Nashik TCS Case : नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरातही अशाच प्रकारच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील एका नामवंत बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यालयातील पुरुष विश्रांती कक्षाबाबत (Resting Rooms) गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही विशिष्ट गटाकडून या कक्षाचा वापर नियमितपणे धार्मिक विधींसाठी केला जात असल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे, या विधींच्या वेळी इतर कर्मचाऱ्यांना त्या कक्षात प्रवेश नाकारला जातो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा येत असून कार्यालयीन शिस्तीचा भंग होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यास सांगितले आहे. “विश्रांती कक्षाच्या वापराबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची सत्यता तपासणे आवश्यक आहे. ही बाब अत्यंत संवेदनशील असून, यामुळे कार्यस्थळावरील वातावरणावर परिणाम होऊ शकतो,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर भर
या पत्रात विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांशी गोपनीयतेने संवाद साधून, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव, छळ किंवा असुविधा लादली जात आहे का, याची शहानिशा करण्याचे निर्देश मिसाळ यांनी दिले आहेत.
या प्रकरणावर बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या, “पुण्यातील आयटी कंपनीत विश्रांती कक्षाचा वापर विशिष्ट कार्यासाठी करून इतरांना प्रवेश नाकारला जाणे ही बाब चिंताजनक आहे. कार्यस्थळी कोणत्याही प्रकारचा भेदभाव, बळजबरी किंवा नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.”





