Kanika Kapoor Separation : ‘बेबी डॉल’ या गाण्यामुळे लोकप्रिय झालेली गायिका कनिका कपूर पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कनिका कपूरने पती आणि उद्योगपती गौतम हथीरमानी यांच्यापासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी आपापल्या वाटा वेगळ्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
कनिका कपूरने 3 नोव्हेंबर रोजी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक निवेदन शेअर करत ही माहिती दिली. बराच विचार केल्यानंतर आपण दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे तिने म्हटले आहे. एकत्र घालवलेल्या वेळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत तिने गौतम यांच्या भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. तसेच या काळात आपल्या खासगी आयुष्याचा आदर करण्याचे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे.
कनिका आणि गौतम यांनी मे 2022 मध्ये लंडनमध्ये जवळचे कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत विवाह केला होता. लग्नापूर्वी दोघांची जवळपास 15 वर्षांची मैत्री होती. विभक्त होण्यामागे नेमके कारण काय आहे, याबाबत कनिकाने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, काही वृत्तांमध्ये दोघांच्या व्यस्त व्यावसायिक आणि वैयक्तिक वेळापत्रकाबाबत चर्चा करण्यात आली आहे. कनिकाने मात्र त्यांच्या नात्यात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कनिका कपूरचे हे दुसरे लग्न होते. याआधी तिचे राज चंडोक यांच्याशी लग्न झाले होते. या नात्यातून तिला तीन मुले आहेत. 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.
‘बेबी डॉल’, ‘चिट्टियां कलाइयां’, ‘टुकुर टुकुर’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांमुळे कनिका कपूरने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील या निर्णयाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.






