Bharat Gogawale : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली आहे. राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सांगोल्यातील शिवसेना मेळाव्यात बोलताना राज्यात लवकरच आणखी एक ‘ऑपरेशन’ होणार असल्याचे संकेत दिले. मात्र, हे ऑपरेशन नेमके कोणत्या पक्षातील किंवा कोणत्या नेत्यांसंदर्भात आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती देणे टाळले.
सांगोला येथे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री भरत गोगावले, मंत्री योगेश कदम, दिपाली सय्यद यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना भरत गोगावले यांनी “एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करतात. ते कुणाला कळत नाही,” असे सांगितले. त्यानंतर राज्यात लवकरच आणखी एक ऑपरेशन होणार असल्याचे त्यांनी सूचक वक्तव्य केले.
मात्र, या ऑपरेशनची माहिती आत्ताच जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. “लवकरच राज्यात दुसरे एक ऑपरेशन आहे. आता सांगत नाही, नाहीतर मीडिया बातम्या करेल,” असे म्हणत भरत गोगावले यांनी आपले वक्तव्य मध्येच थांबवले.
त्यामुळे भरत गोगावले यांनी नेमके कोणत्या राजकीय घडामोडीचे संकेत दिले आहेत? राज्यात पुन्हा कोणते ‘ऑपरेशन टायगर’ होणार आहे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.






