DNA मराठी

Delimitation Bill नंतर बदलणार लोकसभेचे गणित; काही राज्यांच्या जागा ‘जैसे थे’, महाराष्ट्राला 72 जागा

delimitation

Delimitation Bill : लोकसभा मतदारसंघांच्या आगामी परिसीमनाबाबत केंद्र सरकारने मोठा प्रस्ताव पुढे केला आहे. सर्व राज्यांच्या लोकसभा जागांमध्ये सुमारे 50 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. मात्र, प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 50 टक्के वाढ करणे गणिती पातळीवर शक्य नसल्याने काही ठिकाणी जागांची संख्या सध्यासारखीच राहण्याची शक्यता आहे.

सध्या लोकसभेच्या 543 जागा आहेत. प्रस्तावित 50 टक्के वाढीनंतर लोकसभेची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मात्र, एक जागा असलेल्या काही केंद्रशासित प्रदेशांच्या जागा दोन केल्यास त्यात 100 टक्के वाढ होईल. त्यामुळे अशा ठिकाणी सध्याची एकच जागा कायम ठेवण्याचा पर्याय विचारात घेतला जात आहे. या गणितानुसार लोकसभेची एकूण सदस्यसंख्या 816 पर्यंत राहू शकते.

महाराष्ट्रात 48 वरून 72 जागा?

प्रस्तावित सूत्रानुसार महाराष्ट्राच्या लोकसभा जागांची संख्या 48 वरून 72 होऊ शकते. उत्तर प्रदेशाच्या जागा 80 वरून 120, पश्चिम बंगाल 42 वरून 63, बिहार 40 वरून 60, तर तमिळनाडूच्या जागा 39 वरून 59 होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशच्या जागा 29 वरून 44, कर्नाटक 28 वरून 42, गुजरात 26 वरून 39, राजस्थान आणि आंध्र प्रदेश प्रत्येकी 25 वरून 38, तर केरळच्या जागा 20 वरून 30 होऊ शकतात.

एक जागा असलेल्या राज्यांना धक्का नाही

अंदमान-निकोबार, चंदीगड, लडाख, लक्षद्वीप, मिझोराम, नागालँड, पुदुच्चेरी आणि सिक्कीम यांसारख्या ठिकाणी सध्या प्रत्येकी एक लोकसभा जागा आहे. 50 टक्के वाढीचे सूत्र लागू करताना या जागा दोन करायच्या की सध्याची एकच जागा कायम ठेवायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्याच्या प्रस्तावित गणितात काही ठिकाणी एकच जागा कायम ठेवण्याची शक्यता आहे.

महिलांना 33 टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा?

परिसीमनाचा हा प्रस्ताव महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशीही जोडलेला आहे. लोकसभेच्या जागांची संख्या वाढवल्यानंतर 2029 च्या निवडणुकीपासून महिलांसाठी एक-तृतीयांश जागा आरक्षित करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. लोकसभेची संख्या 850 पर्यंत गेल्यास जवळपास 280 जागा महिलांसाठी राखीव होऊ शकतात.

दरम्यान, या प्रस्तावावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात संबंधित विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतरच परिसीमनाचे अंतिम गणित स्पष्ट होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *