DNA मराठी

ताज्या बातम्या

pathardi

Pathardi Crime : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणारे दरोडेखोर जेरबंद; पाथर्डी पोलिसांची कामगिरी

Pathardi Crime : शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारात गावठी कट्टा दाखवत युवकास मारहाण करून दुचाकी व रोख रक्कम लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन पोलिसांनी झडप घालत पाच आरोपींपैकी तिघांना अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्यांपैकी दोघे अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिर हबिब शेख (वय ३४, रा. माणिकदौंडी चौक) हे फ्लेक्स व्यवसाय करतात. त्यांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री आपली यमाहा लिबोरो (क्र. एमएच-१६ डब्ल्यू ३३१९) घरासमोर उभी केली होती. २२ फेब्रुवारी रोजी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास बॅनर लावण्यासाठी बाहेर पडताच त्यांच्या दुचाकीजवळ पाच जण संशयास्पद हालचाली करताना दिसले. शेख यांनी विचारणा केली असता तिघे जण दुचाकीची वायर तोडत असल्याचे आढळले. विरोध करताच दोघांनी त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच वेळी एका आरोपीने कमरेतील गावठी कट्टा काढून त्यांच्या डोक्याला लावला व गप्प बस नाहीतर गोळी घालीन अशी धमकी दिली. भीतीपोटी शेख खाली बसले असता त्यांच्या खिशातील ६५० रुपये हिसकावण्यात आले. त्यानंतर आरोपींनी दुचाकी पळवून नेली, तर दोन जण पल्सरवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे, बाबासाहेब बडे,नारायण बडे,ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव,इजाज सय्यद,निलेश गुंड, संदीप बडे,संदीप नागरगोजे ,भगवान गरगडे, प्रल्हाद निळे या पोलीस पथकाने तातडीने कारवाई करत अनिकेत शामवेल शिंदे वय २२ रा. शितलानगर देहूरोड पुणे याचे सह आणखी दोघा अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. एका सज्ञान आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. वापरलेली पल्सरही चोरीची असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

Pathardi Crime : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणारे दरोडेखोर जेरबंद; पाथर्डी पोलिसांची कामगिरी Read More »

Vijay Wadettiwar: अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांनी मांडली शेतकऱ्यांची स्थिती

Vijay Wadettiwar: गेल्या 24 तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची स्थिती मांडली. विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानीचा पाढा वाचताना वडेट्टीवार म्हणाले की नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर ,नांदेड ,परभणी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने ज्वारी, गहू, हरभरा ही काढणीला आलेली पिके मातीमोल झाली आहेत. आंबा आणि द्राक्ष बागायतदारांचेही अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने सोलापूर, परभणी, नांदेड, धाराशीव भागात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे असं वडेट्टीवार म्हणाले. मागील अतिवृष्टीची मदत अजून मिळालेली नाही, धानाला बोनस जाहीर करून देण्यात आलेला नाही आणि आता पुन्हा संकट आले आहे. सरकारने नियम-निकष बाजूला ठेवून तातडीने रोख मदत द्यावी आणि पंचनाम्यांचे केवळ आदेश न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त होत असताना दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या घराघरांवर नोटिसा चिकटवून दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी सुरू आहे. सहजपूर-जवळा सारख्या 600 लोकसंख्येच्या गावात 1000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करून मोजणी प्रक्रिया राबवली जात आहे. हे लोकशाहीला भूषणावह नाही. धाराशीव, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी 23 फेब्रुवारीला या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला होता. हा प्रकल्प रद्द करावा, अशी जनभावना असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. एकीकडे अस्मानी संकटामुळे शेतकरी खचला आहे, तर दुसरीकडे सुलतानी संकटाप्रमाणे सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांच्या जमिनी हिसकावत आहे. सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विधिमंडळ नेते विजय वडेटीवार यांनी केली. विधानसभा अध्यक्ष यांनी याची दखल घेऊन सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले.

Vijay Wadettiwar: अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांनी मांडली शेतकऱ्यांची स्थिती Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe: सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

Sujay Vikhe : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश संघटनात महत्त्वपूर्ण बदल करत भारतीय जनता पक्षने अहिल्यानगर जिल्ह्याचे युवा नेतृत्व आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्ह्यातील सक्रिय, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. खासदार म्हणून त्यांनी विविध विकासकामांसाठी पाठपुरावा केला असून युवक आणि ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याचे मानले जात आहे. प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल आणि राज्यभरात भाजपची ताकद वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात राज्याच्या राजकारणात डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sujay Vikhe: सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe Patil: राज्यसभेची वाटचाल : सुजय विखे पाटील यांची राजकीय पुनर्स्थापना की वारसाहक्काचा विस्तार?

Sujay Vikhe Patil: अहिल्यानगरच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत घडलेल्या घडामोडींनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. पराभव हा राजकीय कारकिर्दीचा शेवट नसतो, तर अनेकदा तो नव्या उभारणीचा प्रारंभ ठरतो. माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संदर्भात हीच प्रक्रिया सध्या दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर त्यांनी घेतलेली राजकीय पुनर्बांधणीची दिशा आणि आता राज्यसभेच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चा, या केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा भाग नाहीत; त्या महाराष्ट्राच्या बदलत्या सत्तासमीकरणांचेही प्रतीक आहेत. पराभवानंतरची पुनर्बांधणी : पराभव की संधी? लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अनेक नेते राजकीय अंधारात जातात. परंतु सुजय विखे पाटील यांनी हा पराभव आत्मपरीक्षणाची संधी मानून संघटनात्मक पातळीवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. सहकार क्षेत्रातील नेतृत्व स्वीकारून त्यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सहकार हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा मानला जातो. या क्षेत्रात नेतृत्व मिळवणे म्हणजे केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय प्रभावही निर्माण करणे होय. याच काळात विधानसभा निवडणुकांमध्ये आणि स्थानिक राजकारणात त्यांनी घेतलेली सक्रिय भूमिका, विशेषतः संगमनेरमधील राजकीय समीकरणांमध्ये झालेला बदल, यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. स्थानिक आमदारांच्या निवडणुकीत आणि महानगरपालिका सत्तास्थापनेत त्यांनी निभावलेली भूमिका, ही त्यांच्या संघटन कौशल्याची चुणूक मानली जाते. राज्यसभा : पराभूत नेत्यांसाठी पुनरागमनाचा मार्ग? भारतीय संसदीय व्यवस्थेत राज्यसभा ही केवळ “वरिष्ठ सभागृह” नसून अनेकदा ती राजकीय पुनरागमनाचे व्यासपीठ ठरते. लोकसभेत पराभव झालेल्या किंवा थेट निवडणूक लढवणे कठीण झालेल्या नेत्यांना राज्यसभेद्वारे संसदेत स्थान दिले जाते. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या संभाव्य राज्यसभा उमेदवारीकडे केवळ वैयक्तिक प्रगती म्हणून पाहणे अपुरे ठरेल. ही एक व्यापक राजकीय रणनीती असू शकते. भाजपसाठी अहिल्यानगर आणि आसपासचा भाग हा परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. या भागात पक्षाची ताकद वाढवण्यात विखे पाटील कुटुंबाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला अशा प्रभावशाली कुटुंबातील नेत्याला राष्ट्रीय पातळीवर संधी देण्याचा विचार आकर्षक वाटणे स्वाभाविक आहे. वारसा आणि नेतृत्व : कौटुंबिक प्रभावाचा प्रश्न सुजय विखे पाटील यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्या वडिलांचा, राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव नाकारता येणार नाही. सहकार, प्रशासन आणि राज्यकारभारातील त्यांचा अनुभव हा सुजय विखे पाटील यांच्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कौटुंबिक वारसा ही नवी गोष्ट नाही; शरद पवार, ठाकरे, चव्हाण, मुंडे यांसारख्या अनेक घराण्यांनी ही परंपरा निर्माण केली आहे. मात्र, वारसा हा केवळ प्रवेशद्वार असतो; टिकून राहण्यासाठी वैयक्तिक नेतृत्वगुण आवश्यक असतात. सुजय विखे पाटील यांनी स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो त्यांच्या वैयक्तिक क्षमतेचा दाखला मानला जाऊ शकतो. राज्यसभा उमेदवारी : पक्षनिष्ठेचे पारितोषिक की रणनीतिक गरज? राज्यसभेची उमेदवारी ही अनेकदा पक्षनिष्ठा, संघटनात्मक योगदान आणि भविष्यातील राजकीय संभाव्यता या तिन्ही गोष्टींचा संगम असते. भाजपसारख्या पक्षासाठी महाराष्ट्रात मजबूत स्थानिक नेतृत्व निर्माण करणे ही दीर्घकालीन गरज आहे. सुजय विखे पाटील यांची संभाव्य निवड ही या व्यापक रणनीतीचा भाग असू शकते. तथापि, राज्यसभेत जाणे म्हणजे केवळ प्रतिष्ठा नव्हे, तर जबाबदारीही आहे. राष्ट्रीय स्तरावर धोरणनिर्मितीत सहभाग, राज्याच्या प्रश्नांना संसदेत मांडणे आणि मतदारसंघाच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणे, ही राज्यसभा सदस्याची मूलभूत कर्तव्ये आहेत. पुनरागमन की नव्या पर्वाची सुरुवात? सुजय विखे पाटील यांच्या राज्यसभा संभाव्य उमेदवारीच्या चर्चा या केवळ राजकीय अफवा म्हणून दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्या महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या प्रवाहाचे संकेत आहेत. पराभवानंतरही राजकीय सक्रियता कायम ठेवून संघटनात्मक पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न, हा त्यांच्या नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेचा पुरावा आहे. राजकारणात वारसा महत्त्वाचा असतो, पण अंतिम कसोटी ही जनतेचा विश्वास आणि नेतृत्वाची परिणामकारकता यांचीच असते. राज्यसभेचा मार्ग खुला झाला, तर तो सुजय विखे पाटील यांच्यासाठी केवळ पुनरागमन नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरील नव्या राजकीय पर्वाची सुरुवात ठरू शकतो.

Sujay Vikhe Patil: राज्यसभेची वाटचाल : सुजय विखे पाटील यांची राजकीय पुनर्स्थापना की वारसाहक्काचा विस्तार? Read More »

shashikant shinde

Shashikant Shinde : राजकारणात पुन्हा ट्विट्स? शशिकांत शिंदे अन् प्रविण दरेकर एकाच गाडीत

Shashikant Shinde : राज्यातील राजकारणात कधी काय होणार याबाबत कुणालाही सांगता येत नाही. अशीच एक घटना विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी घडल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचे आमदार प्रविण दरेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. वेगवेगळ्या विचारधारायचे हे नेते एकमेकांविरोधात जोरदार हल्लाबोल करत असतात मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकत्र प्रवास केल्याने येणाऱ्या काळात राजकारणात नवीन ट्विस्ट येणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे आम्ही केवळ आजच नाही, तर यापुढेही तुम्हाला अशाच प्रकारे एकाच गाडीत दिसू अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी दिल्याने शशिकांत शिंदे भाजपासोबत जाणार का? अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. प्रविण दरेकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिल्यानंतर आता लवकरच शशिकांत शिंदे महायुतीत दिसणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Shashikant Shinde : राजकारणात पुन्हा ट्विट्स? शशिकांत शिंदे अन् प्रविण दरेकर एकाच गाडीत Read More »

radhakrishnan vikhe patil

Radhakrishnan Vikhe Patil : जलसंपदा विभागाचा ‘रिपोर्ट कार्ड’ मुख्यमंत्र्यांना सादर

