DNA मराठी

हायलाईट

rupali chakankar

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक,जमीन व्यवहारात आमचा संबंध नाही

Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या राज्याचे माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले,त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले.मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे.याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले. तसेच, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले ,हे घडवून आणण्यामागे कुणाचे “सौजन्य “होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही,हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे . तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले,कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे. यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे.केवळ तर्कवितर्क,अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय,बदनाम केले जात आहे,हे अत्यंत खेदजनक आहे.मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे.खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही.शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच,हा माझा दृढ विश्वास आहे. तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे.

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक,जमीन व्यवहारात आमचा संबंध नाही Read More »

women reservation

Women Reservation : लोकसभेत आता 850 खासदार; महिलांना 33% आरक्षण देणारे विधेयक येणार

Women Reservation : लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या तरतुदीला मूर्त स्वरूप देण्यासाठी, गुरुवारी संसदेत एक विधेयक सादर केले जाईल. या विधेयकात संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील (लोकसभा) सदस्यांची सध्याची संख्या ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवण्याची तरतूद समाविष्ट आहे. मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी, हे विधेयक २०११ च्या जनगणनेतील आकडेवारीचा आधार घेईल. हे विधेयक संविधानाच्या अनुच्छेद ८१ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडते. लोकसभेतील जागांची संख्या वाढवण्यासाठी घटनादुरुस्ती करणे आवश्यक असेल. 2011 च्या जनगणनेची आकडेवारी उपलब्ध यात असे नमूद केले आहे की, “लोकसभेत राज्यांमधील प्रादेशिक मतदारसंघांतून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले ८१५ पेक्षा अधिक सदस्य असणार नाहीत; तसेच केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, संसदेने कायद्याद्वारे निश्चित केलेल्या पद्धतीनुसार निवडलेले ३५ पेक्षा अधिक सदस्य असणार नाहीत.” या विधेयकानुसार, “लोकसंख्या” या संज्ञेचा अर्थ जनगणनेद्वारे निश्चित करण्यात आलेली ती लोकसंख्या असा आहे, ज्याची संबंधित आकडेवारी यापूर्वीच प्रकाशित करण्यात आली आहे. सध्या, २०११ च्या जनगणनेची आकडेवारी उपलब्ध आहे. विधेयके सादर करण्याची सरकारची योजना ‘महिला आरक्षण कायदा, २०२३’ (नारी शक्ती वंदन अधिनियम) च्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी, सरकारने गुरुवारी लोकसभेत एक घटनादुरुस्ती विधेयक, मतदारसंघांच्या सीमांकनाशी संबंधित कायद्यांचे विधेयक आणि दिल्ली, जम्मू-काश्मीर व पुद्दुचेरी (विधानसभा असलेल्या तीन केंद्रशासित प्रदेशांसाठी) यांसाठी एक स्वतंत्र विधेयक सादर करण्याची योजना आखली आहे. एक-तृतीयांश आरक्षणाची अंमलबजावणी घटनादुरुस्ती विधेयकाच्या मसुद्यात असे नमूद केले आहे: “म्हणूनच, प्रस्तावित विधेयकाचा उद्देश लोकसभा, राज्यांच्या विधानसभा, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांना (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील महिलांसह) एक-तृतीयांश आरक्षण लागू करणे हा आहे. या आरक्षणाची अंमलबजावणी, नुकत्याच प्रकाशित झालेल्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आकडेवारीवर आधारित सीमांकन प्रक्रियेद्वारे केली जाईल.”

Women Reservation : लोकसभेत आता 850 खासदार; महिलांना 33% आरक्षण देणारे विधेयक येणार Read More »

brydon carse

Brydon Carse : SRH ला मोठा धक्का, ब्रायडन कार्स IPL 2026 मधून बाहेर, ‘या’ खेळाडूला संधी

Brydon Carse : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स दुखापतीमुळे 2026 च्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने कार्सच्या जागी पर्यायी खेळाडूची घोषणा केली आहे. SRH ने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका याला कार्सच्या जागी आपल्या संघात समाविष्ट केले आहे. SRH ने या हंगामात आतापर्यंत पाच सामने खेळले असून, त्यापैकी दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. मात्र, कार्सला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या हंगामातील पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या सराव सत्रादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली होती. त्याने अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही. 2026 च्या आयपीएल लिलावापूर्वी हैदराबाद संघाने कार्सला संघात कायम (रिटेन) केले होते. त्यावेळी SRH चे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी कार्स लवकर बरा होईल अशी आशा व्यक्त केली होती, परंतु तसे घडले नाही. मधुशंका 75 लाखात करारबद्ध आयपीएलने जारी केलेल्या निवेदनानुसार, SRH ने मधुशंकाला 75 लाख रुपयांना आपल्या संघात घेतले आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्स (MI) संघाचा भाग होता, परंतु त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती. या 25 वर्षीय वेगवान गोलंदाजाने श्रीलंकेसाठी 1 कसोटी, 28 एकदिवसीय आणि 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, एकूण 70 बळी (विकेट्स) मिळवले आहेत. दरम्यान, मंगळवारी SRH चा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याच्याबाबतही एक महत्त्वाची बातमी समोर आली. हा वेगवान गोलंदाज 17 एप्रिल रोजी पुन्हा हैदराबाद संघात सामील होण्याची शक्यता आहे. SRH चा पुढील सामना 18 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध होणार आहे. पॅट कमिन्सची फिटनेस चाचणी होणार ‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्स बुधवारी आपल्या घरी फिटनेस चाचणी देणार आहे. हंगामाच्या सुरुवातीपूर्वी, कमिन्सने असे म्हटले होते की, जर सर्व काही सुरळीत पार पडले, तर तो आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळेल. कमिन्स म्हणाला, “मी पुन्हा गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या मी साधारणपणे दर तिसऱ्या दिवशी गोलंदाजी करत आहे. स्पर्धेच्या मध्यापर्यंत मला पूर्णपणे तंदुरुस्त करण्यासाठी आम्ही एक योजना आखली आहे. त्यामुळे कोणताही अडथळा न आल्यास मी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात खेळू शकेन, अशी आम्हाला आशा आहे.”

Brydon Carse : SRH ला मोठा धक्का, ब्रायडन कार्स IPL 2026 मधून बाहेर, ‘या’ खेळाडूला संधी Read More »

maharashtra government

Maharashtra Government: राज्यात आणखी 150 तालुक्यांचा होणार समावेश; सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government: आकांक्षित जिल्हा व आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार या कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे व परभणी या सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरिता, आकांक्षित जिल्हा व तालुका कार्यक्रमाचा राज्य योजनेंतर्गत विस्तार करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणा केली आहे. त्यानुसार नीति आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत यापूर्वीच्या ४ जिल्ह्यांसह आता त्यामध्ये राज्य शासनाच्या विस्तार कार्यक्रमांतर्गत नव्याने ६ जिल्ह्यांची निवड करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर सध्याच्या २७ आकांक्षित तालुक्यांव्यतिरिक्त नवीन १५० तालुक्यांची निवड करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे या १० जिल्ह्यातील ७७ आकांक्षित तालुक्यांसह राज्यातील अन्य जिल्ह्यातील १०० आकांक्षित अशा १७७ तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.या आकांक्षित जिल्ह्यांची निवड आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषि आणि सिंचन, कामगार, वने, ऊर्जा वापर, दारिद्र्य, मानवविकास निर्देशांक, ग्रामीण घनता या क्षेत्रांच्या आधारावर करण्यात आली आहे तर तालुक्यांची निवड दारिद्र्य निर्मूलन, पोषण, आरोग्य, शिक्षण, रस्ते, ऊर्जा या सहा क्षेत्रातील १९ निर्देशांच्या आधारे करण्यात आली आहे. या आकांक्षित जिल्हा व तालुक्यांमध्ये सामाजिक व पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज, डिजीटल पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा व त्यांचे बळकटीकरण, शाळा, वसतिगृहे आणि उच्च शिक्षण संस्था यांच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण यावर धोरणात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजना, केंद्र व राज्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सीएसआर निधीचा धोरणात्मक वापर यावर भर देण्यात येणार आहे. जेणेकरून या जिल्ह्यांचा व तालुक्यांचा कायापालट करणे शक्य होणार आहे.

