Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा
Ahilyanagar News : महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी, वाहतूक मुकादम कामगार युनियनने ऊसतोड मजुरांच्या प्रलंबित विमा व मजुरीतील फरकाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले आहे. युनियनचे गहिनीनाथ थोरे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबई यांना पाठवलेल्या निवेदनात या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास १४ ऑक्टोबरपासून ऊसतोड कामगार व वाहतूकदार बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे. युनायटेड इन्शुरन्स कंपनीमार्फत २००३ पासून उसतोड कामगारांसाठी विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेचा कालावधी २०२२ पर्यंत सुरू होता आणि त्यातून राज्यभरातील हजारो कामगारांना जवळपास १४०० कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. मात्र, २०२२ नंतर शासनाने साखर कारखान्यांकडून प्रती टन १० रुपये दराने विमा कपात केली असून, सुमारे १७८ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. परंतु ही रक्कम विमा कंपनीकडे जमा न झाल्याने कामगारांना एकही लाभ मिळालेला नाही, असा गंभीर आरोप युनियनने केला आहे. तसेच, ४ सप्टेंबर २०२४ रोजी उसतोड मजुरीत ३४ टक्के वाढ जाहीर करण्यात आली होती, मात्र अद्याप या वाढीचा फरक कामगारांना मिळालेला नाही. शासनाने विमा व मजुरी फरकाचा प्रश्न तातडीने सोडवून कामगारांचे देणे द्यावे, अशी मागणी युनियनने केली आहे. याबाबत शासन, विमा कंपनी आणि साखर संघाच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवून प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा संप अपरिहार्य होईल, असा इशारा थोरे पाटील यांनी दिला आहे. या संपामुळे ऊस तोडणी हंगाम ठप्प होण्याची शक्यता असून, सरकारने हा प्रश्न गंभीरतेने घेतला नाही तर साखर उद्योगासमोर मोठे संकट उभे राहू शकते, असा इशारा युनियनने दिला आहे.