DNA मराठी

“भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीखाली हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू; सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील आष्टी  येथील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या कारने झालेल्या अपघातात हॉटेल व्यावसायिक तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नगर-पुणे महामार्गावर घडली आहे. ही घटना ७ जुलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा येथे घडली.

या अपघातात नितीन प्रकाश शेळके (वय ३४, रा. पळते खुर्द) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस हा अपघातावेळी एम.जी. ग्लॉस्टर (एमएच २३ बीजी २९२९) ही कार चालवत होता. सुपा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत नितीन शेळके हे सह्याद्री खादी हॉटेलवरून आपल्या गावाकडे मोटारसायकलने निघाले होते. जातेगाव फाटा येथे महामार्गावर यु-टर्न घेत असताना पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम. जी. ग्लॉस्टर कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात ते रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तातडीने सुपा येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारचालक सागर धस व त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राला ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. ८ जुलै रोजी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आणि पळवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत नितीन शेळके यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याच ठिकाणी वर्षभरापूर्वी त्यांचे वडील प्रकाश शेळके आणि काही वर्षांपूर्वी चुलते यांचाही अपघाती मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

या प्रकरणी स्वप्नील शेळके यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सागर सुरेश धस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे करत आहेत.