Radhakrishnan Vikhe Patil : राज्याला सिंचनात स्वयंपूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाने वर्षभरात केलेल्या कामांचा व निर्णयांचा अहवाल (रिपोर्ट कार्ड) जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. आपल्या विभागाच्या वर्षभराच्या कामाचा असा अहवाल प्रकाशित करणारे डॉ. विखे पाटील हे राज्यातील पहिलेच मंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेती व उद्योगांची प्रगती आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने विभागाने केलेल्या कामांचा या अहवालात समावेश आहे. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात कृष्णा व गोदावरी खोऱ्यात राबवलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती यात देण्यात आली आहे. अहवालातील ठळक वैशिष्ट्ये व वर्षभरातील कामे : १०० दिवसांचा कृती आराखडा : गोदावरी आणि कृष्णा खोऱ्यातील १८ प्रकल्पांतून सिंचन क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट. यातील १० प्रस्तावांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नदीजोड प्रकल्पांना वेग : कोकण-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व पार-गोदावरी या प्रकल्पांच्या कामांना गती. ‘लँड बँक’ची निर्मिती : कृष्णा व गोदावरी खोऱ्यातील बुडीत क्षेत्राबाहेरील तब्बल ५३ हजार २७७ एकर जमीन ‘लँड बँक’ म्हणून निश्चित. अतिक्रमण हटाव मोहीम : कृष्णा लाभक्षेत्रात ४८७ आणि गोदावरी खोऱ्यात ३१९ अतिक्रमणे हटवून जागा मोकळी केली. नवीन धोरणांची अंमलबजावणी : उघड्या कालव्यांऐवजी बंदिस्त पाईपमधून पाणीपुरवठा, फ्लोटिंग सोलर, गाळ काढणे आणि ‘मित्रा’ संस्थेच्या मदतीने नवीन धोरणे राबवली. जलसंपदा पंधरवडा : विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी राज्यात प्रथमच ‘जलसंपदा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला. प्रश्नांची सोडवणूक: वर्षभरात लोकप्रतिनिधींसोबत १५० हून अधिक बैठका घेऊन अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ च्या संकल्पात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, “राज्याची कृषी आणि औद्योगिक प्रगती, पिण्याच्या पाण्याची सुरक्षा आणि पर्यावरण संतुलनासाठी आमचा विभाग कटिबद्ध आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याला प्रगत करण्यासाठी आम्ही अल्प, मध्यम व दीर्घकालीन उद्दिष्टे ठरवून ती वेगाने पूर्ण करत आहोत”

Radhakrishnan Vikhe Patil : जलसंपदा विभागाचा ‘रिपोर्ट कार्ड’ मुख्यमंत्र्यांना सादर Read More »

ajit pawar

Ajit Pawar: अजितदादांच्या निधनाच्या दिवशी कोणत्याही नवीन फाईल्सवर स्वाक्षरी नाही; अल्पसंख्याक विकास विभागाचा मोठा खुलासा

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी (दि.२८ जानेवारी २०२६ रोजी) अल्पसंख्याक विकास विभागामार्फत कोणत्याही नवीन फाईल्सवर किंवा प्रमाणपत्रांवर डिजिटल स्वाक्षरी करण्यात आलेली नाही, असा खुलासा अल्पसंख्याक विकास विभागाने केला आहे. तसेच त्या दिवशी कोणतेही प्रमाणपत्र वाटप झालेले नसल्याचेही विभागाने नमूद केले आहे. अल्पसंख्याक दर्जा प्रदान करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन, पारदर्शक असून २७ मे २०१३ च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसारच राबवली जाते. अर्जांची जिल्हास्तरावर पडताळणी झाल्यानंतरच छाननी करून प्रमाणपत्रे वितरित केली जातात, असे विभागाने नमूद केले आहे. विभागामार्फत कोणतेही अनधिकृत अथवा घाईघाईने कामकाज झाल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे असल्याचा ठाम दावा अल्पसंख्याक विकास विभागाने केला आहे. ‘लोकसेवा हक्क अधिनियम २०१५’ अंतर्गत ठरविण्यात आलेल्या कालमर्यादेचा विचार करून, विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत विहीत कार्यपद्धतीनुसार आदेश देण्याची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करण्यात आली होती, असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दि. २७ मे २०१३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी उपसचिव शेणॉय यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावास विभागाचे मंत्री यांनी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी मान्यता दिली होती. त्यामुळे स्थगिती असताना सेवा प्रदान करण्यात आली, हा आरोप तथ्यहीन असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar: अजितदादांच्या निधनाच्या दिवशी कोणत्याही नवीन फाईल्सवर स्वाक्षरी नाही; अल्पसंख्याक विकास विभागाचा मोठा खुलासा Read More »

