Ahmednagar News:- इयत्ता दहावी ते पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी अहमदनगर येथील भिस्तबाग महलाशेजारील मैदानावर दोन दिवसीय विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
या मेळाव्यास विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. एकाच छताखाली त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीच्या संधी प्राप्त झाल्याने जगण्याला अधिक बळ मिळाल्याची भावना तरुण-तरुणींनी व्यक्त केल्या.
नोकरीमुळे जीवनाला मिळाली नवी दिशा
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील रहिवाशी असलेल्या गोविंदा मोरे या तरुणाने राहाता येथुन बी.कॉम पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. गेल्या दोन वर्षापासुन नोकरीच्या शोधात होता. परंतु नोकरीची संधी मिळाली नाही. महाविद्यालयातील प्राचार्यांनी महारोजगार मेळाव्याबाबत माहिती दिली. महारोजगार मेळाव्यात सहभागी होऊन नोकरीसाठी मुलाखत दिली. पहिल्याच प्रयत्नात यश येऊन रिंकल्स ॲकवा या कंपनीत नोकरीची संधी मिळाली.
नोकरीमुळे जीवनाला एक नवी दिशा मिळाली आहे. शासनाने आयोजित केलेल्या या महारोजगार मेळाव्यामुळे गोरगरीब व होतकरु तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याची भावनाही गोविंदाने व्यक्त केली.
महारोजगार मेळाव्यामुळे नामांकित कंपनीमध्ये नोकरी संधी
नंदुरबार जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या किरण रावताळे व विकास गावित या तरुणांना महारोजगार मेळाव्यातुन पहिल्याच प्रयत्नात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. आयटीआय मधुन मोटार मेकॅनिकचा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या शोधात होतो. शासनाने आयोजित केलेल्या या मेळाव्याची माहिती भेटली आणि लगोलग अहमदनगर गाठले.
महिंद्रा अँड महिंद्रासारख्या नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाल्याने या संधीच सोन करत अर्थाजनाबरोबरच नवीन टेक्नॉलॉजीची माहिती यातुन होणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे एक नवी उभारी मिळाल्याचेही तरुणांनी सांगितले.
महारोजगार मेळाव्यामुळे कंपन्यांना मनुष्यबळाची उपलब्धता
शासनाने आयोजित केलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामुळे एकाच छताखाली वेगवेगळे कौशल्य असलेले मनुष्यबळ कंपनीस उपलब्ध झाले. यातुन अनेक तरुण-तरुणींना रोजगारही देता आला. प्रशासनाने या महारोजगार मेळाव्याचे उत्कृष्टपणे व्यवस्थापन करण्यात आले होते.
या ठिकाणी आयोजित केलेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे तरुण-तरुणींच्या करिअरला एक नवी दिशा मिळाली. दरवर्षी अशाप्रकारचे मेळावे आयोजित करण्यात येऊन कंपन्यांना मनुष्यबळ व उद्योगांना मनुष्यबळ मिळणे सोईचे होणार असल्याची भावना इंडोस्कल्प ऑटोकॉम्प प्राइवेट लिमिटेडचे रघुनाथ कलकर, श्नायडर इलेक्ट्रीक इंडिया प्रा.लिमिटेडचे विरेंद्र दहिफळे यांच्यासह विविध उद्योजकांनी बोलुन दाखवली.