Ahmednagar News: निरोगी आणि सकारात्मक आयुष्य जगण्यासाठीचा महत्त्वाचा क्रीडाप्रकार अशी ओळख असलेल्या योगविद्येचा समावेश आता शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीतही होणार आहे.
गेल्या दोन अधिवेशनांपासून आमदार सत्यजीत तांबे यांनी योगाला क्रीडाप्रकाराचा दर्जा द्यावा व या खेळाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत व्हावा, यासाठी पाठपुरावा केला होता. आता हिवाळी अधिवेशनातही त्यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी 31 डिसेंबरच्या आत नियमावली तयार करून शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश केला जाईल, असं आश्वासन दिलं. त्यामुळे आ. सत्यजीत तांबे यांनी आणखी एक प्रश्न तडीला लावल्याची भावना व्यक्त होत आहे.
भारतीय संस्कृतीत उगम झालेली योगविद्या ही निरोगी आयुष्यासाठी अत्यावश्यक आहे. योगविद्येचा अभ्यास करणाऱ्यांना शारीरिक फायद्यांसोबतच मानसिक स्वास्थ्यही लाभते. त्यामुळे योगासनांचा समावेश क्रीडाप्रकारांत व्हावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी आमदार झाल्यानंतरच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. तसंच योगासनं करणाऱ्यांचा विचार शिवछत्रपती पुरस्कारांसाठी व्हावा व या पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश व्हावा, याबाबतही ते आग्रही होते. त्यानुसार योगविद्येला क्रीडाप्रकाराचा दर्जा याआधीच मिळाला होता.
आता हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा आ. तांबे यांनी योगाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत व्हावा, याबाबत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 31 डिसेंबरच्या आधीच याबाबत नियमावली तयार केली जाईल, अशी ग्वाही सभागृहाला दिली.
9 खेळांचा शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश व्हावा!
स्कुल फेडरेशन ऑफ इंडियाने रोलबॉल, आट्यापाट्या, बॉल बॅडमिंटन, सिकई-मार्शल आर्ट, थ्रो बॉल, डॉज-बॉल, टेनिक्वाईट, शूटिंग बॉल आणि कॅरम हे खेळ शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधून वगळले होते. त्यामुळे हे खेळ खेळणारे खेळाडू ग्रेस मार्क, सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण अशा सुविधांपासून वंचित झाले होते. हा या खेळाडूंवर अन्याय आहे.
परिणामी स्कुल फेडरेशन ऑफ इंडियाने हे नऊ खेळ वगळण्याच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली. या मागणीची दखल घेत खेळाडूंच्या अडचणींचा आणि भवितव्याचा विचार करून या खेळांचा समावेश शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचं स्पष्टीकरण दिलं.