tata punch ev

मस्त मस्त फिचर्स अन् जबरदस्त बॅटरी; अखेर Tata Punch EV लाँच

Tata Punch EV : भारतीय बाजारात टाटाने आपली नवीन इलेक्ट्रिक कार टाटा पंच लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक मायक्रो-एसयूव्ही आता 30 किलोवॅट आणि 40 किलोवॅट बॅटरी पर्यायांसह येते आणि एआरएआयनुसार 468 किमी पर्यंतची रेंज देते. किंमत आणि बॅटरी पर्याय नवीन पंच ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 9.69 लाख पासून सुरू होते आणि 12.59 लाख पर्यंत जाते. बॅटरी-अ‍ॅज-अ-सर्व्हिस (BaaS) योजनेअंतर्गत, ती फक्त 6.49 लाख च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येते. ती दोन बॅटरी पर्यायांसह येते: 30 किलोवॅट आणि 40 किलोवॅट. 40 किलोवॅट बॅटरी आजीवन वॉरंटीसह येते. 65 किलोवॅट डीसी फास्ट चार्जर कारला फक्त 26 मिनिटांत 20 ते 80 टक्के चार्ज करतो. स्मार्ट व्हेरिएंट (30 किलोवॅट प्रति तास) हे पंच ईव्हीचे बेस मॉडेल आहे, ज्याची किंमत 69 लाख आहे. ते 88 पीएस पॉवर आणि 154 एनएम टॉर्क निर्माण करते. हा व्हेरिएंट अंदाजे 365-375 किमीची रेंज देतो. यात सहा एअरबॅग्ज, टीपीएमएस, ईएससी, हिल होल्ड, ऑटो क्लायमेट कंट्रोल, ड्राइव्ह मोड्स आणि एलईडी डीआरएल सारख्या आवश्यक फिचर्ससह येतो. स्मार्ट+ व्हेरिएंट (30 किलोवॅट प्रति तास / 40 किलोवॅट प्रति तास) हा व्हेरिएंट अधिक फिचर्ससह येतो आणि त्याची किंमत 10.29 लाख पासून सुरू होते. यात 8-इंच टचस्क्रीन, वायर्ड अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, स्टीअरिंग कंट्रोल्स, रियर पॉवर विंडो आणि सेंट्रल लॉकिंग आहे. 40 किलोवॅट प्रति तास मॉडेलमध्ये रियर कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि इको मोड सारख्या अतिरिक्त फिचर्स देखील आहेत. अ‍ॅडव्हेंचर प्रकार (40 किलोवॅट प्रति तास) 11.59 लाख रुपयांची किंमत असलेला हा प्रकार मोठ्या बॅटरी पॅकसह येतो आणि 468 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. तो 129 पीएस पॉवर देतो. क्रूझ कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, पुश-बटण स्टार्ट, इलेक्ट्रिक ओआरव्हीएम आणि 13-इंच चाके यासारख्या फिचर्समुळे ते लांब पल्ल्याच्या आणि हायवे ड्रायव्हिंगसाठी आदर्श बनते. एम्पॉवर्ड प्रकार (40 किलोवॅट प्रति तास) हा व्हेरियंट प्रीमियम फिचर्ससह येतो आणि त्याची किंमत 12.29 लाख रुपये आहे. यात 10.25-इंच टचस्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, 360-डिग्री कॅमेरा, एअर प्युरिफायर, रेन-सेन्सिंग वायपर आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर सारखी अँडव्हान्स फिचर्स आहेत. ज्यांना तंत्रज्ञान आणि आराम दोन्ही हवे आहेत त्यांच्यासाठी हे परिपूर्ण आहे. एम्पॉवर्ड प्लस एस (टॉप व्हेरिएंट) 12.59 लाख रुपयांची किंमत असलेले हे टॉप-ऑफ-द-लाइन पंच ईव्ही मॉडेल आहे. यात व्हॉइस-अ‍ॅक्टिव्हेटेड सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जिंग, लेदरेट सीट्स, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम सारख्या लक्झरी फीचर्स आहेत. जर तुम्हाला पूर्णपणे फीचर-लोडेड इलेक्ट्रिक एसयूव्ही हवी असेल, तर हा सर्वोत्तम पर्याय आहे. कोणता व्हेरिएंट सर्वोत्तम आहे? जर तुम्ही बजेटमध्ये लांब रेंज आणि आवश्यक फीचर्स शोधत असाल, तर स्मार्ट+ (40 किलोवॅट प्रति तास) हा सर्वात जास्त किमतीचा व्हेरिएंट आहे. लांब रेंज आणि चांगल्या ड्रायव्हिंग अनुभवासाठी, अ‍ॅडव्हेंचर व्हेरिएंट हा एक चांगला पर्याय आहे. आणि जर तुम्हाला प्रीमियम फीचर्स हवे असतील, तर एम्पॉवर्ड किंवा एम्पॉवर्ड प्लस एस तुमच्यासाठी योग्य असेल.

