Sawedi land Scam अहिल्यानगर – नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाक्याच्या समोर असलेल्या तब्बल १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या जमिनीची नोंदणी तब्बल ३५ वर्षांनंतर गुपचूप पद्धतीने पार पडल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. या व्यवहारामागे प्रशासकीय हलगर्जीपणा, राजकीय वरदहस्त आणि गुप्त हेतू असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
या जमिनीचा व्यवहार सर्वसामान्य खरेदी-विक्रीचा नसून, प्रशासनातील ढिसाळ कारभार आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आढावा घेतला पाहिजे, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
गुप्त नोंदणी, गूढ कामकाज
सदर जमीन सर्वे नंबर २४५/ब १ आणि २४५/ब २ या गटात असून काही वर्षांपूर्वी या जागेवर हाडांचा कारखाना होता, अशी माहिती समोर आली आहे. सध्या मात्र त्या ठिकाणी जुन्या भिंती तोडून नव्याने उभारणीचे काम वेगाने सुरू असून, तेही रात्रीच्या वेळी आणि अत्यंत गोपनीयतेने, ज्यामुळे नागरिकांचा संशय अधिकच बळावला आहे.
स्थानिक हात, परराज्यातील खरेदीदार?
सदर जमीन गुजरात येथील खरेदीदाराच्या नावावर असल्याचे सांगितले जात असले तरी, स्थानिक काही लोकांच्या सहाय्याशिवाय हे काम अशक्य असल्याचा आरोप आहे. काही वर्षांपूर्वी याच जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत तो प्रयत्न हाणून पाडला होता.
चुकीचे दस्तऐवजीकरण?
कोणतीही जाहिर नोटीस न देता पार पडलेला हा व्यवहार, नागरिकांच्या मते पारदर्शकतेच्या सर्व निकषांना हरताळ फासणारा आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार झाला का? याबाबत चौकशीची मागणीही वेग घेऊ लागली आहे.
या व्यवहारामुळे केवळ जमीनच नव्हे तर शासनाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जर चौकशी योग्य पद्धतीने झाली नाही, तर हा प्रकार राजकीय हस्तक्षेप व प्रशासकीय अपयशाचे ठळक उदाहरण म्हणून पुढे राहील.