Manoj Bharathiraja : तमिळ चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज भारतीराजा यांचे चेन्नईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मनोज भारतीराजा हे प्रख्यात तमिळ दिग्दर्शक भारतीराजा यांचे पुत्र होते. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी हळहळली आहे.
अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रातील योगदान
मनोज भारतीराजा यांनी 1999 मध्ये त्यांच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ताजमहल’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘समुधिरम’, ‘अल्लु अर्जुन’, ‘वरुशामेलम वसंतम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये लक्षणीय भूमिका साकारल्या.
त्यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही पदार्पण केले होते. 2013 मध्ये त्यांनी ‘मार्गजी थिंगल’ या रोमँटिक ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
माहितीनुसार मनोज भारतीराजा यांना काही दिवसांपूर्वीच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मनोज भारतीराजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “त्यांनी ‘ताजमहल’, ‘समुधिरम’, ‘अल्लु अर्जुन’, ‘वरुशामेलम वसंतम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला. त्यांनी दिग्दर्शनही केले. मी दिग्दर्शक भारतीराजा, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो.”
मनोज भारतीराजा यांच्या पश्चात त्यांची पत्नी नंदना आणि दोन मुली अर्शिता आणि मथिवाधानी असा परिवार आहे. अनेक कलाकार आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सोशल मीडियावर लिहिले, “मनोज आता आपल्यात नाही हे ऐकून खूप मोठा धक्का बसला. त्यांचे अकाली निधन दुःखद आहे. ते फक्त 48 वर्षांचे होते. देव त्यांचे वडील थिरु भारतीराजा आणि त्यांच्या कुटुंबाला या असह्य वेदनादायक नुकसानातून सावरण्याची शक्ती देवो.”