयीत आहे. श्रीगोंदा येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय बांधकामास शासन निर्णय फेब्रुवारी 2022 प्रमाणे 1 हजार 60 लक्ष रुपयांच्या बांधकामास मान्यता देण्यात आली आहे.
तसेच घुलेवाडी (संगमनेर) येथे 100 खाटांच्या 2 हजार 970 लक्ष रूपयांच्या रुग्णालय बांधकामास मार्च 2022 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर बांधकामाची निविदेबाबतची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यास्तरावर सुरू आहे.