मस्त मस्त फिचर्स अन् जबरदस्त बॅटरी; अखेर Tata Punch EV लाँच Read More »

manoj jarange

Manoj Jarange : राज्य सरकारला 26 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम; मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार?

Manoj Jarange : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 26 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जालन्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांना पुरेसा निधी दिला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकार या संस्थांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हा येथील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीवरून झालेल्या वादात एका महिलेला कथितरित्या निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध केला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. काही आरोपींना अटक झाल्याची माहिती असली तरी संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. रंजना नागापुरकर प्रकरणावर बोलताना, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेत त्यांच्या तसेच संबंधित सहकाऱ्यांची चौकशी करून अटक करण्याची मागणी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून पीडित महिलेला न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. शिंदे समितीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नसल्याचे सांगत त्यांनी विखे पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे नमूद केले. मराठा आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्याप मागे घेतले नसल्याबद्दलही त्यांनी सरकारला जाब विचारला. 26 फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतर कोणाचेही ऐकणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange : राज्य सरकारला 26 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम; मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार? Read More »

Pratap Sarnaik: आता… ‘ गाव तिथे एसटी ’ नव्हे… ‘ आदिवासी पाडा, तिथे एसटी ’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik : सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता ‘लालपरी’ च्या चाकांनी मोजले जाणार आहे! राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला. “आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी,” असा ठाम निर्धार करत त्यांनी विकासाचा नवा अध्याय सुरू केल्याची घोषणा केली. ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी ’ मिडी बसेस – विकासाची नवी वाट राज्य परिवहन महामंडळ ९ मीटर लांबीच्या, ३५ आसनी अशा १०० अत्याधुनिक मिडी बसेस खरेदी करीत असून या बसेसना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे प्रेरणादायी नामकरण करण्यात येणार आहे. अरुंद रस्ते, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाच्या घाटरस्त्यांवरून सहज धावू शकतील, अशा या बसेस खास करून आदिवासी पाड्यांसाठीच नियोजित आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या आठ दशकांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटी पोहोचली. आज तब्बल ९३% लोकसंख्या एसटी सेवेशी जोडलेली आहे. तरीही सह्याद्री व मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यातील अनेक पाडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच राहिले होते. मोठ्या बसेसना तिथे प्रवेश शक्य नव्हता; त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी आदिवासी बांधवांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती.आता मात्र ही पायपीट थांबणार आहे. पायवाटांवरून चाकवाटांकडे… ही केवळ बससेवा नाही, तर सामाजिक समावेशकतेचा सेतू आहे. शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आरोग्यसेवेसाठी धाव घेणाऱ्या मातांसाठी आणि रोजगाराच्या शोधात निघालेल्या तरुणांसाठी ही ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी ’ बस म्हणजे आशेचा किरण ठरणार आहे. मंत्री सरनाईक यांनी आशावाद व्यक्त करत सांगितले की, “दुर्गम भागातील आपला आदिवासी समाज आता एसटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल. विकासाची गंगा प्रत्येक पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा निर्धार आहे.” विकासाचा नवा संकल्प ‘ लालपरी ’च्या चाकांमध्ये आता केवळ प्रवास नाही, तर परिवर्तनाची गती दडलेली आहे. डोंगर-दऱ्यांतील शांत पाड्यांवर लवकरच एसटीचा हॉर्न घुमेल आणि त्या आवाजात विकास, समता आणि संधींची नवी पहाट दडलेली असेल. असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Pratap Sarnaik: आता… ‘ गाव तिथे एसटी ’ नव्हे… ‘ आदिवासी पाडा, तिथे एसटी ’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक Read More »