Maharashtra Government: राज्यात आणखी 150 तालुक्यांचा होणार समावेश; सरकारचा मोठा निर्णय Read More »

mpsc exam

MPSC Exam: शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा; परीक्षा योजनेमध्ये नव्याने 18 सेवांचा, 93 संवर्गाचा समावेश

MPSC Exam: शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, याकरिता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवेंद्र फडणवीस होते. या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या १०२ होणार आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा आणि ९३ संवर्गाचा समावेश होणार. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार हा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शासनाचे प्रशासन अनेक संवर्गांमध्ये विभागलेले आहे. यात ३३ विभागांमध्ये, सुमारे ११०आस्थापनांमध्ये ३ हजार ६०० हून अधिक संवर्ग आहेत. या संरचनेत सरळसेवा भरतीसंदर्भात १ हजार ४०० हून अधिक सेवाप्रवेश नियम आहेत. यातून विविध विभागांमधून स्वतंत्रपणे तितक्याच परीक्षा घेण्यात येत होत्या. आता त्याऐवजी परीक्षांची संख्या कमी होऊन उमेदवारांसाठी भरतीच्या पदांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी अधिक एकसंध, सुलभ, पारदर्शक, परिणामकारक आणि कालबद्ध निवड प्रक्रिया राबविण्यासाठी सुधारणा करण्यात येणार आहे. या सुधारणांमुळे सेवाप्रवेश नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. याशिवाय सेवांतर्गत पदोन्नतीसाठी स्वतंत्र संवर्ग संरचना आणि मृत संवर्गांची पुनर्रचना होणार आहे. • सेवाप्रवेश नियमांमधील व्यापक बदल- विविध संवर्गांच्या ५७४ सेवाप्रवेश नियमांमध्ये बदल. यामध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव, कौशल्ये आणि प्राधान्य निकषांचे सुसूत्रीकरण तसेच विविध संवर्गांतील विसंगती दूर. • अनुभवाच्या अटींचे सुसूत्रीकरण- समान स्वरूपाच्या संवर्गांसाठी वेगवेगळ्या अनुभवाच्या अटी असल्याने परीक्षांची संख्या अनावश्यकरीत्या वाढत होती. त्यामुळे शैक्षणिक व अनुभव निकष अधिक सामायिक, सुसंगत आणि तर्कसंगत करण्यात येणार. यापुढे सर्वसाधारणपणे सरळसेवा भरतीसाठी अनुभवाची अट लागू राहणार नाही. • महाराष्ट्र नागरी सेवा, राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा पद्धतीचा विस्तार- सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा, राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा योजनेअंतर्गत सहा सेवांमधील एकूण ५७ संवर्गांमध्ये पदभरती केली जाते. सुधारणेनंतर या सेवांमध्ये ४५ संवर्गांचा नव्याने समावेश करून याअंतर्गत एकूण १०२ संवर्गांचा समावेश करण्यास मान्यता. • नवीन सेवा- संयुक्त परीक्षांचे आयोजन सुसूत्रीकरण होणार. विविध प्रशासकीय विभागांतील समान संवर्गांच्या वर्गीकरणाच्या आधारे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती केल्या जाणाऱ्या सध्याच्या सेवांव्यतिरिक्त आणखी १८ नवीन सेवा निर्माण करण्यास मान्यता. या १८ नवीन सेवांमध्ये विविध प्रशासकीय विभागांतील एकूण ९३ संवर्गांचा समावेश. • गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गांचे प्रशासकीय आणि तांत्रिक गटात वर्गीकरण- गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गांची भरती प्रक्रिया अधिक एकसमान व कार्यक्षम करण्यासाठी त्यांचे “प्रशासकीय संवर्ग गट” आणि “तांत्रिक संवर्ग गट” असे वर्गीकरण. कर्तव्ये व जबाबदाऱ्या विचारात घेऊन प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असलेल्या २६९ संवर्गांचे १८ गट, तर तांत्रिक स्वरूपाचे कामकाज असलेल्या २२१ संवर्गांचे ३० गट. याकरिता स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. • मुलाखतीऐवजी अंतर्गत पदोन्नती व प्रतिनियुक्ती- नामनिर्देशनाच्या कोट्यातील काही राजपत्रित संवर्गातील पदे मुलाखतीने भरण्याऐवजी अंतर्गत पदोन्नती व प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार. • कालबाह्य संवर्गांचे पुनर्गठन आणि निरसन- प्रशासकीय कामकाज आणि शासकीय व्यवहारात माहिती-तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर काही संवर्गांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या आता कालबाह्य ठरल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या अनावश्यक ठरलेल्या संवर्गांना कालबाह्य संवर्ग (Dying Cadre) म्हणून घोषित. या पदांऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेची जाण असलेली नवीन पदे निर्माण करण्याचा आवश्यकतेनुसार विचार होणार. • अराजपत्रित संवर्गांसाठी ‘नो इंटरव्ह्यू पॉलिसी’- अराजपत्रित संवर्गांसाठी मुलाखत न घेण्याचे (No Interview Policy) धोरण लागू करण्यात येईल. यामुळे निवड प्रक्रिया अधिक सुलभ,जलद आणि पारदर्शक होईल. • निवड न झालेल्या उमेदवारांसाठी “निपुण सेतू” उपक्रम- केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मुलाखत फेरीपर्यंत पात्र ठरलेल्या परंतु अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिभा सेतू पोर्टल सुरू केले आहे. त्याच धर्तीवर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अंतिम निवडीसाठी शिफारस न झालेल्या उमेदवारांची माहिती सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील संस्थांना उपलब्ध करून देण्यात येणार. त्यासाठी महाजॉब्स (MahaJobs) पोर्टलअंतर्गत “निपुण सेतू” हा उपक्रम सुरू करण्यात येणार. • डिजिलॉकरद्वारे कागदपत्र पडताळणी – DigiLocker हे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत विकसित डीजी लॉकर हे सुरक्षित डिजिटल दस्तावेज व्यासपीठ आहे. त्याचा वापर करून पदभरती प्रक्रिया सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यात येणार. यात उमेदवारांची शैक्षणिक गुणपत्रिका, अन्य स्थानांतरण, दिव्यांग, जात, क्रीडाविषयक प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील.या सर्व सुधारणांमुळे पदभरतीसाठीच्या परीक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल. भरती प्रक्रिया अधिक कालबद्ध, पारदर्शक, सुलभ आणि कार्यक्षम बनेल. समान संवर्गांसाठी समान निकष, दस्तावेज पडताळणीतील सुलभता, निवड प्रक्रियेतील सुसूत्रीकरण, आणि तंत्रज्ञानाधारित प्रणालींचा वापर यामुळे शासनाची पदभरती व्यवस्था अधिक सक्षम होईल.

MPSC Exam: शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा; परीक्षा योजनेमध्ये नव्याने 18 सेवांचा, 93 संवर्गाचा समावेश Read More »

summer

Ahilyanagar Temperature : जिल्ह्यातील तापमानात वाढ…उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Ahilyanagar Temperature : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान उष्ण व दमट राहील. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी कोरडे हवामान वर्तविण्यात आले असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानात काही प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानवी व प्राण्यांच्या आरोग्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. उष्माघाताची लक्षणे दिसताच नागरिकांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी १०७७, १०२, १०४, १०८ व ११२ या क्रमांकांवर संपर्क करावा. नागरिकांनी तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून ओ.आर.एस., लस्सी, ताक, कैरीचे पन्हे व लिंबू पाण्याचा नियमित वापर करावा. दुपारी बारा ते तीन वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री वा टोपीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकावा. गडद, घट्ट व जाड कपड्यांऐवजी हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेवावे. अशक्तपणा, डोकेदुखी व सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या लाटेची माहिती मिळवण्यासाठी रेडिओ, टी.व्ही. व वर्तमानपत्रांचा वापर करावा. उन्हात अतिकष्टाची व शारीरिक श्रमाची कामे करू नयेत. कामगारांनी उन्हात काम करताना डोक्यावर पांढरा रुमाल बांधावा. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्याबाबत कामगारांना सूचित करावे. कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त काम उरकून घ्यावे व उन्हात काम करताना थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी. गरोदर स्त्रिया व आजारी कामगारांची विशेष काळजी घ्यावी. घरे थंड ठेवण्यासाठी व घरात थेट सूर्यप्रकाश येऊ नये म्हणून पडदे, झडपा, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे व ओले कपडे वापरून वेळोवेळी थंड पाण्याने स्नान करावे. उन्हाळ्याच्या काळात शक्यतो स्वयंपाक करणे टाळावे व मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात. दारू, चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेये घेणे टाळावे. तसेच उच्च प्रथिनयुक्त आहार व शिळे अन्न खाऊ नये. गुरांना व पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवून वेळेवर पुरेसे पाणी द्यावे. उन्हापासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी. लहान मुलांना व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. नागरिकांनी या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही गिते यांनी केले आहे.

Ahilyanagar Temperature : जिल्ह्यातील तापमानात वाढ…उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe: एवढा मोठा त्याग सोपा नाही…, सुजय विखेंकडून तनपुरेंचे कौतुक

Sujay Vikhe: राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ही स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याला आणि त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासाला न्याय देण्याची संधी आहे, असे भावनिक प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले. उंबरे व ब्राम्हणी गणातील कार्यकर्त्यांच्या भव्य बैठकीत बोलताना त्यांनी अक्षय कर्डिले यांना विजयी करण्याचे आवाहन केले. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे माहितीचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारात राहुरी तालुक्यातील उंबरी व ब्राह्मणी गणातील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम तसेच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेच्या सुरुवातीला डॉ. विखे पाटील यांनी सर्व उपस्थितांच्या वतीने विविध स्तरावर योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. विशेषतः तनपुरे परिवाराच्या भूमिकेचे कौतुक करत ते म्हणाले की, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेला निर्णय हा माणुसकी, संस्कार आणि राजकीय परिपक्वतेचे उदाहरण आहे. एवढा मोठा त्याग करणे सोपे नसते. तसेच, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी एकत्र येत दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राजकारणात सर्वसमावेशकता अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही गटाच्या व्यक्तीची अवहेलना न करता एकजुटीने काम करणे हीच खरी ताकद आहे, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक एकत्रितपणे लढवली जात असून, मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही शेवटची संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले. आगामी काळात मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्याने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी राहुरी तालुक्यातील उबाटा गटाचे तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांनी डॉ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे महायुतीची ताकद आणखी वाढले आहे.

Sujay Vikhe: एवढा मोठा त्याग सोपा नाही…, सुजय विखेंकडून तनपुरेंचे कौतुक Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange: गुन्हे मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार मनोज जरांगे यांचा सरकारला इशार

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्याचा शब्द सरकारने दिला असून, तो पाळलाच पाहिजे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. जालना येथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडली.“सरकारने दिलेला शब्द पाळावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, “आतापर्यंत आंदोलन करून ८५० पेक्षा जास्त गुन्हे मागे घ्यायला लावले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, “ते शब्दापासून बदलले तरी मी बदलणार नाही,” असे जरांगे म्हणाले. राहिलेल्या गुन्ह्यांबाबत विभागीय समितीचा अहवाल सरकारकडे जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “आरक्षण मिळवणारच आणि उर्वरित गुन्हेही मागे घ्यायला लावणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.मराठा आरक्षण उपसमितीवरही त्यांनी टीका करत, समाजाला अवमानकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. उपसमिती बरखास्त करण्याची मागणी करत, “मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय देणे ही समितीची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.याशिवाय, कुणबी आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली.

