DNA मराठी

Payal Pawar : 50 तोळे सोने, 25 लाख रुपये दिले; तरीही पैशांसाठी छळाचा आरोप, पायल झांबरे मृत्यू प्रकरणात पतीला अटक

payal pawar

Payal Pawar  : पुण्यातील मुकुंदनगर परिसरातील 29 वर्षीय पायल पवार-झांबरे यांच्या मृत्यूच्या प्रकरणाने पुण्यात खळबळ उडाली आहे. पायल यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर हुंडा, सोने आणि पैशांसाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पती अक्षय झांबरे याला अटक केली असून सासू, सासरे आणि नणंदेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, पायल आणि अक्षय यांचा विवाह मार्च 2019 मध्ये झाला होता. लग्नावेळी पायलच्या माहेरच्या कुटुंबीयांनी 50  तोळे सोने आणि 25 लाख रुपये रोख दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच लग्नाचा खर्चही माहेरच्यांनी केला होता. एकूण सुमारे 70 ते 80 लाख रुपये खर्च झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मात्र, लग्नानंतरही पायलचा पैशांसाठी आणि सोन्यासाठी छळ सुरू असल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेषतः दरवर्षी दिवाळीच्या काळात माहेरून पाच ते दहा तोळे सोने आणण्याची मागणी केली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यंदा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पुढील हंगामापर्यंत वेळ देण्याची विनंती पायलच्या कुटुंबीयांनी केली होती. मात्र, त्यानंतरही तिच्यावर दबाव आणि छळ सुरू असल्याचा आरोप आहे.

दरम्यान, 1 नोव्हेंबर रोजी पायलचा सासूसोबत वाद झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर ती घरातून निघून गेल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह मुकुंदनगर येथील अक्षय हाइट्स सोसायटीतील फ्लॅटमध्ये आढळून आला. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट सापडलेली नसल्याचे वृत्त आहे. मृत्यूची नेमकी परिस्थिती आणि कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

पायलच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त करत झांबरे पॅलेस येथे तोडफोड केल्याची घटनाही घडली. पोलिसांनी या प्रकरणी पती अक्षय झांबरेसह चार जणांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स्वारगेट पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *