Maharashtra Politics: अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान चार भिक्षेकरूंचा मृत्यू झाल्याच्या घटनेने मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
खासदार निलेश लंके यांनी या मृत्यूंना ‘बालहट्ट’ जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या मते, काही जणांच्या हट्टापायी या भिक्षेकरूंना आपला जीव गमवावा लागला. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
सुजय विखे म्हणाले, “जर खासदार लंके यांना माझ्याविषयी राग असेल, तर त्यांनी सरळ कोर्टात जावं आणि माझ्यावर गुन्हा दाखल करावा. मला त्याबद्दल काहीही हरकत नाही. जे काही झाले, ते सर्व न्यायालयाच्या आदेशानुसारच झाले आहे.”
तसेच, त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “समाज आणि महिलांचे संरक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत ते करत राहीन. मात्र, या गोष्टीचा सध्याच्या खासदारांशी कधीच संबंध आलेला नाही, त्यामुळे त्यांच्या कडून कुठलीही अपेक्षा नाही.”
या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं असून, मृत्यू झालेल्या भिक्षेकरूंना न्याय मिळावा आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.