Manoj Jarange: गुन्हे मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार मनोज जरांगे यांचा सरकारला इशार Read More »

BJP

Pune News: भाजप पदाधिकाऱ्यांवर वसुली व धमकीचे आरोप, ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

Pune News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात भाजपच्या महिला पदाधिकारी आशा बुचके यांच्यावर वसुली आणि धमकी दिल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुचके यांनी एका युवकाला पैशासाठी धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवकाला विश्रामगृहात बोलावून अपमानास्पद व धमकीची भाषा वापरल्याचे या ऑडिओत ऐकू येत आहे. यामुळे त्या लोकप्रतिनिधी आहेत की दबाव टाकणाऱ्या टोळीप्रमाणे वागत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तक्रारदार रोशन बिरमल यांनी आरोप केला आहे की, त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये बोलावून जबरदस्तीने चेक घेण्यात आला. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे आशा बुचके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर धक्काबुक्कीचे आरोप झाले होते. दरम्यान, या प्रकरणी युवकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune News: भाजप पदाधिकाऱ्यांवर वसुली व धमकीचे आरोप, ऑडिओ क्लिपमुळे खळबळ Read More »

vijay wadettiwar

Vijay Wadettiwar: शेतकरी कर्जमाफी फसवा फसवी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा

Vijay Wadettiwar: सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही एक बनवाबनवी आहे. सरकार शेतकऱ्यांना भुलवत आहे,पण जोपर्यंत 7/12 कोरा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा खऱ्या अर्थाने फायदा होणार नाही, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केली. प्रसार माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सध्याच्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांचे उर्वरित कर्ज कायम राहणार आहे.त्यामुळे त्यांना भविष्यात नवीन कर्ज मिळणे कठीण होईल. पीकविमा योजनेतून केवळ विमा कंपन्यांचे भले होत असून शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहे.त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फोडाफोडीला ऊत आला असून, राजकारणात कोणतीही नीतिमत्ता उरलेली नाही. कोणाला तरी आधी डोक्यावर घ्यायचे आणि नंतर पायाखाली तुडवायचे ही आता एक फॅशन झाली आहे, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी फोडाफोडीचे राजकारणावर प्रतिक्रिया देताना टीका केली. राज्यातील सत्ताधारी गोटात सर्व काही आलबेल नसल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेत असूनही अस्वस्थ आहेत, त्यांचे मंत्रीही अस्वस्थ आहेत. राज्याला कर्जबाजारी करून हे सत्तेचे खेळ सुरू आहेत,जनतेच्या प्रश्नांकडे बघायला वेळ नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. मुंबई महापालिकेतील नगरसेवक निधीच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला. राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित असले पाहिजे. विकास निधी देताना मात्र सर्वांना समान न्याय मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्याचे सरकार विरोधकांच्या नगरसेवकांना निधी न देता लोकशाहीची घातक पद्धत रुजवत आहे,असे ते म्हणाले. राज्यात लव्ह जिहादच्या मुद्द्यावर फाशीची मागणी करणारे सत्ताधारी पक्षाचे नेते महिला शोषणाच्या प्रकरणांवर गप्प का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. चांगल्या घरातील महिलांचे शोषण होत असताना सरकारमधील लोकांचे तोंड शिवले आहे का? असा टोला लगावत त्यांनी हे सर्व मतांच्या राजकारणाचे धंदे असल्याची टीका केली.

Vijay Wadettiwar: शेतकरी कर्जमाफी फसवा फसवी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा Read More »