Nilesh Lanke : – अहमदनगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप विधानसभेत आमदार नीलेश लंके यांनी केला आहे.
यामुळे जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आला आहे. या प्रकरणात कारवाईची मागणी देखील त्यांनी विधानसभेमध्ये केली आहे.
विधानसभेत लंके म्हणाले, ठेकेदारास काम देण्यासाठी गैरमार्गाचा अनेकदा अवलंब करण्यात आला आहे. खोटी कागदपत्रे जोडणे, ठेका मिळाल्यानंतर काम पुर्ण नसणे, कॅपॅसिटीपेक्षा कोटींची जास्त कामे देण्यात आली.
एका ठेकेदारास सुरूवातील अपात्र ठरविणे व त्याच ठेेकेदाराला लगेच दोन दिवसांत पात्र ठरविण्यात आले आहे. टेेंडर रद्द करून पुन्हा करणे, टेेंडर नोटीसमधील अटी बदलणे अशा गैरमार्गाचा अवलंब केल्याच्या तक्रारी कार्यकारी अभियंता यांच्याकडे करूनही काहीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी नमुद केले.
जल जीवन कार्यक्रमांतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील मौजे जामगांवसह सहा गावांची पाणी पुरवठा योजनेचे काम घेताना ठेकेदारांनी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली आहे. ठेकेदाराकडे कोणतीही कागदपत्रे नसताना काम देण्यात आले आहे. या ठेकेदाराने काम पुर्ण झाल्याचे दाखलेही खोटे सादर केले असून त्यावर संबंधित विभागाच्या जावक क्रमांकाचा उल्लेख नाही तसेच सही देखील बनावट आहे. शासन निर्णयाप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी सांगितले.
ठेका घेतलेली सर्व कामे 25 ते 30 टक्के पुर्ण आहेत. टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती, संस्था यांच्याविषयी नगर जिल्हयातील लोकप्रतिनिधीनींनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पुराव्यासह वारंवार तक्रारी करण्यात येऊनही चौकशी करण्यात येत नाही.
ठेकेदारासबंधी माहीती मागविल्यानंतर माहीती देण्यात येत नाही. बनावट कागदपत्रे सादर करून ठेकेदाराने कामे मिळविली आहेत. या ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी आग्रही मागणी आ. लंके यांनी यावेळी बोलताना केली.