Dnamarathi.com

Sujay Vikhe: देशात 2034 साली नवीन संविधान लागू करण्याची हालचाल सुरू असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सपकाळ यांच्या या दाव्यावर भाजपसह अनेक पक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर आता या प्रकरणात नगरचे माजी खासदार आणि भाजप नेते सुजय विखे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया देत काँग्रेसवर सडकून टीका केली.

“काँग्रेसच्या सर्व नेत्यांचा विलाज केला पाहिजे. वारंवार पराभव झाल्यामुळे ते निराशेच्या तळाला गेले आहेत. त्यामुळे त्यांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे. मला वाटतं, त्यांना मानसिक आरोग्य केंद्रात काही दिवस पाठवायला हवे, म्हणजे ते बरे होतील आणि देशासाठी काहीतरी सकारात्मक करू शकतील,” अशा शब्दांत डॉ. विखे यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

डॉ. विखे पुढे म्हणाले, “संविधानाचा विषय आता फार जुना झाला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेल्या दीड वर्षांपासून काम करत आहे. ना कुठल्याही संविधानात बदल झाला आहे, ना संविधानाला कुठलाही धक्का लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, तो संविधान पृथ्वीच्या अंतापर्यंत अबाधित राहील.”

सपकाळ यांच्या विधानामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादळामुळे विरोधी पक्षांनी देखील या विषयावर अधिक माहितीची मागणी करत, सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, भाजपने सपकाळ यांच्या आरोपांना अफवा आणि दिशाभूल करणारे असल्याचे ठामपणे सांगितले आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे नवीन संविधानाच्या चर्चेने पुन्हा एकदा रंग घेतला असला, तरी प्रत्यक्षात सरकारने यावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्यामुळे यापुढे या विषयावर काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *