कुणाच्या मरणाची वाट पाहत होते?
Sawedi land scam – अहिल्यानगर – अहिल्यानगरच्या सावेडी भागातील गाजत असलेल्या भूखंड नोंदणी प्रकरणाने सध्या शहराचे नुसते कान नव्हे तर अंत:करण ढवळून काढले आहे. ३५ वर्षांपूर्वीचा खरेदीखत, पावर ऑफ अॅटर्नी, हिबाबनामे आणि नोटरीच्या नोंदी आज अचानक कोणाच्या तरी मृत्यूमुळे बाहेर येतात आणि सर्वांनी ‘हे माझं’, ‘मी याचा वारस’, ‘ते माझं’ म्हणून उचल खाल्ल्याची लक्तरं वेशीवर टांगली जातात. मग इतके दिवस हे सगळे नक्की कुणाच्या मरणाची वाट पाहत होते? हे केवळ प्रश्न नाही; हा एका प्रामाणिक व्यवस्थेच्या मरणाचाही हुंकार आहे. एखादा वारसदार मरण पावतो आणि त्या पाठोपाठ एकामागोमाग एक भूमाफिया, कागदांचे माहेरघर बनलेले दस्तऐवज, खोटी पावती आणि सरकारी यंत्रणेतील बेशरम शांतता यांचा भयंकर नाट्यप्रयोग सादर होतो. मग प्रश्न हा पडतो की नेमकी ही भूखंड माफिया कुणाच्या मरणाची वाट पाहत होते… सर्व्हे नं. २४५/ब १ आणि २४५/ब २ — एकूण १ हेक्टर ३५ आर — ही जमीन, ३५ वर्षांनंतर अचानक नोंदणीसाठी पुढे काढली जाते आणि म्हणे १९९१ साली खरेदीखत झाले होते! पण त्या काळात तर २४५/ब २ हा गट क्रमांक अस्तित्वातच नव्हता. गट विभाजनच १९९२ मध्ये झाले, तर वर्षभर आधी खरेदीखत लिहिणाऱ्यांनी कोणते गूढ भविष्य पाहिले होते?याहून भयावह म्हणजे हे खरेदीखत लिहून देणारा ‘अब्दुल अजीज डायभाई’ — त्याच्या नावावर त्या काळात जमीनच नव्हती! मग हे सगळे “खरे” दस्तऐवज तयार झाले तरी कसे? की काहीजणांची सही, काहीजणांचा मृत्यू, काहीजणांची आठवण आणि काहीजणांचे स्वार्थ — हे सगळं एकाच ‘खता’त गाडलं गेलं? या सगळ्या खेळात सर्वात मोठा खलनायक ठरतो तो म्हणजे – ‘गप्प बसलेली यंत्रणा‘. निबंधक, महसूल कार्यालयाला हे प्रश्न पडत नाहीत का? की त्यांनाही या बनावट दस्तऐवजांचं वजन लक्ष्मी-दर्शनाच्या तुला मोजूनच समजतं? अहो तुम्ही आज अधिकारी असला म्हणून काय झालं शेवटी तुम्हीही एक माणूस आहात हे विसरू नका, या प्रकरणात फक्त जमीनच लुटली जात नाहीये, तर नीतिमत्तेची हत्या, कायद्याचा अपमान आणि सामान्य जनतेच्या विश्वासाचा खून झालेला आहे. अशी सडकी व्यवस्था चालू राहिली, तर उद्या तुमच्या-आमच्या जमिनीही कुणाच्या तरी “काही वर्षांपूर्वी”च्या खरेदीखतावर हरवल्या जातील. त्यावेळेस तुमची पुढील पिढी ही अधिकारी नसेल हे लक्षात ठेवा, प्रशासन आणि कायदा यंत्रणांनी आता तरी जागं व्हावं, अन्यथा जनता विचारेल — हे सगळे खरेदीखत, नोटरी, हिबाबनामे फक्त माणसाच्या मरणाची वाट पाहूनच बाहेर काढायचे का? आता कुणी मरेल याची वाट न पाहता, कायदा जिवंत आहे हे दाखवून द्या. नाहीतर पुढची वाट फक्त अराजकतेकडेच जाते. * हे सगळे पुढे आले याचे कारण पुण्यात दोन-तीन महिन्यापूर्वी एका वर्षाचे निधन झाले.*
कुणाच्या मरणाची वाट पाहत होते? Read More »